Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 22 August, 2010

लेनच्या निरर्थक प्रश्नांची मालिका

सगळे स्पष्ट असतानाही लेन निरर्थक प्रश्न उपस्थित करतो. त्याच्या मताप्रमाणे रानड्यांनी हिन्दू मुस्लिम समाज एकत्र आणून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी झटावे या विचारसरणीचा पाया घातला; मात्र ते प्रतिपादन करण्याच्या काही वर्षानंतर मोठा हिन्दू मुस्लिम दंगा मुंबईत झाला. ताप्तर्य रानड्यांच्या लिखाणाचा काही परिणाम झाला नाही. हिन्दू मुस्लिम दंगे इंग्रजांनी मुस्लिमांमधील कडव्या लोकांना फूस लावल्याने, सत्तेचे गाजर दाखविल्याने घडत होते हे वास्तव लेन दुर्लक्षित करतो. लेनचे खरे दुखणे आहे - 'In other words, Shivaji's secularism can only be assured if we see him as motivated less by patriotism than by simple quest for power' (पृ. ७७) हा सगळा वितंडवाद शिवाजी हा सरंजामशाहीचा, स्वकेंद्रित वृत्तीचा सुधारित अवतार होता हे त्याला वाचकाच्या मनावर बिंबवायचे आहे. ज्याला तत्कालीन महाराष्ट्र आणि भारत यातील राजकीय आणि सामाजिक स्थितीची माहिती नाही अथवा अगदी जुजबी माहिती आहे तो जेम्स लेनच्या प्रतिपादनामुळे वैचारिक गोंधळात पडेल. वर दिलेले वाक्य - अमेरिकन तज्ज्ञांचे म्हणून उद्धृत करून कोणीही वाचक, परदेशी अभ्यासक शिवाजी महाराजांच्या संदर्भात सरंजामशाहीची मानसिकता प्रस्थापित करेल. हाच प्रयोग काही दशकांपूर्वी महाराष्ट्रात काही साम्यवादी विचारवंतांनी (?) मांडला होता. लेन त्याची पुनरावृत्ती करतो आहे इतकेच, हिन्दू राहून शिवाजी महाराज "सेक्युलर' होऊ शकत नाहीत काय? अरे हिन्दूच तसे "सेक्युलर' होऊ शकतात. इतरांना त्यांच्या धर्मातून त्यासाठी निष्कासित व्हावे लागते.
शिवाजी महाराजांचे चरित्र आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे सर्व भारतातील जनतेला स्फूर्तिदायी वाटले. रवींद्रनाथ टागोरांनाही ते स्फूर्तिदायी वाटावे यात नवल काय? त्यांना नोबेल पारितोषिक मिळाल्याने ते लेनच्या दृष्टीने वरच्या रांगेत गेले. लेनला ते खटकते. तो लिहितो - 'and even Rabindranath Tagore praised Shivaji for attempting to unit India, and said that he failed only because of internal caste divisions (पृ. ७७) शिवसामर्थ्याची नोंद अखिल भारतीय पातळीवर घेतली गेली. हे लेनला कसे खटकते हे त्याने वापरलेल्या 'even' या शब्दाने प्रतीत होते.
जाता जाता लेन न्या. रानड्यांच्या ऐतिहासिक पुराव्यांवर घसरतो. त्यांनी चिटणीस बखरीवर अवलंबून राहून काही चुका केल्यात. शिवाजी महाराजांनी दिल्लीवरून सुटका करून घेतली. आग्य्रावरून नव्हे. त्यामुळे ही तपशिलातील चूक आहे. (पृ. ७८) खरे तर न्या रानड्यांचा पिंड संशोधकाचा नव्हे तर विचारवंताचा होता. त्यांनी तपशिलात चूक केली हे मान्य केले तरी त्यांच्या विचारांचा दूरगामी परिणाम झाला म्हणूनच लेनला त्यांच्या पुस्तकाची नोंद घ्यावी लागली.
टिळक, रानड्यानंतरच्या महाराष्ट्रातील संशोधकांच्या पिढ्या मात्र पुराव्यांच्या बाबत काटेकोरपणा दाखविणाऱ्या निघाल्या. सर्वांत पहिले नाव येते ते विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचे. त्यांनी जन्मभर खस्ता खाऊन मराठ्यांच्या इतिहासाचे खंड प्रकाशित केले. मूळ पुराव्याच्या कागदपत्रांसाठी त्यांनी महाराष्ट्राचा गल्ली कोपरा छानून काढला. त्यांचे २७ खंडात प्रकाशन केले. त्यांच्या मताप्रमाणे त्यांनी शोधलेल्या पुराव्यांवरून शिवचरित्र लिहिण्याची साधने अपूर्ण होती. अधिक पुरावे शोधणे आवश्यक होते. पूर्ण जीवन त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांच्या शोधासाठी खर्ची घातले तरी त्यांना त्यांचे काम अपुरे वाटले. अशा राजवाड्यांना संपूर्ण शिवचरित्र लिहिण्यात यश आले नाही असे लेन म्हणतो.
शिवचरित्र सधनांव्यतिरिक्त राजवाड्यांनी वैदिक शब्दशास्त्रावर लिखाण केले. त्याला निरुक्तभाष्य म्हणतात. मुंबईची माहिती देणारी महिकावती बखर संपादित केली. लेनला दिसला तो धारकरी - वारकरी वाद. त्यांनी न्या. रानड्यांच्या वारकरी पंथातील समत्व भावनेच्या प्रतिपादनावर आक्षेप नोंदविले. याचा अर्थ एवढाच की राजवाडे समीक्षा करताना स्वत:चे मत ठामपणे मांडत. त्यांना रानड्यांनी लिहले म्हणून "बाबा वाक्यं प्रमाणं' हे मान्य नव्हते. राजवाड्यांनी महाराष्ट्रातील संशोधनपद्धतीवर मोठा प्रभाव टाकला हे खुद्द लेन कबूल करतो. Rajawade's passion for discovering primary text influenced a whole generation of Maharashtrian historians associated with Bharat Itihas somshodhan Mandal. Scholars associated with this institution were and deeply patiotic as well as committed to the discovery of the sort of documentation that gives their histories legitimacy (पृ. ७८)

No comments: