Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 27 March, 2011

‘ओ मारिया’ चित्रपटाचा उद्या शताब्दीदिन सोहळा

पणजी, दि. २६ (सांस्कृतिक प्रतिनिधी)
गोमंतकीय चित्रपट निर्माते/दिग्दर्शक राजेंद्र तालक यांच्या ‘ओ मारिया’ चित्रपटाचा शताब्दीदिन सोहळा सोमवार दि. २८ मार्च रोजी ‘आयनॉक्स’ चित्रपटगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. गोव्याच्या तांबड्या मातीत तयार झालेला हा चित्रपट ‘आयनॉक्स’मध्ये १०० दिवस पूर्ण करत आहे. गोव्यातही प्रादेशिक भाषांतून चांगले चित्रपट तयार केले जाऊ शकतात व त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो हे या चित्रपटाने दाखवून दिले आहे.
गोव्यातील जमीनविक्री प्रकरणांची वस्तुस्थिती मांडणार्‍या ‘ओ मारिया’ चित्रपटात बॉलिवूड चित्रपटांसारखा डान्स, रोमान्स, मारामारी तसेच अन्य मसाला नाहीय. साधा आणि सरळ वस्तुस्थिती मांडणारा हा चित्रपट आहे. मागच्या काही वर्षांत गोव्यातील चित्रपटगृहांत चाललेल्या चित्रपटांचा इतिहास पाहिल्यास केवळ ‘आयनॉक्स’च नव्हे तर गोव्यातील इतर कोणत्याही चित्रपटगृहात आत्तापर्यंत एकही चित्रपट १०० दिवस चाललेला नाही. ‘ओ मारिया’ या गोमंतकीय चित्रपटाने मात्र गोव्याच्या चित्रपट दुनियेत नवा इतिहास रचला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
गोवा हे जगाच्या नकाशावर पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. आता येथे दर्जेदार चित्रपटांची निर्मितीही होऊ लागली आहे. राजेंद्र तालक निर्मित ‘ओ मारिया’ या चित्रपटाने येथील ‘आयनॅाक्स’ चित्रपटगृहात तब्बल १०० दिवस तग धरून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या १९ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून मडगाव आणि पणजी येथे दरदिवशी त्याचे तीन शो चालत आहेत. सोमवार दि. २८ मार्च रोजी हा चित्रपट १०० वा दिवस पूर्ण करत आहे. गोमंतकीय रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने आणखीनही काही दिवस हा चित्रपट चालण्याची शक्यता आहे.
याबाबत श्री. तालक म्हणतात की, चित्रपट निर्मिती करणे हे आमचे काम. ते आम्ही खूप मेहनतीने केले, परंतु त्याला योग्य न्याय देण्याचे काम रसिकांनी केल्यामुळेच हा इतिहास घडू शकला. गोमंतकीय प्रेक्षक चांगल्या चित्रपटाला दाद देतात, फक्त येथील निर्मात्यांनी चांगल्या चित्रपटांची निर्मिती करणे आवश्यक आहे. ‘ओ मारिया’चा पणजीत दरदिवशी एक तर मडगावात दोन शो मिळून आत्तापर्यंत ३०० पेक्षा जास्त शो प्रदर्शित झाले आहेत. जवळजवळ २६ लाख रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात कोणताही ‘मसाला’ नसताना त्याने भव्य यश संपादन केलंय हे विशेष. डिसेंबर ते मार्च हे दिवस म्हणजे कार्निव्हल, आणि इतर रंगारंग कार्यक्रमांचे. त्यात विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धाही सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर चित्रपट १०० दिवस चालणे म्हणजे गोमंतकीय रसिक चांगल्या चित्रपटाला योग्य सन्मान देतात हे सिद्ध होते असे श्री. तालक यांनी सांगितले.
या चित्रपटात गोमंतकीय कलाकारांबरोबरच हिंदी चित्रपटांतील टिकू तलसानीया, शेहनाज पटेल, सुलभा आर्या सारख्या ज्येष्ठ कलाकारांनीही भूमिका केल्या आहेत. गोव्यातील ज्वलंत विषय सुटसुटीतपणे मांडताना जमीनविक्री प्रकरणावर कशा प्रकारे मात करता येईल याचे उत्तरही या चित्रपटातून मिळते. त्यामुळे चित्रपट केव्हा संपतो हेच प्रेक्षकांच्या लक्षात येत नाही. आणखी अर्धातास तरी चित्रपट पुढे असायला हवा होता अशी हुरहुर प्रेक्षकांच्या मनाला लागून राहते. मोजक्याच दृश्यांतून आणि नेमक्या ठिकाणी मांडलेली नायक /नायिकेची प्रेमकहाणी व त्याला जोड मिळते ती नामवंत पॉपगायक रेमो फर्नांडिस यांच्या संगीताची, शिवाय श्रवणीय गीते यामुळे चित्रपट प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवत जातो असेही श्री. तालक यांनी सांगितले.

No comments: