Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 27 August, 2010

वाळपई, फोंडा इस्पितळांचेही खासगीकरण!

सरकारी इस्पितळांना 'इस्रायली फ्लू'
वाळपई, दि. २६ (प्रतिनिधी): म्हापसा येथे बांधण्यात आलेल्या जिल्हा इस्पितळाच्या इमारतीत "पीपीपी' तत्त्वावर खासगी इस्पितळ सुरू करण्याची योजना एका बाजूला अमलात आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, वाळपईतील ८० टक्के काम पूर्ण झालेले सुमारे २५ कोटी रुपयांचे ११० खाटांचे इस्पितळही त्याच पद्धतीने "एलबीट' या इस्त्रायली कंपनीच्या घशात घालण्याचा बेत आरोग्य खात्याने आखला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. प्रत्यक्षात ही कंपनी संरक्षण क्षेत्रातील असून काही देशांनी या कंपनीवर बंदीही घातली आहे. इंडिया इन्फ्ट्रास्ट्रक्चर इनिशिएटीव्ह या कंपनीशी सल्लामसलत करण्यात येत असून, वाळपईचे हे एकमेव इस्पितळ आता खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर एलबीट ही कंपनी वादग्रस्त बनली असून, इस्राईलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात कंपनीने व्यावसायिक मूल्ये तुडविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कंपनीची भागीदारी असलेल्या एका मोठ्या प्रकल्पातून काही कंपन्यांनी आपली भागीदारी मागे घेतली आहे. नॉर्वे व स्वीडनमध्ये या कंपनीला मज्जाव करण्यात आला आहे.
अशा या वादगस्त कंपनीच्या हवाली गोमंतकीयांचे आरोग्य हवाली करण्याचे बेत शिजत असून, फोंडा येथील २४० खाटांचे इस्पितळाही "पीपीपी'खाली याच कंपनीला देण्यात येणार असल्याचे समजते. यापूर्वी बांबोळी येथील एक हजार चौरस मीटर सरकारी जागा याच कंपनीला सुपरस्पेशलिटी इस्पितळासाठी देण्यात आली आहे. त्यासाठी १८ डिसेंबर २००९ रोजी करण्यात आलेला करारही बेकायदा ठरू शकतो कारण नियोजन आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सरकारी जागा भाडेपट्टीवर देता येत नाही, असे कायदेतज्झांचे मत आहे.

No comments: