Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 26 August, 2010

रवी नाईकांकडून अटालाची पाठराखण

म्हणे त्यात काय विशेष!
गृहमंत्री-पोलिसांच्या भूमिकेत कमालीची तफावत

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): पोलिस ड्रगमाफिया साटेलोटेप्रकरणी जामिनावर सुटलेला संशयित यानीव बेनाईम ऊर्फ अटाला हा बेपत्ता झाला यात विशेष असे काहीही नाही. अटाला जिथे गेला असेल तेथून परत येणार. त्याला पोलिसांनी केवळ संशयावरून अटक केली होती, त्याच्याकडे तसे काहीही मिळाले नव्हते, अशा प्रकारचे वक्तव्य पत्रकार परिषदेत करून गृहमंत्री रवी नाईक यांनी आज चक्क अटालाची पाठराखणच केली.
अटाला बेपत्ता झाल्याची माहिती हाती लागताच पत्रकारांनी गृहमंत्री नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, "आपण याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत' असे त्यांनी सांगितले होते. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गृहमंत्र्यांनी आज, "मी केवळ तुम्ही मला तसा प्रश्न विचारला होता म्हणून त्याची चौकशी केली जाईल', असे सांगितले होते, असा पवित्रा पत्रकार परिषदेत घेतला. त्याचप्रमाणे अटाला बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलिसांना आपण चौकशीचे कोणतेच आदेश दिलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे या प्रकरणात कुठे तरी पाणी मुरत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलिसांनी गृहमंत्री नाईक यांच्या प्रतिक्रियेच्या नेमकी उलट भूमिका घेतली असून, "आम्ही या प्रकरणाची केवळ छाननी नाही तर, तो कसा बेपत्ता झाला याची देखील सखोल चौकशी करीत आहोत', असे म्हटले आहे. पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना, अटाला याचा शोध घेण्यासाठी "लुकआऊट' नोटीस जारी करण्यात आली असून सिंधुदुर्ग व गोकर्ण येथे पोलिसांची दोन पथकेही पाठवण्यात आली असल्याचे सांगितले.
अटाला राहत असलेल्या हॉटेलकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २४ जून रोजी तो तेथे राहण्यासाठी आला. त्यानंतर दि. १३ जुलै रोजी त्यांनी हॉटेल सोडले. केवल २० दिवस तो या हॉटेलमध्ये थांबला असून वीस दिवसाचे त्याने ३० हजार रुपये भाडे दिले आहे. दि. ७ रोजी गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस उपअधीक्षक तथा या प्रकरणाचे तपास अधिकारी चंद्रकांत साळगावकर यांनी त्याला चौकशीला हजर राहण्यासाठी हॉटेलच्या पत्त्यावर समन्स पाठवला. तेव्हा दि. १४ रोजी त्याने हॉटेल सोडले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, अशी माहिती श्री. देशपांडे यांनी दिली.
अटाला बेपत्ता झाल्याची माहिती पत्रकारांनी उजेडात आणताच खडबडून जागे झालेल्या पोलिस खात्याने तब्बल १८ दिवसांनी अटालाचा शोध घेण्यासाठी "लुकआऊट' नोटीस जारी केली. अटालाचा शोध घेण्यासाठी सर्व विमानतळांवर माहिती देण्यासाठी "लुकआउट' नोटीस काढण्यास पोलिसांना एवढा वेळ का लागला, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अटाला बेपत्ता झाला की त्याला बेपत्ता होण्याची संधी देण्यात आली, असाही प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.
गृहमंत्री रवी नाईक यांच्या म्हणण्यानुसार, अटाला याच्याकडे कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नाहीत. त्याच्याकडे गोव्यात राहण्यासाठी कायदेशीर कागदपत्रे नसल्याची माहिती गृहखात्याकडे आणि पोलिस खात्याकडे होती तर त्याला बेकायदा वास्तव्य केल्याच्या गुन्ह्याखाली का अटक करण्यात आला नाही, असा प्रश्न गृहमंत्री नाईक यांना केला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अनेक संशयित जामिनावर सुटतात. प्रत्येक संशयितावर पोलिस नजर ठेवू शकत नाही. तसेच, अटालावर पाळत ठेवावी, असा न्यायालयीन आदेश नव्हता किंवा पोलिसांना त्याच्याकडे ड्रग्सही सापडले नव्हते. त्याला केवळ संशयावरून अटक करण्यात आली होती, पोलिसांना आता त्याची तशी मोठी गरज नाही, असेही गृहमंत्री नाईक यांनी पत्रकारांना सांगितले.
पोलिस ड्रगमाफिया प्रकरणामुळे संपूर्ण पोलिस खात्याच्या इभ्रतीचा प्रश्न निर्माण झालेला असताना या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा सूत्रधार अटाला याची पोलिसांना तशी गरज नसल्याचे सांगून हे प्रकरण एकप्रकारे मिटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संकेत गृहमंत्र्यांनी दिले. आता आम्ही लकी फार्महाऊस हिची वाट पाहतोय, ती येत नसल्यास येत्या काही दिवसात पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलिस अधिकाऱ्यांचे एक पथक स्विडनला जाणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. याची माहिती आम्ही स्विडनच्या पोलिस खात्याला दिली असून केंद्रीय गृहमंत्रालयाकडून तशी परवानगी मिळाली असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष केवळ प्रसिद्धीसाठी हे प्रकरण "सीबीआय'कडे देण्याची मागणी करत आहे. मुख्यमंत्र्यांनाही हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे असे वाटत नाही. तसे काही असतेच तर मी एक महिना इस्पितळात होतो तेव्हा त्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे दिले असते. "सीबीआय'कडे हे प्रकरण द्यायचे असेल तेव्हा सर्वपक्षीय बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
--------------------------------------------------------
कोण हा मधुकर कानोळकर!
पेडणे तालुक्यातील पार्से गावचे एक ग्रामस्थ मधुकर कानोळकर यांच्या नावे मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, "सीआयडी' व "गोवादूत'च्या नावे एक पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रात पेडणे तालुक्यातील भाजपचे नेते किनारी भागातील ड्रग्स व्यावसायिकांकडून नियमित हप्ते घेतात, असा आरोप करून तालुक्यातील काही लोकांची नावे देऊन ते ड्रग्स व्यवसाय चालवतात अशी माहितीही दिली होती. विधानसभेत भाजपकडून ड्रग्स व्यवहाराची "सीबीआय' चौकशीची मागणी सातत्याने होत असतानाच हे पत्र फॅक्सद्वारे सर्वांना पाठवण्यात आले होते. "सीआयडी' विभागाने प्रत्यक्ष पार्से या गावात या व्यक्तीची भेट घेतली, पण त्याने मात्र आपण हे पत्रच लिहिले नसल्याचा पवित्रा घेतला. पार्सेतील या व्यक्तीचे नाव मधू कानोळकर असे असून पत्रातील नाव मात्र मधुकर कानोळकर असे लिहिले होते. मुख्य म्हणजे हा पत्ता मधू कानोळकर यांचाच होता व या पत्रातील एका घटनेशीही मधू कानोळकर यांचा संबंध असल्याने आपल्या नावाचा दुरुपयोग करून हे पत्र लिहिण्यात आल्याची जबानी मधू कानोळकर यांनी दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
-----------------------------------------------------------
"अटालाच्या मागावर पोलिस ठेवावेत असा कोणताही आदेश न्यायालयाने दिलेला नाही. तो बेपत्ता झाल्याप्रकरणी चौकशी करण्याचे कोणतेच आदेश आपण दिलेले नाहीत. पळून देशाबाहेर जाण्यासाठी त्याच्याकडे कोणतीच कायदेशीर कागदपत्रे नाहीत."
------------------------------------------------------------------
आत्माराम देशपांडे
"अटाला याचा शोध घेण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहोत. अटाला बेपत्ता झाला याला पोलिस जबाबदार नाहीत. अटाला याला मेरशी येथील मोटरसायकल पायलट प्रकाश मेत्री हा जामीन राहिला होता. त्याच्याकडे आम्ही चौकशी करत आहोत. तसेच, अटाला याचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला असल्याची माहिती यावेळी श्री. देशपांडे यांनी दिली."

No comments: