Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 April, 2011

‘नियमभंग’ झालेली महापालिका

बैठक आता येत्या ५ एप्रिलला विरोधकांच्या दणक्याचा परिणाम
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): निवडणुकीनंतर पणजी महापालिकेच्या पहिल्याच बैठकीत आज विरोधकांनी महापौरांना अर्थसंकल्पावरून अक्षरशः भंडावून सोडले. नियमानुसार तीन दिवसांची नोटीस न देता अर्थसंकल्प मांडल्याने त्यास विरोधी गटाच्या नेत्या वैदेही नाईक यांनी जोरदार विरोध केला. अखेर महापौर यतीन पारेख यांना आजची बैठक रद्द करणे भाग पडले. त्यामुळे आता ही अर्थसंकल्पीय बैठक येत्या ५ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. मात्र अर्थसंकल्प मंजूर न झाल्याच्या कारणास्तव पालिका कर्मचार्‍यांचे वेतन रोखू नका, असेही यावेळी विरोधकांनी सत्ताधार्‍यांना निक्षून बजावले.
‘आम्हाला रात्री ७.३० वाजता आजच्या बैठकीची नोटीस मिळाली आहे. त्यामुळे एवढ्या घाईगडबडीत महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करता येणार नाही. महापालिका कायद्यानुसार विशेष बैठकीची नोटीस किमान तीन दिवस आधी द्यावी लागते. अर्थसंकल्पात काय आहे हे पाहायला नगरसेवकांना वेळही मिळालेला नाही, त्यामुळे यावरील चर्चा पुढे ढकलण्यात यावी,’ अशी जोरदार मागणी विरोधकांनी केली. ‘पालिकेचे नियम मोडू नका’ असे सांगत नवीन कार्यकाळात विरोधकांनी आवाज चढवला. यात विरोधी गटातील नवनियुक्त नगरसेवक डॉ. शीतल नाईक, श्‍वेता कामत, शुभम चोडणकर यांच्यासह अन्य नगरसेवकांनीही सहभाग दिसून आला.
सुरुवातीला महापौर पारेख यांनी बैठक रद्द करण्यास विरोध करीत २८ कोटी ४१ लाख ७६ हजार ५६६ रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. त्यावेळी अर्थसंकल्प आजच मंजूर होईलच, असा धोशा उपमहापौर रुद्रेश चोडणकर यांनी लावला. तसेच, त्यांनी आजच अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी आपल्याबरोबर कोण कोण नगरसेवक तयार आहेत, असा प्रश्‍न करत संबंधितांना हात वर करण्यास सांगितले. यावेळी ३० पैकी ३ नगरसेवक वगळता अन्य कोणीही त्यांना समर्थन दिले नाही. खुद्द महापौरही शांत बसले होते. शेवटी पारेख यांनी अर्थसंकल्पाला होकार देण्यासाठी सर्व नगरसेवकांना ५ मिनिटांचा अवधी दिला. या दरम्यान, कोणीही या बैठकीत अर्थसंकल्पावर चर्चा करण्यास सहमती दर्शवली नसल्याने शेवटी त्यांनी ही बैठक येत्या ५ एप्रिल पर्यंत पुढे ढकलली.
पार्किंगसाठी जागा न ठेवता विस्तारकामासाठी कला अकादमीला महापालिकेने दिलेल्या परवानगीवर पुन्हा विचार करण्याचे निवेदन आज विरोधी गटाने पालिका आयुक्त एल्विस गोम्स यांना दिले. तसेच, त्याची एक प्रत विरोधी पक्षनेते तथा पणजीचे आमदार मनोहर पर्रीकर व महापौर यतीन पारेख यांनाही देण्यात आली.
दरम्यान, गेल्या पालिका मंडळाने विकासकामांसाठी ६ कोटी रुपये मंजूर केले होते. ते ६ कोटी रुपये कुठे गेले, त्याचे काय झाले, कुठे किती आणि कसला विकास केला, असा प्रश्‍न करून त्यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी सुरेंद्र फुर्तादो यांनी केली.

No comments: