Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 26 April, 2009

वास्कोत दरोडा

वास्को, दि. २५ (प्रतिनिधी)- दाबोळी, जयरामनगर येथील एका प्रशस्त बंगल्यात काल रात्री आठ अज्ञात दरोडेखोरांनी सोनेचांदी व इतर मौल्यवान वस्तू मिळून दोन लाखांचा ऐवज लंपास केला. घरात वृद्ध जोडपे राहत असल्याची संधी साधून त्यांना हत्याराचा धाक दाखवून हा ऐवज लुटण्यात आला. दरम्यान, पोलिसांना अद्याप कोणतेच धागेदोरे सापडले नाहीत.
आज ( दि. २५) पहाटे ३ ते ४ च्या सुमारास ही घटना घडली. जयरामनगर या धनिकांच्या वस्तीमधील लोक साखरझोपेत असताना चौफीन कुटुंबीयांच्या बंगल्याच्या खिडकीच्या काचा काढून आठ अज्ञात दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. त्यांनी सर्वप्रथम क्रिस्टिना चौफीन यांना दंडुक्याच्या साह्याने जागे केले, त्यांच्याच घरातील कपडे काढून आपले तोंड लपवले. "चिल्लाओ मत' व नंतर "डोंट शाऊट' अशा सूचना त्यांनी दिल्या. क्रिस्टिना यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडून कपाटाच्या चाव्या त्यांनी मिळवल्या व आतील सोन्याचांदीचे दागिने व इतर सामान मिळून सुमारे दोन लाखाचा ऐवज घेऊन पळ काढला. जाण्यापूर्वी त्यांनी चौफीन यांच्या घरातील मोबाईल संचही आपल्यासोबत नेल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांना याबाबत कळवल्यास जिवंत मारण्याची धमकी त्यांनी जातेवेळी दिली.
बंगल्यामध्ये फक्त वृद्ध दाम्पत्य राहत असल्याची व कमांडण्ट चौफीन हे एकदम आजारी असल्याची जाणीव त्यांना कशी झाली, असा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला आहे. सदर घटना पहाटे घडली असली तरी उशिरा रात्री पर्यंत वास्को पोलिस यासंदर्भात काहीही बोलण्यास तयार नसल्याचे दिसून आले.
दरोडा घालण्यासाठी आलेले आठही दरोडेखोर केवळ चड्डीवर आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. वृद्ध पती पत्नीच्या हातातील अंगठ्याही त्यांनी या वेळी काढून नेल्याचे उघड झाले आहे.
वास्को पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या साह्याने पंचनामा केला असून गुन्हा नोंदवला आहे. दरोडा घालण्यासाठी आलेल्या सर्व अज्ञातांजवळ दंडुका, स्क्रू-ड्रायव्हर सारखी हत्यारे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलिस निरीक्षक ब्राझ मिनेझीस यांनी "गोवा दूत'शी बोलताना या गोष्टींना दुजोरा दिला.
दरम्यान वास्को पोलिस याबाबत अधिक तपास करत असल्याचे सांगून अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. वास्कोमध्ये दुकानफोडी, मंदिरामध्ये चोरीची प्रकरणे, फ्लॅट फोडून चोऱ्या करण्याच्या प्रकारांत यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पोलिसांची झोप उडाली आहे.

No comments: