Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 28 March, 2011

रंगभूषाकारात ठसा उमटवणार्‍या अमिता नाईक

शैलेश तिवरेकर
‘कलाकारांची खाण’ म्हणून गोव्याची जगभरात ख्याती आहे. त्यातील नाट्य ही कला तर गोव्याच्या मातीत रुजली असून केवळ अभिनयच नव्हे तर नाटकाच्या तांत्रिक आणि इतर बाजू खंबीरपणे सांभाळणारे पडद्याच्या मागील कलाकारही गोमंतकात मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. गोव्यातील हौशी रंगभूमीवर दरवर्षी हजारो नाटके होत असतात आणि त्या नाटकांसाठी रंगभूषाकारही मोठ्या प्रमाणात तयार झालेले पाहायला मिळतात. परंतु आत्तापर्यंत गावागावांत होणार्‍या नाटकांना जाऊन ‘रंगभूषा’ करणारे पुरुषच दिसत होते. त्यामुळे हे पुरुषप्रधान काम समजले जात असे. मात्र याला एक अपवाद ठरला आहे तो म्हणजे रंगभूषेचं काम करणारी ‘अमिता नाईक’ ही महिला.
बदलत्या काळात महिलाही या कलेत मागे नाहीत याचे ताजे उदाहरण म्हणून अमिता यांच्याकडे पाहता येईल. ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक वा काल्पनिक असे कोणतेही नाटक असो. आज अमिता नाईक खंबीरपणे व स्वतंत्रपणे रंगभूषेचे काम सांभाळतात. यातून काही प्रमाणात आर्थिक मिळकतही होते. परंतु अर्थ आणि स्वार्थ अशा दोन्ही गोष्टींचा आनंद त्या उपभोगतात यात शंकाच नाही.
आत्तापर्यंत तुका अभंग अभंग, सन्यस्तखड्गसारख्या अनेक नावाजलेल्या नाटकांतून ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शकांच्या हाताखाली त्यांनी स्वतंत्रपणे रंगभूषाकार म्हणून काम केलेले आहे. केवळ गोव्यातच नव्हे तर रुद्रेश्‍वर पणजी यांनी उदयपूर (राजस्थान) येथे सादर केलेल्या नाटकातही त्यांनी रंगभूषाकार म्हणून चोख कामगिरी बजावलेली आहे. गोव्यात निर्मिती झालेल्या ‘संभवामी युगे युगे’ या महानाटकातही एकनाथसोबत रंगभूषाकार म्हणून अमिता यांनी काम पाहिले. अतिशय मनमिळाऊ आणि सरळ स्वभावाच्या अमिता ह्या कोणत्याही नाटकासाठी रंगभूषाकार म्हणून जरी गेल्या तरी एखाद्या कलाकाराला वेशभूषा करण्यासाठीही त्या त्याच तळमळीने मदत करत असतात. याचे मुख्य कारण म्हणजे वेशभूषेतही त्यांना चांगलीच आवड असल्याचे जाणवते. त्याचबरोबर त्यांच्यातील जातिवंत कलाकाराचे दर्शन होते. रूद्रेश्‍वर पणजी सादर करीत असलेल्या ‘स. युद्ध नको मज बुद्ध हवा’ या नाटकासाठी लागणार्‍या सम्राट अशोक यांच्या काळातील पगड्या मन लावून तयार करताना त्या अनेक वेळा दिसतात.
त्यांच्यातील गुणी आणि मनमिळाऊ कलाकाराला जाणून घेण्यासाठी या संदर्भात त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, आपण एक जन्मजात कलाकार असल्याचे जाणवते. याचे कारण म्हणजे बालपणापासून संगीत कलेची मला आवड होती. म्हणूनच संगीतक्षेत्रात मध्यमा पूर्णपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. सुरुवातीला दत्ताराम वळवईकर आणि नंतर लाडू मास्तर व इतर अनेक मास्तरांकडून संगीत कलेचे प्रशिक्षण घेतलेले आहे. नंतर संसारातील अनेक समस्यांमुळे संगीत शिक्षण अर्ध्यावर बंद करावे लागले. परंतु म्हणतात ना जातिवंत कलाकाराला मरण नसते. या ना त्या बाजूने संधी मिळतच असते. त्या संधीचा फक्त लाभ घेता यायला हवा. त्याचप्रमाणे पती एकनाथ नाईक यांच्या रूपाने एक कलाकारच माझ्या आयुष्यात आला. त्यांनी माझ्या कलेचा खरोखरच आदर केला. पण नंतर संगीत कलेपेक्षा रंगभूषेत मला जास्त आवड निर्माण झाली होती. याचे मुख्य कारण म्हणजे एकनाथनी एक व्यावसायिक रंगभूषाकार म्हणून गोव्यात चांगलेच नाव कमावले होते. शिवाय गोवा आणि गोव्याबाहेर त्यांना अनेक पारितोषिके मिळाली होती. पतीच्या सहकार्याने मीसुद्धा रंगभूषेच्या कलेत रस घेऊ लागले आणि त्यांच्याबरोबर नाटकासाठी जाऊ लागले. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि काल्पनिक पात्रांचा अभ्यास करून त्याप्रमाणे चेहरे रंगवण्याचा प्रयत्न करू लागले. सुरुवातीला त्यांच्यासोबत जात होते परंतु नाटकाच्या हंगामात कामाचा व्याप एवढा वाढतो की दोघांनी दोन ठिकाणी जाणे अपरिहार्य होते. म्हणून नाटकाला जाण्याअगोदर एकनाथकडून नाटकातील पात्रांचा अभ्यास करून घेत होते आणि त्याप्रमाणे काम करत होते. सुरुवातीला जरा भीती वाटत होती परंतु आता सवय झाली आणि अनुभवही पदरी असल्याने आता संकोच, भीती वाटत नाही. माझे पती एकनाथ यांच्यामुळेच माझ्यातील कलाकाराला मी जिवंत ठेवू शकले त्यांची खूप इच्छा आहे की मी या कलेत आणखी अभ्यास करावा आणि खूप नाव कमवावे परंतु ईश्‍वराची मर्जी. एका वेगळ्या वाटेने जाऊन आपली कर्तबगारी सिद्ध करणार्‍या या कलाकारास मनःपूर्वक शुभेच्छा.

No comments: