Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 25 February, 2009

बेफाम खनिज वाहतुकीचे किर्लपाल येथे दोन बळी, तिसरा विद्यार्थी गंभीर जखमी

कुडचडे व सावर्डे, दि. २४ (प्रतिनिधी): किर्लपाल येथील मुख्य रस्त्यावर आज दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या ट्रक-मोटरसायकल यांच्यातील भीषण अपघातात दोघे विद्यार्थी जागीच ठार झाले असून तिसरा गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे खवळलेल्या जमावाने सुमारे दोन तास खनिज वाहतूक रोखून धरली. त्यानंतर सरकारी अधिकारी तेथे दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या अपघातामुळे साऱ्या गावावर शोककळा पसरली आहे.
सावरगाव येथील सोमनाथ हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांची नावे संगम शिवराम बांदेकर व विशेष उर्फ मयूर दामोदर गावकर अशी असून दोघेही ट्रकखाली चिरडून जागीच मरण पावले. विनोद वासू चणेकर हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला मडगावातील हॉस्पिसियू इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. हे तिघेही परस्परांचे घनिष्ट मित्र होते.
शाळा सुटल्यानंतर हे तिघे स्टार सिटी या (जीए ०९ बी १८८४) मोटरसायकलवरून घरी निघाले होते. किर्लपाल येथील उतरणीवर ते पोहोचले असता समोरून येणाऱ्या टिपर ट्रकने (जीए ०९ यू १७२) त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे संगम आणि विशेष ट्रकखाली चिरडले जाऊन जागीच गतप्राण झाले. ही घटना तेथील एका दुकानदाराने पाहिली व त्याने तातडीने रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. तथापि, त्यापूर्वीच दोन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. सांग्याचा तात्पुरता ताबा असलेले पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाई यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व विच्छेदनासाठी मृतदेह हॉस्पिसियूमध्ये पाठवून दिले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच लोक बिथरले. सुमारे पाचशे जणांच्या जमावाने घटनास्थळी धाव घेऊन दोन तास वाहतूक रोखून धरली. संबंधित ट्रक चालकाला अटक केल्याशिवाय मृतदेहांना हात लावू देणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली. त्यानंतर सांग्याचे मामलेदार पराग नगर्सेकर, सावर्ड्याचे जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप देसाई, शिवसेनेचे राज्य उपप्रमुख नामदेव नाईक, केप्याचे पोलिस उपअधीक्षक तेथे धावून गेले. त्यांनी लोकांची समजूत काढल्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत झाली.
आज जाहीर सभा
दरम्यान, सोमनाथ इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक गिरीश तेंडुलकर यांनी या बेफाम खनिज वाहतुकीसंदर्भात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. जोपर्यंत या वाहतुकीवर कठोर निर्बंध घातले जात नाहीत तोपर्यंत ती चालू दिली जाणार नाही, असे सांगण्यात आले. यासंदर्भात उद्या दुपारी तीन वाजता दाभाळ किर्लपाल पंचायतीत ट्रक मालक संघटना, मामलेदार व किर्लपाल ग्रामस्थांची बैठक बोलावण्यात आल्याचे केपे उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कळवण्यात आले आहे.
दाभाळचे माजी सरपंच अशोक पाटील यांनी सांगितले की, सरकारच्या आशीर्वादानेच ही खनिज वाहतूक बेदरकारपणे सुरू आहे. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही ती अव्याहतपणे सुरूच आहे.
दरम्यान, या अपघातानंतर तेथून पोबारा केलेला ट्रक चालक बिलियम एक्का याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ट्रकही जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाई पुढील तपास करत आहेत.

No comments: