Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 31 March, 2011

‘कालचे मरण आज’

खारीवाडा येथील ‘त्या’ घरांवर आज बुलडोझर फिरणार
वास्को, दि. ३० (प्रतिनिधी)
खारीवाडा - वास्को येथील ८७ घरांवर आज होणार असलेली कारवाई पोलिस सुरक्षेअभावी एका दिवसासाठी टळली, मात्र उद्या सकाळी ही कारवाई सुरू होणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सकाळी ९.३० वाजल्यापासून या भागात कलम १४४ जारी करण्यात असल्याची माहिती उपजिल्हाधिकार्‍यांनी दिली.
एमपीटीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर बंदराचे विस्तारीकरण व अन्य कारणांसाठी खारीवाडा येथील जागा खाली करून देण्याबाबत याचिका दाखल केली आहे. त्यानुसार न्यायालयाने पालिकेला काही दिवसांपूर्वी आदेश जारी केला होता. खारीवाडा येथील ३६३ घरांवर फेब्रुवारी महिन्यात ‘बुलडोझर’ फिरविण्यात येणार असल्याचे येथील २७६ घरमालकांना समजताच त्यांनी प्रशासकीय लवादासमोर धाव घेऊन घरे जमीनदोस्त करण्याच्या आदेशावर स्थगिती मिळवण्यास यश मिळविले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी न्यायालयात झालेल्या सुनावणीत ज्या घरमालकांनी या कारवाईस स्थगिती मिळवलेली नाही त्यांच्यावर अद्याप का कारवाई करण्यात आलेली नाही? असा सवाल मुरगाव नगरपालिकेला करण्यात आला होता. त्यामुळे पालिकेने उर्वरित ८७ घरांवर आज (३० रोजी) ‘बुलडोझर’ फिरविण्याचे ठरविले होते. मात्र, पोलिस बंदोबस्तात तांत्रिकी समस्यांमुळे अभाव असल्याचे दिसून आल्याने आजची कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या सदर कारवाई होणार असल्याची माहिती मुरगावचे उपजिल्हाधिकारी लेविन्सन मार्टिन्स यांनी पत्रकारांना दिली.
दरम्यान, आजची कारवाई टळल्याने खारीवाडा येथील ‘त्या’ ८७ घरमालकांपैकी १७ जणांनी प्रशासकीय लवादासमोर धाव घेऊन कारवाईस स्थगिती मिळवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे उद्या ७० घरांवर ‘बुलडोझर’ फिरणार हे निश्‍चित. या कारवाईच्या दरम्यान वास्को शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एका खास आदेशाद्वारे उपजिल्हाधिकार्‍यांनी उद्या सकाळी ९.३० वाजल्यापासून खारीवाडा येथील टी. बी. कुन्हा चौक ते हिंदू स्मशानभूमीपर्यंतच्या भागात कलम १४४ जारी केले आहे. कारवाईसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ६० कामगारांना दोन जेसीबी यंत्रे, सहा ट्रक्स, एक गॅसकटर तसेच इतर साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. सुमारे ५०० पोलिस शिपाई यावेळी उपस्थित असतील.
दरम्यान, ‘त्या’ घरांवर आज होणार असलेली कारवाई टळल्याचे येथील घरमालकांना समजताच त्यांनी सुटकेचा श्‍वास घेतला. मात्र, उद्या ही कारवाई होणार असल्याचे नक्की झाल्याने येथील वातावरण तीव्र बनले आहे. आज संध्याकाळी ७.३० च्या दरम्यान काही लोकांनी शहरात मोर्चा काढून उद्या ‘वास्को बंद’ ठेवण्याचे आवाहन केले आहे.

No comments: