Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 26 August, 2010

के. बी. नाईक यांचे निधन

मडगाव, दि. २५ (प्रतिनिधी): माजी आमदार, उद्योजक व क्षत्रीय भंडारी समाजाचे एक प्रमुख नेते के. बी. तथा कृष्णनाथ बाबूराव नाईक यांचे आज येथे अल्प आजाराने निधन झाले.ते ८० वर्षांचे होते. अंत्ययात्रा उद्या गुरुवारी सकाळी ११ वा. त्यांच्या पार्वतीनगर (चौगुले कॉलेजमागे) येथील "राधास्मृति' या निवासस्थानातून मडगाव स्मशानभूमीकडे निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी वृंदा, तीन विवाहित पुत्र व स्नुषा विवेक-वीणा, सुनील-डॉ
. शुभांगी व राजेश-देवकी, कन्या वैजयंती शैलेश कुडचडकर व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे गोव्याच्या स्वातंत्र्योत्तर राजकीय कालखंडातील आणखी एक साक्षीदार लोप पावला आहे.
नजीकच्या काळात त्यांची तब्येत ठीक नव्हती. तशातच गेल्या शनिवारी ते घरातच पडल्यानंतर डोक्याला मार लागल्याने त्यांना येथील अपोलो व्हिक्टर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली पण ते शुद्धीवर आलेच नाहीत व आज दुपारी त्यांचे निधन झाले.
गोवा, दमण व दीव संघप्रदेशकालीन विधानसभेसाठी १९६८ मध्ये शिरोडा मतदारसंघातून घेतलेल्या पोटनिवडणुकीत निवडून आलेले के. बी. हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे उपाध्यक्ष होते. पण तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्याकडील मतभेदानंतर काही म. गो. आमदारांना घेऊन ते बाहेर पडले होते. नंतरच्या राजकीय घडामोडींत त्यांनी नवमहाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना केली होती. त्यांचा जन्म ५-८-१९३० रोजी आडपई-फोंडा येथे झाला होता. मराठीतून चौथी, पोर्तुगीजमधून तिसरी व इंग्रजीतून एसएससी पर्यंतचे त्यांचे शिक्षण झालेले असले तरी ते मराठीचे कट्टर पुरस्कर्ते होते. पण त्यांनी अन्य भाषांचा कदापि द्वेष केला नाही. वाचन, पोहणे तसेच फुटबॉल व क्रिकेट खेळणे हे त्यांचे छंद होते, शरीराची साथ असेपर्यंत त्यांनी ते जोपासले.
आडपईतील ते एक प्रमुख भाटकार होते, पण त्यांची कर्मभूमी मडगावच राहिली. या शहराने त्यांच्या व्यापार उद्योगाला चांगलाच हातभार लावला. त्यांच्या के. बी. नाईक ग्रुप ऑफ कंपनीचा झालेला विस्तार हा के. बी. यांची दूरदृष्टी, सचोटी व हुशारी यांचेच फळ असल्याचे मानले जाते.
अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. गोवा क्षत्रिय भंडारी समाज, शिक्षण प्रसारक संघ दुर्भाट, गोमंत विद्या निकेतन मडगाव आदी संस्थांचे अध्यक्ष तसेच मराठी विज्ञान परिषद गोवाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. मडगावातील अधिकतम संस्थांचे ते सदस्य होते. मडगाव अर्बन बॅंकेचे ते संस्थापक सदस्य होते. मडगावात झालेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यांनी मोलाचे काम केले होते, त्यातूनच गोव्यात मराठी विज्ञान परिषदेची मुहूर्तमेढ रोवली गेली होती.

No comments: