Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 30 March, 2011

मातृभाषा टिकली तरच संस्कृती टिकेल : आजगावकर

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): गोव्याला फार मोठी सांस्कृतिक व भाषिक परंपरा आहे. देशाबरोबरच विदेशातसुद्धा गोव्याच्या विविधांगी संस्कृतीबद्दल आकर्षण आहे. ही संस्कृती टिकविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य येथील स्थानिक भाषांनी केले आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच हवे, असे ठाम प्रतिपादन गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष नरेंद्र आजगावकर यांनी केले आहे.
मातृभाषेतून शिक्षण हा जागतिक सिद्धांत आहे. प्राथमिक शिक्षण मराठीत घेतलेले डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भाटकर हे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ होऊ शकतात तर मग प्राथमिक शिक्षण इंग्रजीतूनच हवे ही अनाकलनीय मागणी कशासाठी, असा प्रश्‍न करून श्री. आजगावकर यांनी माजी राष्ट्रपती तथा थोर शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झाले होती याचीही आठवण करून दिली.
श्री. आजगावकर पुढे म्हणाले की, स्वतंत्र गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी गावागावांत शिक्षणाची गंगा नेताना खेड्यापाड्यांत मराठी शाळा उघडल्या व सर्वसामान्यांना शिक्षित केले. या स्थानिक भाषेने गोव्याच्या कला व संस्कृतीचे रक्षण केले. गोव्याची परंपरा ही स्थानिक भाषा असलेल्या मराठी व कोकणी भाषेतून वृद्धिंगत होत आहे. जर सरकारने प्राथमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी केले तर गावागावांत असलेल्या शाळा बंद होतील व काही काळानंतर संस्कृत भाषेप्रमाणे मराठीची स्थिती होईल. इंग्रजी माध्यम झाले तर गोव्यातील भावी पिढी गोव्याच्या मातीपासून दुरावत जाईल व गोव्याच्या कला आणि संस्कृतीचे अतोनात नुकसान होईल, असेही ते शेवटी म्हणाले.

No comments: