Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 2 April, 2011

खारीवाड्यावर संतापाची लाट!

संतप्त नागरिकांचा भव्य मोर्चा - राजधानीत धडक!

वास्को व पणजी, दि. १ (प्रतिनिधी)
पणजी, दि. १ (प्रतिनिधी)
घरे पाडल्याने रस्त्यावर आलेल्या खारीवाड्यावरील लोकांनी आज रात्री उशिरा राजधानीत धडक देऊन कॉंग्रेस सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या या लोकांना मुख्यमंत्री भेटलेच नसल्याने रात्री उशिरापर्यंत त्यांनी चर्च चौकात आल्तिनो येथे जाणारा रस्ता रोखून धरला. यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आंदोलनकर्त्यांना भेट देऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देण्याचे आश्‍वासन दिले. तसेच, मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून या प्रश्‍नावर तोडगा काढण्याची मागणी केली.
यासाठी उद्या दुपारी ४ वाजता बैठक घेण्याचेही त्यांनी सुचवले.
यावेळी बोलताना श्री. पर्रीकर म्हणाले की, खारीवाड्यावरील घरे पाडण्याची प्रक्रिया चुकीची आहे. या विषयी सरकारला मार्ग काढता आला असता. परंतु, ती तयारी सरकारने दाखवली नाही. त्या ठिकाणी राहणारे सगळेच गोमंतकीय आहेत. सरकार कुचकामी असल्यानेच ‘एमपीटी’ची दादागिरी वाढली असल्याचेही मत त्यांनी यावेळी एका प्रश्‍नाला उत्तर देताना व्यक्त केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातही या लोकांची बाजू सरकारने योग्यरीत्या मांडली नाही, असेही श्री. पर्रीकर म्हणाले.
मुख्यमंत्र्याच्या सरकारी निवासस्थानावर मोर्चा घेऊन आलेल्या खारीवाड्यावरील लोकांनी चर्च चौकातच अडवण्यात आले. यावेळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर, पणजी पोलिस निरीक्षक रमेश गावकर, आगशी पोलिस निरीक्षक विश्‍वेश कर्पे, पर्वरी पोलिस निरीक्षक देवेंद्र गाड, जुने गोवे पोलिस निरीक्षक फ्रान्सिस कॉर्त व अन्य पोलिस उपस्थित होते.
वास्कोत भव्य मोर्चा
दरम्यान, खारीवाडा येथील ६६ घरांवर बुलडोझर फिरवल्याच्या निषेधार्थ येथील हजारो नागरिकांनी मोर्चा काढून या कारवाईची झळ बसलेल्या लोकांच्या पुनर्वसनाची मागणी केली. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत सरकारच्या कृतीचा जोरदार निषेध करण्यात आला. याविषयी दाद मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील निवासस्थानावर धडक देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आणि हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी पणजीच्या दिशेने कूच केले.
एमपीटीच्या विस्तारीकरणात अडथळा ठरत असलेली खारीवाडा येथील घरे पाडण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशांचे पालन करताना येथील ३६३ घरांपैकी ६६ घरे काल पाडण्यात आली होती. इतर २९६ बांधकामे पाडण्यास स्थगिती मिळाल्याने त्यांच्यावरील कारवाईचे संकट काल टळले होते. तर एका संवेदनशील धार्मिक स्थळावर कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. या घटनेमुळे येथे संतापाची लाट उसळली होती.
आज संध्याकाळी येथील नागरिकांनी वास्को शहरातून भव्य असा मोर्चा काढून सरकारकडून अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. खारीवाडा ‘ओल्ड क्रॉस’ येथून सुरू झालेल्या या मोर्चात तीन हजारच्या आसपास नागरिकांनी भाग घेतला होता, यात महिलांचा मोठा सहभाग होता. सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या या रांगेमुळे वास्को शहरातील एफ. एल. गोम्स व स्वतंत्र पथ हे रस्ते व्यापून टाकले होते.
नंतर ‘ओल्ड क्रॉस’ येथे झालेल्या बैठकीत वास्कोचे आमदार तथा मंत्री जुझे फिलिप डिसोझा, मिलिंद नाईक, फादर बिस्मार्क आदींनी मार्गदर्शन केले. येथील ६६ घरे जमीनदोस्त करून त्या ठिकाणी राहणार्‍या कुटुंबांना सरकारने रस्त्यावर आणले आहे. ज्या २९६ घरांना स्थगिती मिळालेली आहे त्यांच्याबाबत सरकार काय पावले उचलणार असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. सरकारला या लोकांचे कोणतेच सोयरसुतक नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आमदार मिलिंद नाईक यांनी या लोकांना पाठिंबा दर्शवताना, आपण विधानसभेत शून्य प्रहरावेळी हा प्रश्‍न उपस्थित केल्याचे सांगितले.
आमदार जुझे फिलिप डिसोझा यांनी जनतेची संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, ‘काल तुम्ही कुठे गेला होतात’ असा सवाल उपस्थित करून त्यांना भंडावून सोडले. आपण तुमच्या सोबत होते, आहे आणि कायम असेन, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. गोवा विकायला काढणार्‍या या सरकारला आम आदमीची कोणतीच काळजी नसल्याचा आरोप फादर बिर्स्माक यांनी केला.
यानंतर हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. पणजी येथे निघालेल्या लोकांसह आमदार मिलिंद नाईक व आमदार जुझे फिलिप डिसोझा यांचा समावेश होता.


मडगाव, दि. १ (प्रतिनिधी)
खारीवाडा येथील संतप्त नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील निवासस्थानावर धडक दिल्याची माहिती मिळताच दिगंबर कामत यांच्या मडगाव येथील निवासस्थानाजवळ कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. मुख्यमंत्री एका कार्यक्रमानिमित्त फोंडा येथे गेले होते, ते थेट मडगावला परतले. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी बंदोबस्त होता.

No comments: