Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 29 April 2009

कसाब 'बच्चा' नाही, वैद्यकीय अहवालात निर्वाळा

मुंबई, दि. २८ : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पकडण्यात आलेला आरोपी मोहम्मद अजमल कसाब हा अल्पवयीन नाही. त्याचे वय २० वर्षांपेक्षा जास्त आहे, असा स्पष्ट निर्वाळा येथील जे. जे. हॉस्पिटलच्या चार डॉक्टरांच्या चमूने आज विशेष न्यायालयासमोर दिला. दरम्यान, या संदर्भात कसाबचे वकील अब्बास काझमी उद्या साक्षीदारांची उलटतपासणी घेणार असून, त्यानंतरच कसाब अल्पवयीन आहे की नाही, याचा अंतिम निर्णय न्यायालय करणार आहे.
अतिरेकी कसाबचे वकीलपत्र घेतल्यानंतर ऍड. अब्बास काझमी यांनी तो साडेसतरा वर्षांचा असल्याचा दावा केला होता, हे येथे उल्लेखनीय. कसाब लहान असल्याने त्याचा खटला अल्पवयीन मुलांचे खटले ज्या न्यायालयापुढे चालतात तेथे चालवण्यात यावा, अशी मागणी कसाबचे वकील आझमी यांनी केली होती. त्यानुसार कसाबच्या वयाची खात्री करून घेण्यासाठी जे. जे. हॉस्पिटलच्या फोरेन्सिक सायन्स विभागाच्या चार डॉक्टरांची एक चमू नेमण्यात आली होती. या चमूने कसाबच्या वैद्यकीय व शारीरिक चाचण्या घेतल्या. या चमूचा वैद्यकीय अहवाल आज विशेष न्यायालयासमोर ठेवण्यात आला. कसाबचे वय २० वर्षांपेक्षा जास्त आहे, असे या अहवालात या चारही डॉक्टरांनी स्पष्ट नमूद केले आहे.
कसाबला २६ नोव्हेंबरच्या रात्री अटक केल्यानंतर त्याला तपासणीसाठी नायर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्यामुळे नायरच्या ट्रॉमा वॉर्डचे डॉ. व्यंकटरमण मूर्ती व ऑर्थर रोड कारागृहाच्या अधीक्षक स्वाती साठे यांच्याही साक्षी नोंदवण्यात आल्या. कसाबला नायर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले त्यावेळी त्याने आपले वय २१ असल्याचे सांगितले होते, असे डॉ. मूर्ती यांनी सांगितले तर २६ डिसेंबर २००८ ला जेव्हा कसाबला ऑर्थररोड येथे आणण्यात आले त्यावेळी तेथेही त्याने आपले वय २१ असल्याचे, तसेच आपली जन्मतारीख १३ सप्टेंबर १९८७ असल्याचे सांगितले होते, अशी माहिती स्वाती साठे यांनी दिली.
दरम्यान, कसाबचे वकील काझमी उद्या साक्षीदारांची उलटतपासणी घेणार आहेत. नायर हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व मेडिकल रेकॉर्डस असिस्टंट यांनाही साक्षीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यानंतरच कसाब अल्पवयीन आहे की नाही याचा निर्णय न्यायालय देणार आहे.

No comments: