Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 30 March, 2011

थिवी स्टेडियमचा मार्ग खुला?

अटींच्या पालनाची ‘जीसीए’ची हमी
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): केंद्राने थिवी येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाच्या बांधकामाला लागणारी परवानगी दिलेली असून अन्य परवाने मिळाल्यानंतरच मैदानाचे बांधकाम केले जाणार असल्याचे आज ‘जीसीए’ने न्यायालयाला सांगितले. तसेच सर्व अटींचे पालन केले जाणार असल्याची हमी दिल्यानंतर याचिकादाराने आपली हरकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे गोवा खंडपीठाने गोवा फाउंडेशनने सादर केलेली याचिका निकालात काढली. तसेच, अटींचा भंग झाल्यास पुन्हा न्यायालयात येण्याची मुभा याचिकादाराला देण्यात आली आहे.
थिवी येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचे बांधकाम करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेतली नसल्याचा दावा करून गोवा फाउंडेशनने सादर केलेली याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निकालात काढली असली तरी सरकारने लिलाव न करता या मैदानाचे काम गोवा क्रिकेट असोसिएशनला दिल्याने त्याला आव्हान देणारी याचिका सादर झाली आहे. त्यावरून राज्य सरकारासह अन्य प्रतिवाद्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
या मैदानाचे बांधकाम करण्यासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनने केंद्रीय मंत्रालयाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तसेच, या जमिनीचा काही भाग वनखात्याच्या अखत्यारीत येतो आहे, असा दावा याचिकादाराच्यावतीने ऍड. नॉर्मा आल्वारीस यांनी केला होता.
दरम्यान, श्री. गावस यांनी सादर केलेल्या याचिकेत मैदानासाठी ताब्यात घेतलेल्या आणि ती जमीन ‘जीसीए’च्या ताब्यात दिलेल्या प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. ‘जीसीए’ ही सरकारी संस्था नसल्याने सरकारने जमीन ताब्यात घेऊन त्याचा लिलाव न करताच ही जमीन त्यांच्या ताब्यात कशी दिली, असा प्रश्‍न उपस्थित करून न्यायालयात सरकारच्या प्रक्रियेला आव्हान दिले आहे.

No comments: