Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 May, 2009

तिसऱ्या टप्प्यात ५० टक्के मतदान


जम्मू-काश्मिरात २५ टक्के मतदान


नवी दिल्ली, दि. ३० - देशातील पंधराव्या लोकसभेसाठी ९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांतील १०७ मतदारसंघांत आज तिसऱ्या टप्प्यात सुमारे ५० टक्के मतदान झाल्याची माहिती साहाय्यक निवडणूक आयुक्त आर. बालकृष्णन यांनी दिली. काही तुरळक घटना वगळता देशातील सर्वच भागांत आज मतदान सुरळीतपणे व शांततेत पार पडले, असेही त्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग मतदारसंघात आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर फुटीरवादी संघटनांच्या नेत्यांनी ५० तासांच्या बंदचे आवाहन केले होते. हे बंदचे आवाहन झुगारून असंख्य मतदारांनी या संवेदनशील मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावल्यामुळे तेथे आज २५ टक्के मतदानाची नोंद झाली. आज तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात सर्वांत कमी मतदान जम्मू-काश्मीरमध्ये तर सर्वाधिक ६५ टक्के मतदान सिक्कीममध्ये नोंदवले गेले. पहिल्या दोन टप्प्यांच्या पाठोपाठ आज बिहारमध्ये पुन्हा एकदा कमी मतदान झाले. बिहारमध्ये ४८ टक्के मतदान झाले.
गुजरातमधील सर्वच्या सर्व म्हणजे २६ मतदारसंघांत आज मतदान झाले आणि राज्यात एकूण ५० टक्के मतदान नोंदवले गेले. गुजरातपाठोपाठ भाजपचे शासन असलेल्या कर्नाटक राज्यातही आज भरपूर मतदान होऊन तेथे ५७ टक्के मतदानाची नोंद झाली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशात प्रत्येकी ४५ टक्के, तर दादरा-नगर हवेली व दमण-दीव या दोन्ही केंद्रशासित प्रदेशात प्रत्येकी ६० टक्के मतदान झाले. देशातील इतरत्र उष्णतेच्या लाटेमुळे कमी मतदान झाले असले तरी पश्चिम बंगालमध्ये मात्र लोकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. त्यामुळेच डाव्यांचे राज्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ६४ टक्के मतदान झाले.
कॉंग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह एकूण १५६७ उमेदवारांचे भाग्य आज तिसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर मशीनबंद झाले. आज तिसऱ्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने १,६५,००० मतदान केंद्रे स्थापन केली होती. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ६ लाख मतदान अधिकारी तैनात करण्यात आले होते.
तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर आता अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, दादरा-नगर हवेली, दमण-दीव, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मेघालय, मिझोराम, नागालॅण्ड, सिक्कीम, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, आसाम, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, ओरिसा, महाराष्ट्र या सर्व राज्यांमधील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्वांचे लक्ष आता १६ मे रोजी होणाऱ्या निकालाकडे लागले आहे. शनिवार १६ मे रोजी या निवडणुकीची एकत्रित मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी, चौथ्या व पाचव्या टप्प्याचे मतदान अनुक्रमे ७ व १३ मे रोजी होणार आहे.

No comments: