Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 2 May, 2009

राज्यात तीव्र पाणीटंचाई

पणजी, फोंडा व काणकोण, दि.१ (प्रतिनिधी)ः राज्यात विविध ठिकाणी सध्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष्य मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने येत्या काही दिवसांत पाण्याचे महासंकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे उष्माघाताची शक्यता वर्तवून सरकार लोकांना सतर्क करत आहे व जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन करत आहे तर दुसरीकडे नळ कोरडे पडत चालल्याने लोकांचे घसे कोरडे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साळावली धरणातील पाण्याची पातळी खालावत चालल्याने ही समस्या अधिक गंभीर बनण्याची शक्यता असून दक्षिण गोव्यात येत्या काळात पाण्यासाठी वणवण करण्याची पाळी जनतेवर येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मे महिन्याला नुकतीच सुरुवात झाली असून राज्यात पाण्याच्या टंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विविध ठिकाणी असलेल्या जलाशयातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. विविध तालुक्यातील अनेक भागांत नळ कोरडे पडल्याच्या तक्रारी असून लोकांना कित्येक अंतर चालत जाऊन विहिरींचे पाणी आणावे लागत असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष करून दक्षिण गोवा हा पूर्णपणे साळावली धरणावर अवलंबून असल्याने व साळावली धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने येत्या काही दिवसांत दक्षिणेत लोकांना पाण्यासाठी तळमळ करावी लागणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाने मात्र ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. राज्यात उन्हाळ्यात पुरेसे पाणी विविध जलाशयात असून लोकांनी चिंता करण्याची गरज नाही, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
निर्बंधामुळे फोंड्यात पाण्याची कमतरता
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे ओपा पाणी प्रकल्पातून येथील फोंडा शहर आणि तालुक्याला पाण्याचा पुरवठा करण्यात येत असला तरी खांडेपार नदीतील पाणी खेचण्यावर निर्बंध घालण्यात आल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. प्रतिदिन सुमारे २० एमएलडी पाणी कमी खेचण्यात येत असल्याने फोंडा विभागात नियंत्रित पाण्याचा पुरवठा होत असून शहराबरोबर शिरोडा, उसगाव, प्रियोळ, मडकई, आगापूर आदी अनेक भागातील लोकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कारकिर्दीत खांडेपार नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधून नदीचे पाणी अडवून ठेवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या योजनेमुळे उन्हाळ्याच्या दिवसात ओपा पाणी प्रकल्पाला भेडसावणारी पाण्याची समस्या आता दूर झाली आहे. ओपा प्रकल्पातील पाण्याची सध्याची पातळी सुमारे सव्वा दोन मीटर आहे. गांजे येथील बंधाऱ्यातील म्हादई नदीचे पाणीसुध्दा खांडेपार नदीकडे वळवण्यात आले आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खांडेपार नदीतील पाण्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम जलस्रोत खात्यातर्फे करण्यात येत आहे. याच खात्यातर्फे नदीतील पाण्याचा साठा करण्यासाठी बंधारे बांधण्यात आले आहेत. ओपा पाणी प्रकल्पाला आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जलस्रोत खात्याची असल्याने ओपा खांडेपार येथील नदीतील पाणी खेचण्यावर जलस्रोत खात्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निर्बंध घातले आहे. परिणामी पाणी पुरवठा विभागातर्फे नदीतून कमी प्रमाणात पाणी खेचण्यात येत आहे. ओपा प्रकल्पातून फोंडा व तिसवाडी या दोन तालुक्यांना पाण्याचा पुरवठा केला जातो. फोंडा पाणी पुरवठा विभागाला दर दिवशी २० एमएलडी पाणी कमी मिळत असल्यामुळे संध्याकाळी ४ ते सकाळी ८ (१६ तास) यावेळेत लोकांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. शहरात समपातळीवर पाण्याची टाकी असलेल्या लोकांना पाण्याचा पुरवठा होत असला तरी उंच भागात असलेल्या लोकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे.
फोंडा, शिरोडा, मडकई आणि प्रियोळ या चारही मतदारसंघात विविध भागात टॅंकर्सद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ओपा पाणी प्रकल्पातून शिरोडा बोरी भागात पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पंचवाडी येथील म्हैसाळ धरणातून पंचवाडी भागात पाण्याचा पुरवठा केला जात आहे. हा पाण्याचा पुरवठा अपुरा असल्याने दुर्गम भागातील लोकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यामुळे अनेक भागात टॅंकर्सद्वारे पाण्याची पुरवठा केला जात आहे. बेतोडा निरंकाल या भागातसुध्दा अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मडकई मतदारसंघात अनेक भागात मुबलक प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नसल्याने टॅंकर्सद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तिस्क उसगाव भागात सुद्धा लोकांना पाण्यासाठी त्रास सहन करावे लागत आहेत.
सावईवेरे, वळवई, केरी या भागामध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची टंचाई निर्माण होते. या भागात अनेक कारणांमुळे ओपा पाणी प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा होत नाही. त्या भागात विहिरी आणि कूपनलिका खोदून पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत विहिरी आणि कूपनलिकांना योग्य प्रकल्पात पाणी मिळत नसल्याने पाणी टंचाई निर्माण होते. या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. माजी आमदार विश्र्वास सतरकर यांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सुजल प्रकल्प आपल्या कारकिर्दीत कार्यान्वित केला होता. स्थानिक विहिरी, पारंपरिक तळी यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याची ही योजना होती. मात्र, या योजनेकडे दुर्लक्ष झाल्याने पाणी समस्या कायम आहे. या भागात होणाऱ्या पाणी टंचाईचा अभ्यास करून योग्य योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे.
काणकोणातही पाणी टंचाई
मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून काणकोण तालुक्यात तीव्र पाणी टंचाई भासू लागली असून पाळोळे भागात आजही पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला नव्हता, अशी माहिती काणकोणचे माजी उपनगराध्यक्ष दयानंद पागी यांनी दिली.
पाळोळे भागात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ पाळोळे येथील सुमारे शंभर नागरिकांनी सकाळी माजी उपनगराध्यक्ष दयानंद पागी यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा नेऊन साहाय्यक अभियंते श्री. कायरो यांना निवेदन सादर केले होते. परंतु, याचा पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांवर कोणताच परिणाम झाला नसल्याचे श्री. पागी यांनी आज येथे बोलताना सांगितले.
गावडोंगरी व खोतीगाव पंचायत क्षेत्रातील नागरिकांना पाण्यासाठी दोन-दोन किलोमीटर पायी चालत जावे लागत आहे. काही नागरिक ओहोळात खड्डे खणून पाणी करवंटीने मडक्यात भरून दिवस काढत असल्याची माहिती खोतीगावचे शांताराम देसाई यांनी दिली. गावडोंगरी पंचायत क्षेत्रात खाजगी पिकअपद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी तो अनियमित असल्याने नागरिकांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे गावडोंगरी येथील प्रवीण नागेश देसाई यांनी सांगितले. काणकोण पालिका क्षेत्रातील पाणयेफोंड येथील नळांना रात्रीच्या वेळी पाणी येत असल्याने महिलांना अहोरात्र जागे राहावे लागत आहे, अशी माहिती तेथील गोपाळ मोखर्डकर यांनी दिली.
पैंगीण पंचायत क्षेत्रातील वेलवाडा, गाळये, खावट या भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती येथील नागरिक जनार्दन भंडारी यांनी दिली. वाहनांद्वारेही नियमितपणे पुरवठा होत नसल्याची त्या भागातील महिलांची तक्रार आहे. खाजगी वाहने भाडेपट्टीवर घेऊन पाणीपुरवठा केला जात असला तरी पंपाद्वारे खेचण्यात येणाऱ्या विहिरींचे पाणी आटल्याने भयंकर समस्या निर्माण झाल्याची माहिती साहाय्यक अभियंता आशिष कायरो यांनी दिली आहे.
चापोली लघू धरण तसेच अर्धफोंड ओहोळाचे पाणी संपूर्ण काणकोण तालुक्यात वितरित करण्यात येत असल्याने हा प्रसंग ओढवला असल्याचे पाणीपुरवठा खात्याच्या एका कनिष्ठ अभियंत्याने मान्य केले. काणकोण तालुक्यात सुमारे चौदा खाजगी पिकअप तसेच खात्याचे दोन टॅंकरही पाणीपुरवठा करत आहेत. दरम्यान, चापोली लघू धरणातील पाण्याची पातळी बरीच खाली गेली असली तरी धरणात मुबलक पाणी असल्याचे जलस्रोत खात्याचे साहाय्यक अभियंता गोपीनाथ देसाई यांचे म्हणणे आहे. काणकोण तालुक्यात यंदा सुमारे १३० इंच पाऊस पडला होता. ८ ऑगस्ट २००८ रोजी चापोली धरण पाण्याने पूर्ण भरून वाहत होते. चापोली धरणाची पातळी ३६.५ मिलीयन क्युबिक मीटर तर क्षमता ३८. २५ मिलीयन क्युबिक मीटर एवढी आहे. असे असतानाही पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने काणकोण तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

... तर २५ मे पासून राज्याचा पाणीपुरवठा बंद
सार्वजनिक बांधकाम खात्यातील सुमारे दोन हजार कंत्राटी कामगारांच्या मागण्यांविषयी कामगार आयुक्तांकडून सुरू असलेली चालढकल संपली नाही तर येत्या २५ मे रोजी बेमुदत संपावर जाणार, असा इशारा कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिला आहे. सुमारे दोन हजार कामगार गेली दहा ते पंधरा वर्षे सा.बां.खा.त कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. या कामगारांना डावलून नव्या कामगारांची थेट व नियमित भरती केली जात आहे. यापूर्वी संपाची नोटीस दिली असता सरकारने चर्चेची तयारी दर्शवली व त्यामुळे संपाचा निर्णय स्थगित करण्यात आला. आता चर्चेचे निमित्त साधून कामगार आयुक्तांकडून वेळकाढू धोरण अवलंबले जात आहे. सरकारकडून या कामगारांप्रति सुरू असलेली थट्टा यापुढे अजिबात सहन करणार नाही. हे सर्व कामगार राज्यातील विविध पाणी पुरवठा प्रकल्पांवर कार्यरत आहेत, ते २५ मे पासून संपावर गेल्यास संपूर्ण राज्याचा पाणी पुरवठा बंद होणार आहे. सरकारने तात्काळ या कामगारांचा प्रश्न सोडवावा, अन्यथा परिणामांना हे सरकार जबाबदार असेल, असेही फोन्सेका यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments: