Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 30 March, 2011

आज भारत-पाकिस्तान ‘युद्ध’

मोहालीला छावणीचे स्वरूप - आजदेशात ‘अघोषित बंद’
मोहाली, दि. २९ : भारत आणि पाकिस्तान या दोन परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये उद्या, बुधवारी मोहालीच्या मैदानावर ऐतिहासिक क्रिकेट युद्ध होणार असून, ते दोन्ही देशांचे पंतप्रधान आणि अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत दुपारी २.३० वाजता छेडले जाईल. दोन देशांमधील या क्रिकेट युद्धावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याने अभूतपूर्व अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मैदानाची दररोज तपासणी केली जात असून, मैदानावर सामना पाहायला येणार्‍या प्रत्येक प्रेक्षकाची उद्या कसून तपासणी केली जाणार आहे. अतिरेक्यांकडून मानवरहित विमानाचा उपयोग करून हल्ला केला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून मैदानाभोवती विमानभेदी क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत. उद्याच्या या महासंग्रामासाठी महेंद्रसिंग धोनी आणि शाहिद आङ्ग्रिदी या दोघांचेही संघ सज्ज झाले असून, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आपले शंभरावे शतक ठोकताना आङ्ग्रिदीचा नक्षा उतरविणार आणि अष्टपैलू युवराजसिंग मैदान गाजवीत पाकच्या टीमला मोहालीहून थेट कराचीला पाठविणार, असा विश्‍वास असल्याने तमाम क्रिकेट रसिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. उद्याच्या लढतीमुळे दुपारनंतर लोक टीव्हीसमोर बसणार असल्याने देशात एकप्रकारे ‘अघोषित बंद’चेच वातावरण राहील, असा अंदाज आहे. ‘बंद’दरम्यान सर्वत्र शांतताच राहणार असल्याने सुरक्षा यंत्रणांच्या डोक्याला ताण नाही. उद्याच्या सामन्याचा सामूहिक आनंद लुटता यावा यासाठी देशभर एलसीडी प्रोजेक्टरची मागणी वाढली असून, भाडेही दसपट वाढले आहे.
इतिहासात दुसर्‍यांदा विश्‍वचषक जिंकण्याचे ध्येय समोर ठेवणारे भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ जेव्हा ‘हाय व्होल्टेज’च्या उपांत्य सामन्यात उद्या बुधवारी पंजाब क्रिकेट संघटनेच्या मैदानावर उतरतील, तेव्हा दोन्ही देशांतील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना कौशल्याबरोबरच मानसिक कणखरतेचीही जुगलबंदी बघावयास मिळणार यामध्ये शंका नाही. या महासंग्रामासाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी कंबर कसल्यामुळे हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीचा होईल, अशी आशा वर्तविण्यात येत आहे.
या प्रतिष्ठेच्या सामन्याकडे जगभरातील क़्रिकेट शौकिनांचे लक्ष लागले आहे. या अगोदर भारत आणि पाक अनेकवेळा आमने-सामने आले आहेत. या दोन्ही संघांतील सामने किती रंगतदार आणि चुरशीचे होतात हेही जगजाहीर आहे. या सामन्याचा निकाल म्हणजे केवळ जिंकून अंतिम ङ्गेरीतील आपले स्थान निश्‍चित करण्याएवढाच मर्यादित नसून तो दोन्ही राष्ट्रांच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न बनला आहे. दोन्ही देशांचे पंतप्रधान या सामन्याला उपस्थित राहणार असल्यामुळे या सामन्याला अधिकच महत्त्व आले आहे.
भारत-पाक हे क्रिकेट क्षेत्रात एक कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. त्यातच हा सामना भारतात होत असल्यामुळे सर्व जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. उद्या होणार्‍या या सामन्यात जो संघ बाजी मारून जाईल, त्या संघाचा तो २ एप्रिलला मुंबईत होणार्‍या अंतिम सामन्याचा रस्ता मोकळा होईल. विशेष म्हणजे नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान संघ प्रथमच भारतात खेळत आहे.
विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत या दोन देशांची कामगिरी बघितली, तर भारताचे पारडे जड आहे. कारण आत्तापर्यंत चारही वेळा भारताने आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याला हरविले आहे. पण, जागतिक क्रिकेटमधील आकडेवारी नजर टाकली, तर पाकचे विजयाचे पारडे जड आहे. पाकने ११९ सामन्यांपैकी ६९ सामने जिंकले आहे. इतकेच नव्हे, तर भारतातही पाकिस्तानचा रेकॉर्ड चांगला आहे. भारतात खेळविल्या गेलेल्या २६ पैकी १७ सामन्यांत भारताला हरविण्याची किमया पाकिस्तानने केली आहे. पण, या आकडेवारीला महत्त्व राहिलेले नाही. कारण उद्या होणार्‍या सामन्यात जो संघ चांगला खेळेल तोच विजयाचा दावेदार राहील. गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि प्रबळ दावेदारांपैकी एक असलेला दक्षिण आङ्ग्रिका स्पर्धेतून बाहेर झाल्यामुळे भारत-पाक सामन्याला अधिकच महत्त्व आले आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारताची बाजू मजबूत आहे. कारण या सामन्यात सहयजमान घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा ङ्गायदा घेण्याचा प्रयत्न करेल यामध्ये शंका नाही.

No comments: