Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 28 April, 2009

भाजप यंदा १८० ते २०० जागा जिंकेल - व्यंकय्या



मुंबई, दि. २७ - पंधराव्या लोकसभा निवडणुकीचा ज्वर देशभर जाणवू लागलेला असून सुर्यनारायणासोबतच नेतेमंडळीदेखील वातावरण तापवायचे काम करत आहेत. तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येत असतानाच देशाच्या आर्थिक राजधानीत राष्ट्रीय नेत्यांनी जोरदार प्रचार आरंभला शिवसेना भाजप तर यंदा चांगलेच जोशात असल्याचे जाणवते. या पार्श्वभूमीवर, भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी तर यंदा भारतीय जनता पक्षाला १८० ते २०० जागा मिळणे कठीण नसल्याचे प्रतिपादन केले आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अन्य घटक पक्षांच्या साथीने यंदा आम्हीच सरकार स्थापन करू, असा विश्वास त्यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
कॉंग्रेसला लक्ष्य करताना त्यांनी आज चौफेर फटकेबाजी केली. प्रादेशिक पक्ष हे देशविरोधी असल्याच्या कॉंग्रेसच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी प्रादेशिक पक्ष ही देशाची गरज असल्याचे नमूद करत कॉंग्रेसच्या सोबत असलेले संपुआतील घटक पक्ष कॉंग्रेसच्या धोरणांना कंटाळून आज त्यांना सोडून जात आहेत याकडे लक्ष वेधले. शिवसेना, अकाली दल सारख्या पक्षांनी विशिष्ट तत्वे जपून प्रादेशिक स्तरावर पक्षांची बांधणी केली व त्या तत्वांशी कॉँग्रेसप्रमाणे प्रतारणा केली नाही अशी पुस्ती देखील नायडू यांनी जोडली.
कॉंग्रेसचे नेते आज भाजपप्रणित रालोआवर भर सभांत टीका करत फिरत आहेत; मात्र ते धादांत असत्य बोलत असून महागाई, बेरोजगारी, चलनवाढ सारख्या समस्या "संपुआ'च्या कारकिर्दीतच वाढल्या असल्याचे सांगत यंदा जनताच कॉंग्रेसला आपली जागा दाखवेल असे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातून यंदा सर्वाधिक जागा शिवसेना भाजप युतीला मिळतील व यंदा राज्यातही जनता युतीकडेच सत्ता सोपवेल असे त्यांनी सांगितले. भाजप राम मंदिर बांधण्यास कटिबद्ध आहेच; परंतु राम मंदिर हा राष्ट्रीय प्रश्न नसून जनतेच्या भावनांशी निगडित असा मुद्दा आहे. महागाई, बेरोजगारी सारखे प्रश्न हे सध्या भाजपच्या मुख्य अजेंड्यावर असल्याचे त्यांनी सांगितले. "लिट्टे'सारख्या संघटनांवर कारवाई करताना श्रीलंकेच्या सरकारने सामान्य तमिळ लोकांवर अत्याचार केले, मात्र भारत सरकार राजकीय मुत्सद्देगिरीत कमी पडले. सामान्य श्रीलंकन तामिळी लोकांवरचे अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारने कटीबद्धता दाखवलीच पाहीजे असे सांगताना तामिळनाडू राज्यात करूणानिधींचे सरकार असताना ते या प्रकरणी कोणाविरूद्ध आंदोलने करतात असा सवाल तेथील जनता विचारत आहे, असे त्यांनी सांगितले.
मतदान हा फक्त आपला हक्क नसून ते एक राष्ट्रीय कर्तव्य आहे, यंदा प्रत्येकाने ते बजावावे, असे आवाहन करतानाच, शिवसेना - भाजप युतीलाच कौल द्या अशी पुरवणी जोडत त्यांनी उपस्थितांत हशा पिकवला.

No comments: