Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 April, 2011

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच!

शिक्षणमंत्र्यांची घोषणा - जनक्षोभापुढे सरकार नमले
- शाळांत इंग्रजी शिक्षक नेमणार
- एकात्मिक धोरण ११ एप्रिलला

पणजी, दि. ३१(प्रतिनिधी): प्राथमिक शिक्षण माध्यम धोरणात कोणताही बदल होणार नाही व मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण दिले जाईल, असे ठोस आश्‍वासन शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आज विधानसभेत दिले. तसेच, प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना इंग्रजीची योग्य ओळख व्हावी यासाठी सर्व प्राथमिक शाळांत इंग्रजी शिक्षकांची नेमणूक करणार, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
कॉंग्रेस आघाडी सरकारातील काही आमदार व मंत्र्यांनी प्राथमिक शिक्षण माध्यमात बदल सुचवून इंग्रजीची सक्ती करण्याचा विषय उरकून काढल्याने राज्यात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले आहेत. काही इंग्रजीधार्जिण्यांनी पणजीत या प्रकरणी जाहीर सभेचे आयोजन करून शक्तिप्रदर्शनही घडवून आणले होते. राज्यातील सर्व कोकणी व मराठी भाषाप्रेमींनी या डावाला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची जय्यत तयारी सुरू केल्याने वातावरण बरेच स्ङ्गोटक बनले आहे. आज विधानसभेत शिक्षण खात्यावरील चर्चेवेळी प्राथमिक माध्यमासंदर्भात सरकार आपली भूमिका स्पष्ट करणार होते व त्यामुळे अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी प्राथमिक माध्यमाच्या विषयावर अत्यंत प्रभावी भाषण करून प्रत्येकाच्या जीवनात मातृभाषेला असलेले महत्त्व विविध प्रमाणांसहित पटवून दिले. या चर्चेला शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी अत्यंत संयमाने उत्तर दिले. मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण होणार असे सांगतानाच धार्मिक सलोखा हे गोव्याचे वेगळेपण आहे व अशावेळी भाषावाद या सलोख्याच्या आड अजिबात येता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने तयार करण्यात आलेले एकात्मिक शिक्षण धोरण ११ एप्रिल २०११ रोजी जाहीर केले जाईल, अशी घोषणाही यावेळी बाबूश यांनी केली. शिक्षण खात्याचा ताबा घेतल्यानंतर आपण अनेक अडथळ्यांवर मात करून शिक्षणाचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. गोवा शिक्षण विकास महामंडळाअंतर्गत तांत्रिक विभाग स्थापण्यात आला आहे व यापुढे शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व पायाभूत सुविधांचे दुरुस्तीकाम या विभागाअंतर्गत घेतले जाईल. गोवा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाला २.८ कोटी रुपयांचे एकवेळ अनुदान व २५ इमारतींची देखरेख व व्यवस्थापनासाठी प्रतिवर्षी २५ लाख रुपयांची घोषणाही त्यांनी याप्रसंगी केली. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढावा या अनुषंगाने एक समिती स्थापन केली जाईल. तांत्रिक शिक्षण संचालनालयात येत्या काळात अनेक गोष्टींचा समावेश केला जाईल. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा कायापालट करून त्यात अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. गोवा विद्यापीठाच्या अनुदानात वाढ करण्याबरोबरच तिथे दयानंद बांदोडकर, डी. डी. कोसंबी व कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या नावे पदांचीही स्थापना केली आहे.
प्राथमिक शिक्षण व त्याचबरोबर शिक्षण हक्क कायदा याबाबत सरकारला सल्ला देण्यासाठी उच्चस्तरीय राज्य सल्लागार मंडळ स्थापन करून त्यात नामांकित शिक्षणतज्ज्ञ, व्यवस्थापन प्रतिनिधी व पालकांना प्रतिनिधित्व देण्याचेही त्यांनी मान्य केले. सध्या आंदोलन करीत असलेल्या बीएड शिक्षकांच्या उपोषणावर मात्र त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

No comments: