Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 26 April 2009

योगिता नाईक व दर्शना नाईक खून प्रकरणांना वाचा फुटली

फोंडा, दि.२५ (प्रतिनिधी) : शिरोडा येथील एका युवतीवर बलात्कार प्रकरणी फोंडा पोलिसांनी अटक केलेल्या तरवळे शिरोडा येथील महानंद आर. नाईक याने फोंडा भागातील दोन युवतींचा खून केल्याची कबुली दिली आहे.
योगिता खुशाली नाईक ( नागझर कुर्टी) आणि कु. दर्शना तुकाराम नाईक (शिरोडा) अशी खून करण्यात आलेल्या युवतींची नावे आहेत. योगिता हिची मोर्ले सत्तरी येथे गळा आवळून आणि दर्शना नाईक हिचा बांबोळी येथे खून करण्यात आला आहे. चोरीच्या उद्देशाने हे दोन्ही खून करण्यात आल्याचे फोंड्याचे पोलिस उपअधीक्षक सेराफीन डायस यांनी सांगितले.
नागझर कुर्टी येथे कु. योगिता नाईक बेपत्ता प्रकरणी फोंडा पोलिस चौकशी करीत असताना शिरोडा येथील एका युवतीवरील बलात्कार प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर आता योगिता नाईक आणि दर्शना नाईक यांच्या खून प्रकरणाला वाचा फुटली आहे. नागझर कुर्टी येथील प्रमोद खुशाली नाईक यांनी १२ जानेवारी ०९ रोजी त्याची बहीण कु. योगिता खुशाली नाईक (३० वर्षे) बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. बाजारमळ फोंडा येथे एका समारंभाला जाते असे सांगून कु. योगिता घरातून बाहेर पडली होती. यावेळी तिने अंगावर सोळा ग्रामाची सोनसाखळी, चार सोन्याच्या बांगड्या, कानात सोन्याची कर्णफुले, सोन्याची अंगठी आहे तक्रारीत म्हटले होते.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी कु. योगिता हिच्या मोबाईल क्रमांकाची सविस्तर माहिती संबंधित मोबाईल कंपनीकडून मिळविली. ह्या माहितीची तपासणी करताना एक मोबाईल क्रमांक योगिता हिच्याशी सतत संपर्कात होता. पोलिसांनी सदर मोबाईल क्रमांक धारकाचा पत्ता शोधून त्याला चौकशीसाठी पोलिस स्टेशनवर बोलावून घेतले. सदर व्यक्तीने आपला हा मोबाईल फोंडा ते सावर्डे मार्गावर प्रवास करताना जून - जुलै २००८ मध्ये हरवल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल कंपनीशी संपर्क साधून सदर क्रमांकाची अधिक चौकशी केली. सदर क्रमांकाचे सीम कार्ड चार मोबाईल हॅण्डसेट मध्ये घालून वापरण्यात आलेले आहे, अशी माहिती प्राप्त झाली. त्यानंतर ज्याच्या मोबाईल मध्ये सिमकार्ड घालण्यात आले त्या सर्वांना पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केले. त्यात एका मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या मॅकेनिकचा समावेश होता. महानंद नाईक आणि एका युवतीला चौकशीसाठी बोलाविण्यात आले. सदर युवतीकडील सिमकार्ड महानंद वापरीत असल्याची माहिती त्या युवतीने पोलिसांना दिली. तरीही महानंद ह्या प्रकरणी आपला काहीच सहभाग नसल्याचे पोलिसांना सांगत होता. गेल्या चार वर्षापासून महानंद आपल्याला ब्लॅकमेल करीत असून धमकी देऊन आपल्यावर बलात्कार करीत आहे, अशी तक्रार त्या युवतीने केली. त्यानंतर पोलिसांनी महानंद याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महानंद फोंड्यात आला होता. त्यावेळी त्याने योगिता हिच्याशी ओळख केली आणि तिचा मोबाईल क्रमांक घेतला होता. महानंद हा त्याला सापडलेल्या मोबाईलवरून योगिता व इतरांशी संपर्क करीत होता. ६ ते १० जानेवारी ०९ पर्यंत महानंद याने योगिता हिच्याशी भरपूर वेळा संपर्क साधला. ज्या दिवसापासून योगिता बेपत्ता झाली त्या दिवसापासून दोन्ही मोबाईल क्रमांक बंद ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी महानंद याला उलटसुलट प्रश्न विचारून तपास केला. तरीही त्याने कबुली दिली नव्हती. आपण बोरी व फोंड्याच्या बाहेर गेलेलो नाही, असे महानंद याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी मोबाईल कंपनीशी संपर्क साधून चौकशी केली असता १० जानेवारी ०९ रोजी महानंद हा साखळी येथे असल्याची माहिती उजेडात आली. त्यानंतर पोलिसांनी आपला हिसका दाखविल्यानंतर महानंद याने खुनाची कबुली दिली. योगिता हिने अंगावर घातलेले दागिने चोरण्यासाठी संशयित महानंद याने तिला १० जानेवारी ०९ रोजी साखळी मार्गे मोर्ले सत्तरी येथील एका काजू बागायतीमध्ये नेऊन तेथे तिचा गळा आवळून खून केला. कु. योगिता हिची ओळख पटू नये म्हणून तिच्या अंगावर मोजकेच कपडे ठेवले. तिचे इतर कपडे व दागिने सोबत घेऊन पलायन केले. चोरण्यात आलेले दागिने डिचोली येथील एका सोनाराला विकण्यात आले, अशी कबुली संशयित महानंद नाईक याने दिली आहे. खून करण्यात आलेली जागा संशयित महानंद याने पोलिसांना दाखविली आहे. १५ जानेवारी ०९ रोजी एका युवतीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वाळपई पोलिसांना मोर्ले येथे काजू बागायतीमध्ये आढळून आलेला आहे. महानंद याच्या विरोधात भा.दं.सं.च्या ३९२, ३०२, २०१ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच पद्धतीने १९९४ साली शिरोडा येथील कु. दर्शना तुकाराम नाईक हिचा बांबोळी येथे खून केल्याची कबुली संशयित महानंद नाईक याने दिली आहे. यासंबंधी पोलिसांनी आगशी पोलिसांशी संपर्क साधून चौकशी केली असताना संशयास्पद स्थितीत एका युवतीचा मृतदेह आढळून आलेला आहे, असेही पोलिस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी सध्या तपास जोरात सुरू आहे. उत्तर गोव्याचे अधीक्षक टोनी फर्नांडिस, उपअधीक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील, उपनिरीक्षक संजय दळवी या प्रकरणी तपास करीत आहेत.

No comments: