Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 April, 2011

नाटक, कविता सर्वश्रेष्ठ साहित्य प्रकार : विष्णू वाघ

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): गोमंतक मराठी अकादमीने प्रसिद्ध नाट्यसंस्था 'अष्टगंध'च्या सहकार्याने पीर्ण येथे दि. २९ व ३० मार्च असे दोन दिवस आयोजित केलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद गोमंतकीय प्रसिद्ध नाट्यलेखक वष्णू सूर्या वाघ यांनी भूषविले. यावेळी नाट्यकलाकार प्रताप उगवेकरयांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये श्री. वाघ यांनी आपला सारा जीवनपटच 'रंगभूमी व मी' या विषयावर भाष्य करताना खुला केला. रसिक वाचकांसाठी आमचे प्रतिनिधी विठ्ठल गावडे पारवाडकर यांनी संकलित केलेली ही मुलाखत थोडक्यात येथे देत आहोत.
प्रश्‍न : 'नाटक' हे साहित्य प्रकारात मोडते का?
उत्तर : नाटक व कविता हे उच्च कोटीचे साहित्य प्रकार आहेत यात शंकाच नाही. काही कथा, कादंबरीकार नाटकाला उच्च साहित्य मानत नाहीत हा भाग वेगळा. पण माझ्या मते नाटक व कविता हे साहित्य प्रकार सर्वश्रेष्ठ ठरतात. नाटक हे बाह्य अभिसरणातून आलेली अभिव्यक्ती तर कविता ही अंतर्मनातून निर्माण होणारी अभिव्यक्ती आहे. साहित्याचे अंतर्प्रकार तसे माणसाच्या जीवनाशी एकरूप नसतात. त्यामुळे नाटक व कविता हे उत्कृष्ट साहित्य प्रकार आहेत यात शंकाच नाही.
प्रश्‍न : एक उत्कृष्ट 'प्रॉम्टर' म्हणून आपला रंगभूमीशी सबंध आला, हे खरे का?
उत्तर : हो, आपण लहानपणी उत्कृष्ट 'प्रॉम्टर' म्हणून प्रसिद्ध होतो. आजूबाजूच्या गावात मला मुद्दाम प्रॉटिंगसाठी नेण्यात येत असे. ऐनवेळी उतरलेली अनेक नाटके आपण आपल्या प्रॉटिंगने यशस्वी केली.
प्रश्‍न : आपला अभिनय केव्हापासून सुरू झाला?
उत्तर : आपली आई एक उत्कृष्ट धालो, फुगडी गायिका होती. त्यावेळी आपणही तिच्यासोबत धालोच्या मांडावर जाऊन खेळामध्ये विविध भूमिका वठवायचो. माझा खरा अभिनय तेव्हापासूनच सुरू झाला.
प्रश्‍न : रंगभूमीवरील पहिली भूमिका कोणती?
उत्तर : 'अपराध मीच केला' या नाटकात संजयची भूमिका केली व हीच खर्‍या अर्थाने रंगभूमीवरील माझी पहिली भूमिका ठरली. प्रत्येक माणसात जन्मताच कला दडलेली असते व रंगभूमीवर विलक्षण शक्ती ती त्याच्याकडून चांगली भूमिका करवून घेते.
प्रश्‍न : आपण मायक्रो बायोलॉजीमध्ये डॉक्टरेट पदवी घेणार होता त्याचं काय झालं?
उत्तर : या प्रश्‍नावर श्री. वाघ थोडे गंभीर झाले व म्हणाले, मी शैक्षणिक कारकिर्दीत बराच हुशार मुलगा होतो. विविध स्पर्धा, परीक्षांमध्ये वरच्या क्रमांकावरच पास झालो. विद्यापीठात शिकत असताना मायक्रो बायोलॉजीमध्ये डॉक्टरेट पदवी घेण्याचा आपला विचार होता, मात्र त्याच काळात वडील वारले व घरची जबाबदारी अंगावर आली. घर चालवण्यासाठी नोकरी करणं भाग पडलं. त्यामुळे त्या विषयात डॉक्टरेट पदवी घेण्याचे आपले स्वप्न अपुरेच राहिले.
प्रश्‍न : पहिली नोकरी कोणती?
उत्तर : जबाबदारी आपल्यावर आल्यानंतर आपण 'गोमंतक टाइम्स' या इंग्रजी वर्तमानपत्रात 'ट्रेनी सब-एडीटर' (प्रशिक्षणार्थी उपसंपादक) म्हणून पहिली नोकरी धरली. सुरुवातीची दोन वर्षे १८ तास काम केले व वर्तमानपत्रातील सर्वच स्तरातील बारकावे शिकलो. त्यानंतर बेळगाव येथील 'न्यूज लिंग'मध्ये काम केले. नंतर पुन्हा गोव्यात आलो दै. 'तरुण भारत'मध्ये नोकरी पत्करली. तेथून दै. 'गोमंतक'मध्ये कार्यकारी संपादक म्हणून रुजू झालो व नंतर संपादक झालो. त्या वृत्तपत्रात मटक्याचे आकडे छापण्यास मी विरोध केल्याने बराच वाद निर्माण झाला. आपण व्यवस्थापनाला 'मी संपादक असेपर्यंत मटक्याचे आकडे वर्तमानपत्रात छापणार नाही' असे स्पष्ट सांगितले. मात्र, मी परगावी गेल्याची संधी साधून 'गोमंतक'मध्ये मटक्याचे आकडे छापण्यात आले. माझ्या मनाला ते पटले नाही आणि मी संपादकपद सोडले. नंतर आपण 'वर्तमान' नावाचं सायंदैनिक सुरू केले, पण तेही बंद पडले. तेव्हापासून आपण पूर्णपणे पत्रकार म्हणून वावरणे सोडून दिले.
प्रश्‍न : आपले पहिले नाटक कोणते?
उत्तर : पत्रकारिता सोडून आपण लेखन क्षेत्रात उतरलो व 'एका माणसाचा मृत्यू' हे पहिले नाटक लिहिले. त्यानंतर कविता व नाट्यलेखन सुरूच ठेवले. खून लेखन केले व संगीत तसेच इतर नाटके, कविता, एकांकिका लिहिल्या. त्यांचे प्रयोग गोव्याबरोबरच इतर राजांतसुद्धा झाले.
प्रश्‍न : 'बाई मी दगूड फोडिते' बद्दल काही?
उत्तर : या नाटकाला महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. पुंडलिक नाईक यांच्या 'सुरिंग' या कोकणी नाटकाचा मराठीत अनुवाद करावा असे मला सांगण्यात आले. तेव्हा आपण नाटकाचे अनुवाद वा रूपांतर करणार नाही, तर त्या नाटकाचे कथाबीज घेऊन अनुसर्ंजनकरून वेगळ्या नाटकाची निर्मिती करीन असे सांगितले व तसे केले. हेच नाटक म्हणजे 'बाई मी दगूड फोडिते' होय. सदर नाटकाने आत्तापर्यंत बरेच यश मिळवले आहे.
प्रश्‍न : नाटकाच्या यशासाठी संहिता महत्त्वाची असते का?
उत्तर : हो, नाटकाच्या यशात संहिता महत्त्वपूर्ण असते. दुसरे म्हणजे दिग्दर्शकाला सदर नाटकाचा आशय समजून कलाकारांची निवड करणे जमायला हवे. रोचक कथानक, उत्कृष्ट संवाद, तांत्रिक यश आणि कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींचा सांघिक परिपाक म्हणजेच नाटकाचं यश. नवोदित नाट्यलेखकांनी 'नाटक' हे समाजातील सर्व थरांसाठी असतं हे ध्यानात ठेवून लेखन करावं.

No comments: