Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 30 April, 2009

संधिसाधूंना प्रवेशास मगोत वाढता विरोध

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांना मगो पक्षात फेरप्रवेश देण्यासंबंधी सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे. पक्षातील एक गट ऍड. खलप यांच्या फेरप्रवेशास अनुकूल आहे तर दुसरा गट मात्र या प्रस्तावास तीव्र विरोध करत आहे. मगोच्या "सिंहा'चा वापर केवळ आपले राजकीय हित साधण्यासाठी केलेल्या आणि पक्षाचा विश्वासघात करून अन्य पक्षात उडी घेतलेल्यांना अजिबात थारा देता कामा नये, अशी भूमिका या गटाने घेतली आहे. नव्या दमाच्या युवकांनी पक्षात खुशाल प्रवेश करावा व राजकारणात सक्रिय बनून पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी प्रतिक्रिया या गटातील नेत्यांनी व्यक्त केली आहे. या गटाला ढवळीकर बंधूंचाही पूर्ण पाठिंबा असल्याची माहिती मिळाली आहे.
माजी केंद्रीय कायदामंत्री तथा एकेकाळचे मगोचे सर्वेसर्वा ऍड. रमाकांत खलप यांना पुन्हा एकदा मगो पक्षात आणून पक्षाच्या संघटनेची फेररचना करण्याचा प्रयत्न एका गटाने चालवला आहे. ऍड. खलप यांची कॉंग्रेस पक्षात फरफट सुरू आहे, त्यांना संघटनात्मक पातळीवर कोणतेही स्थान देण्यात आले नाही. यावेळी उत्तर गोव्याची उमेदवारी त्यांना मिळू नये यासाठीही कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केले होते, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, मगो पक्षातून कॉंग्रेसमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आल्याने आता पुन्हा एकदा मगोच्या नावाने आपली गमावलेली पत मिळवण्यासाठी काही नेत्यांनी ही शक्कल लढवली आहे. पक्षातील काही कार्यकर्त्यांना पुढे करून या नेत्यांना परत पक्षात बोलावण्याचे नाटक करून वातावरण निर्मिती करण्याचे काम सुरू असल्याची माहिती एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.
कॉंग्रेसकडून मगो 'हायजॅक' करण्याचा प्रयत्न
भाजपची राज्यात वाढती ताकद रोखायची असेल तर मगो पक्षाला संजीवनी देण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षातील काही नेत्यांकडून आपल्या सूत्रांच्या साहाय्याने मगो पक्षातील जुन्या नेत्यांच्या फेरप्रवेशाचे नाट्य रचत असल्याची माहिती देण्यात आली. मगो व भाजप हा काही प्रमाणात समविचारी पक्ष असल्याने हे दोन्ही पक्ष कोणत्याही परिस्थितीत एकत्र येता कामा नये, यासाठी कॉंग्रेसचे हे नेते सक्रिय बनले आहेत. दरम्यान, पक्षाच्या केंद्रीय समितीवरील काही पदाधिकारी हे कॉंग्रेसचे "दलाल' असल्याची प्रतिक्रियाही एका नेत्याने व्यक्त केली. या लोकांकडून पक्षाची इत्थंभूत माहिती सत्ताधाऱ्यांकडे पोचवली जाते, असेही यावेळी सांगण्यात आले. या पदाधिकाऱ्यांना येत्या काही दिवसांत लक्ष्य बनवण्याची तयारीही सुरू झाली आहे. दरम्यान, कॉंग्रेस पक्षातील जुन्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन ढवळीकर बंधूंचे पक्षावरील वर्चस्व संपुष्टात आणण्याचा घाट काही नेत्यांनी घातला असल्याने ढवळीकर बंधूंचा गटही मोठ्या प्रमाणात सतर्क बनल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
युवकांना प्राधान्य ः सुदिन ढवळीकर
मगो पक्षातून केवळ आपल्या स्वार्थासाठी उडी घेऊन आपले राजकीय हित साधलेल्या नेत्यांमुळे हा पक्ष पूर्णपणे मोडकळीस आला होता. परंतु, प्रामाणिक कार्यकर्त्यांनी स्वबळावर या पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर व पांडुरंग राऊत यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात महत्त्वाचे योगदान दिले. आता या पक्षाची धुरा नव्या दमाच्या नेतृत्वाकडे जाण्याची गरज असताना पुन्हा एकदा जुन्या नेत्यांना पक्षात आणून काय साधणार, असा सवाल वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला. पक्षाचा विस्तार व या पक्षाला पुन्हा नव्याने गतवैभव मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता नवे नेतृत्व तयार करण्याची व त्यांना पाठिंबा देण्याची गरज असून त्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही ढवळीकर यांनी यावेळी केले.
मी अद्याप कॉंग्रेसचाच : ऍड.खलप
मगो पक्षात आपले असंख्य चाहते व हितचिंतक आहेत व या पक्षाबद्दल अद्यापही आपल्या मनात आत्मीयता आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण कॉंग्रेस पक्षात आहे व मगो पक्षात फेरप्रवेश करण्याबाबत आपण काहीच निर्णय घेतला नाही, अशी प्रतिक्रिया ऍड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केली. विद्यमान सरकारने आपल्याला कायदा आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. मगो पक्षाने सुरुवातीच्या काळात अनेक लोकोपयोगी कायदे तयार केले होते व त्याची माहितीही कोणाला नाही. या कायद्यांना कार्यन्वित करून त्याचा लाभ सर्वसामान्य लोकांना करून देण्याचे कार्य आपल्याला या संधीमुळे मिळणार असल्याने या पक्षाबाबतची भावना आपण याद्वारे पूर्ण करणार, असेही त्यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्षात प्रवेश करताना आपले असंख्य कार्यकर्ते व हितचिंतकही या पक्षात आले पण त्यांची दखल मात्र घेतली नसल्याने ते नाराज बनले आहेत. पक्षाने यावेळी आपल्याला उमेदवारी नाकारली तरी विधानसभा व लोकसभेची उमेदवारी यापूर्वी दिली. त्यामुळे आपल्यावर पक्षाने अन्याय केला, यात तथ्य नाही. सध्याचे राजकारण हे पैशांच्या भोवती केंद्रित झाल्याने राजकीय नेते स्वत्व हरवत चालले आहेत. आता युवकांनी पुढे येऊन ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. युवकांनी राजकारणाच्या शुद्धीकरणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यास त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्यास तयार आहे, असेही ते शेवटी म्हणाले.

No comments: