Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 April, 2011

कॅसिनोंत जुगाराव्यतिरिक्त अन्य ‘धंदे’ही चालतात!

पणजी, दि. ३१ (विशेष प्रतिनिधी): कॅसिनो बोटींवर जुगाराव्यतिरिक्त अन्य ‘नको ते धंदे’ही चालतात’; त्यामुळे या स्वैराचाराला आळा करण्यासाठी २१ वर्षांखालील व्यक्तींना कॅसिनोत प्रवेशबंदी करावी, अशी जोरदार मागणी आज विरोधी पक्षाने केली. रात्रीपासून अगदी पहाटेपर्यंत चालणारे हे कॅसिनो सुरू झाल्यापासून गोव्यातील महिलांमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ ठामपणे सांगतात, असा गौप्यस्फोट झाल्यामुळे विधानसभेतील वातावरण क्षणभर स्तब्ध झाले. यासंबंधी कायदा खात्याकडे योग्य तो विचार विनिमय करून निर्णय घेण्याची हमी गृहमंत्री रवी नाईक यांनी आज सभागृहाला दिली.
गोव्याला लागलेली ही कॅसिनोची कीड धोकादायक स्वरूप धारण करत असून युवकवर्ग या किडीमुळे पोखरला जात आहे, अशी कैफियत भाजप आमदार दिलीप परुळेकर यांनी मांडली. सुमारे अडीच वर्षांपूर्वी गृहमंत्र्यांनी आम्हांला कॅसिनो नियंत्रणात आणण्यासाठी कायदे करू, असे ठोस आश्‍वासन दिले होते त्याचे काय झाले, असा प्रश्‍न त्यांनी यावेळी उपस्थित केला. या कॅसिनो बोटीत लहान मुले व महिला यांच्या प्रवेशासंबंधी काही मार्गदर्शक तत्त्वे किंवा नियम आहेत काय, असा सवाल त्यांनी गृहमंत्र्यांना केला.
या चर्चेत भाग घेताना पर्रीकर म्हणाले की, पुरुष आणि महिलांना समान हक्क असावेत हे आपले मत आहे. परंतु, समान हक्क म्हणजे स्वैराचार नव्हे. रात्री अपरात्री तरुण महिला कॅसिनोवर ये - जा करतात, पुरुषांबरोबर सर्रासपणे जाताना दिसतात ही वस्तुस्थिती आहे. तेथे नेमके काय होते हे जाणून घ्यायचे असेल तर सीसी टीव्ही पाहा. कॅसिनोमुळे वेश्या व्यवसायही वाढला आहे. मळा पणजीतील प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञाने हे सांगितले आहे. तुम्ही त्यांच्याशी बोला व शहानिशा करून घ्या, असे त्यांनी रवी नाईक यांना सुनावले. सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरीया फर्नांडिस, तसेच म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी गृहमंत्र्यांना या समस्येचे गांभीर्य ओळखण्याचे आवाहन केले व याप्रकरणाची मस्करी करू नका असा सल्ला दिला. दरम्यान, या चर्चेअंती गृहमंत्र्यांनी कॅसिनो प्रवेश प्रतिबंधित करण्यासाठी पावले उचलली जातील, असे आश्‍वासन दिले.

No comments: