Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 31 March, 2011

पाकचा धुव्वा; भारत अंतिम फेरीत

उत्कंठा शिगेला पोचलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवीत दिमाखात विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम ङ्गेरीत प्रवेश केला. भारतातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींनी भारताचा विजय विश्वकरंडक जिंकल्यासारखाच साजरा केला. उपांत्य ङ्गेरीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानपुढे विजयासाठी ठेवलेल्या २६१ धावांच्या आव्हानासमोर पाकिस्तानला ५० षटकांत २३१ धावांपर्यंतच मजल मारता आली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केलेली अर्धशतकी (८५) खेळी आणि हरभजन सिंग, मुनाङ्ग पटेल, आशिष नेहरा, युवराज सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवीत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ८५ धावा आणि सुरेश रैनाच्या संयमी ३४ धावांच्या जोरावर भारताने क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानपुढे विजयासाठी २६१ धावांचे आव्हान ठेवले. भारताने निर्धारित ५० षटकांत नऊ बाद २६० धावा केल्या. पाकिस्तानच्या वहाब रियाझने भारताचा निम्मा संघ बाद केला.
मोहाली येथील पीसीबी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेङ्गेक जिंकून प्रथम ङ्गलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सेहवाग आणि तेंडुलकर जोडीने भारताला वेगवान सुरुवात करून दिली. अर्थात यात मोठा वाटा सेहवागचा होता. त्याने नऊ चौकारांच्या मदतीने २५ चेंडूत जलद ३८ धावा पटकावल्या. सेहवाग पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समाचार घेत असताना सचिनने साहाय्यक भूमिका घेतली होती.
आक्रमक सुरुवातीनंतर सेहवाग बाद झाल्याने धावांचा वेग थोडा कमी झाला. सेहवागने अवघ्या २५ चेंडूंत ३८ धावा काढून भारताला झंझावाती सुरुवात करून दिली. मात्र, वहाब रियाझने त्याला पायचीत करून पाकिस्तानला मोठा दिलासा मिळवून दिला. सेहवाग बाद झाल्यानंतर धावांचा वेग काहीसा मंदावला, तरीसुद्धा सचिनने गौतम गंभीरच्या साथीने धावङ्गलक सतत हलता ठेवला. गंभीर २७ धावा करून महंमद हङ्गीझच्या गोलंदाजीवर यष्टिचीत झाला. त्यानंतर आलेला कोहली मात्र ङ्गार चमक दाखवू शकला नाही. २१ चेंडूंत केवळ नऊ धावा करून तो रियाझच्याच गोलंदाजीवर बाद झाला.
क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतील चार सामन्यांत भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला युवराज सिंग पाकिस्तानविरुद्ध चाललेल्या उपांत्य सामन्यात भोपळाही न ङ्गोडता बाद झाल्याने भारताला मोठा धक्का बसला. पाकिस्तानच्या वहाब रियाझने युवराजला त्रिफळाचीत केले. घरच्या मैदानावर युवराज आल्यापावली परतल्याने चाहत्यांची मोठी निराशा झाली. वीरेंद्र सेहवागची आक्रमक खेळी संपवणार्‍या वहाब रियाझनेच विराट कोहली आणि युवराजचा बळी घेतला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत महाशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या तेंडुलकरचे शतक या सामन्यात थोडक्यात हुकले. सईद अजमलने सचिनला (८५) शाहीद आङ्ग्रिदीकरवी झेलबाद केले. तेंडुलकर बाद झाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना भारताला मोठी धावसंख्या उभारून देतील अशी अपेक्षा क्रिकेट चाहते बाळगून होते. मात्र २५ धावा करून रियाझच्या गोलंदाजीवर धोनी पायचीत झाला. रैनाने मात्र संयमी खेळी केली. गेल्या काही सामन्यांत ५० षटके खेळू न शकणार्‍या भारतीय संघाने या सामन्यात मात्र ५० षटके खेळून काढली. रैनाला हरभजन सिंग, झहीर खान यांनी चांगली साथ दिली. या सामन्यासाठी भारताच्या संघात आर. अश्विनच्या जागी आशिष नेहराचा समावेश करण्यात आला. पाकिस्तानी संघात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान युसूङ्ग रझा गिलानी उपस्थित होते.

No comments: