Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 2 May 2009

धर्मद्रोह्यांविरुद्ध एकत्र या - ब्रह्मेशानंदाचार्य


श्री सातेरी व पाईकदेव मूर्तिप्रतिष्ठापना सोहळा


सांगे, दि. १ (प्रतिनिधी)- पाईकदेव म्हणजे रक्षण करणारा देव, शेवटी आपली आशा देवावरच असते. पूर्वजांनी याच कारणास्तव मठ-मंदिरांची निर्मिती करून ठेवली आहे. २००४ साली घडलेल्या मूर्तिभंजनानंतर सांगेवासीयांनी उचललेले पाऊल उल्लेखनीय आहे. हिंदू समाजाला संपवण्याच्या हेतूने धर्मद्रोह्यांनी केलेल्या प्रकारातून उलट समाज एकत्र आला आहे, हाच अशा प्रकारांवर योग्य उपाय आहे, असे प्रतिपादन कुंडई पीठाचे पीठाधीश प.पू.ब्रह्मेशानंदाचार्य यांनी केले.
व्हाळशे सांगे येथे २००४ साली उद्ध्वस्त करण्यात आलेल्या श्री सातेरी व पाईकदेव मंदिराच्या मूर्तिप्रतिष्ठापना व जीर्णोद्धार कार्यक्रमात आशीर्वचनात त्यांनी वरील उद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, आमदार वासुदेव मेंग गावकर, राजेंद्र सुभाष वेलिंगकर, माजी आमदार पांडू वासू नाईक, दीपक मराठे, दीपक नाईक, जयेश थळी, जयेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. मंदिर जीर्णोद्धार व मूर्तिप्रतिष्ठापना सोहळा भक्तगणांच्या अपूर्व उत्साहात ऐतिहासिक स्वरूपात पार पडला. स्वामीजींच्या उपस्थितीत प्रथम श्री सातेरी देवी व नंतर श्री पाईकदेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक विधी तसेच सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले.
व्यासपीठावरील कार्यक्रमापूर्वी प.पू. ब्रह्मेशानंदाचार्यांचे स्वागत करण्यात आले. श्री. व सौ. दीपक राघोबा नाईक यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली.
आशीर्वचनपर भाषणात बोलताना प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य पुढे म्हणाले की, मंदिरे हिंदू समाजाचा प्राणवायू आहे, त्यावर आघात होता कामा नये. हिंदू समाजावर अत्याचारानंतर आता मंदिरे उद्ध्वस्त करणारी शक्ती प्रबळ झाली आहे. हिंदूंची श्रद्धास्थाने उद्ध्वस्त केल्यावर हा समाज संपणार असा दुष्ट हेतू यामागे आहे, हा डाव कधीच सफल होणार नाही, असेही स्वामीजींनी सांगितले.
स्वामीजी पुढे म्हणाले की, देवाचे कार्य हेच आपले कार्य असे मानून पुढे येणाऱ्यांना धार्मिक असे म्हटले जाते. राजकारण्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मंदिरातून प्रयत्न झाले पाहिजेत. हिंदूंच्या हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजकारण्याला धडा शिकवला पाहिजे. हिंदू धर्माचे प्रत्येक शास्त्र महत्त्वाचे आहे. योगशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र हे जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे आहे. मंदिरनिर्मिती अभिमानाची गोष्ट असून त्यातून सुरक्षा व जागृतीसाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे स्वामीजींनी शेवटी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना राजेंद्र वेलिंगकर यांनी भारतीय जीवन पद्धती मार्गदर्शक असल्याचे सांगितले. भारतावर पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण रोखण्यासाठी मंदिरे, शाळा व्यवस्थित चालल्या पाहिजेत. हिंदुत्व टिकले तरच जगाचे सामर्थ्य टिकेल असे सांगताना केवळ मंदिरनिर्मिती करून हे साध्य होणार नाही तर सतत सुरक्षा, सेवा व संस्कार त्याद्वारे निर्माण करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
आमदार वासुदेव गावकर यांनी स्वागत केले. मनोहर पर्रीकर, जयेश नाईक, दीपक मराठे, चंद्रकांत गावकर यांनी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन सुरेश भंडारी यांनी केले.

---क्षणचित्रे----

मूर्तिभंजनानंतर आयोजित जीर्णोद्धार व मूर्तिप्रतिष्ठापना सोहळ्याला जनसागर लोटला होता.
२००४ साली घडलेल्या प्रकारानंतर सांगेवासीयांनी दाखवलेल्या धाडसाचे अनेकांनी कौतुक केले.
भाविकांच्या स्वागतासाठी १४ किमी अंतरापासून नाक्यानाक्यावर कमानी उभारण्यात आल्या होत्या.
विशेष उपस्थितांमध्ये भाजपचे दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार ऍड. नरेंद्र सावईकर, माजी आमदार विनय तेंडुलकर, आमदार महादेव नाईक आदींचा समावेश होता.
देवदर्शनासाठी दुपारपासून लांब रांगा लागल्या होत्या.
शहनाईस्वरात नगाड्याच्या तालावर वाजणारे भारतीय संगीत सर्वांसाठी आकर्षण ठरले होते.
भाविकांद्वारे परिसराची सुरेख सजावट करण्यात आली होती.

No comments: