Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 24 August 2010

छिद्रान्वेषी जेम्स लेन

पुस्तकाच्या शेवटच्या आणि पाचव्या प्रकरणाचे शीर्षक Cracks in the narrative असे आहे. त्याने डब्ल्यू. ई. वी. दू. बोई या विचारवंताचे (?) अवतरण दिले आहे. त्या अवतरणात तो विचारवंत जॉर्ज वॉशिंग्टन हा स्वातंत्र्यासाठी लढला तरी स्वतःकडे काळे गुलाम राखून होता याचा उल्लेख करतो आणि या गोष्टी दुर्लक्षित केल्याने इतिहासाचे परिशिलन अर्धवट राहते असे लिहितो. "The difficulty with this philosophy is that history loses its value as an incentive and example; it paints perfect men and noble nations but it does not tell the truth" (पृ. ८९)
इतिहास का लिहायचा आणि अभ्यास करायचा याचे सर्वकालीन उत्तर "येणाऱ्या पिढ्या इतिहासापासून काही बोध घेत नाहीत हे वारंवार समजून घेण्यासाठी आहे.' इतिहास बदलविणारे महामानव, थोर पुरुष हे त्यांच्या त्यांच्या काळातील चाकोरी सोडून बाहेर गेले आणि म्हणून इतिहास घडवू शकले. त्या महामानवांचे चरित्र मात्र स्फुर्तीदायी असते. त्याचे उदाहरण समोर ठेवून काही सामान्य लोक असामान्य कार्य करतात. तसे असामान्य कार्य आपण सामान्य असलो तरी करण्याची इच्छा मनात उत्पन्न व्हावी, त्यातून समाजाला, जगाला काहीतरी फायदा व्हावा आणि आपल्या स्वतःलाही काहीतरी चांगले केल्याने समाधान असावे, यासाठी महापुरुषांची चरित्रे वाचणे आणि त्यानंतर थोडी बहुत आचरणात आणणे यासाठी ती चरित्रे लिहिली जातात. "मरावे परी कीर्तीरुपे उरावे' हे समर्थ म्हणतात. ती कीर्ती त्रिखंडात पसरणारी असो किंवा आपण राहतो त्या गावापुरती मर्यादित राहणारी असो पण सत्कर्म केल्याबद्दल असावी अशी अपेक्षा आहे. महापुरूषांनी ज्या क्षेत्रात काम केले, जो महदुद्योग उभा केला, त्याचे मूल्यमापन करणे, त्यांनी केलेल्या कामातील ज्या त्रुटी असतील त्या जाणून घेणे आणि त्या पुन्हा न करण्याचा प्रयत्न करणे हा ही इतिहासाच्या अभ्यासाचा भाग असतो. उपनिषदांत ऋषी आपल्या शिष्यांना शिक्षणपूर्ण झाल्यावर निरोप देताना "मातृ देवो भव। पितृ देवो भव। आचार्य देवो भव।' हे जसे सांगत असत त्याचप्रमाणे "स्वाध्यायात्मा प्रमदः।' अभ्यास चुकवू नकोस हा सल्ला देत आणि त्या पुढे जाऊन बजावत असत. "यानि अस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानि नो इतराणि' आमची जी चांगली कृत्ये असतील त्यांचाच कित्ता गिरव इतरांचा (चुका अथवा वाईट सवईंचा) नाही. तिसरा मुद्दा असा की थोर लोक इतरांच्या मोठ्या गोष्टींचा, त्यांनी मांडलेल्या अथवा आचरणात आणलेल्या गोष्टींचा विचार करतात तर ज्यांना आपण अधम प्रवृत्तीचे लोक म्हणू ते व्यक्तिगत कागाळ्या, खुसपटे काढणे, छिद्रान्वेषीपणा करणे यातच समाधान मानतात. जेम्स लेन हा त्या अधम प्रवृत्तीचा लेखक मला वाटतो.
शीर्षक वाचून माझ्या मनात विचार उठले की महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना जो मोठा विचार, आदर्श डोळ्यासमोर ठेवला, अनेक संकटांना तोंड दिले, अनेक मोहिमा यशस्वी करून दाखविल्या त्यांचे विश्लेषण कसे अपुरे आहे; त्यात काय त्रुटी जाणवतात किंवा त्यांनी केलेल्या मोहिमांमध्ये अवलंबिलेल्या धोरणामध्ये काय चुका होत्या, त्यांची कोणती मोहीम त्याला फसल्यासारखी वाटते, त्याऐवजी दुसरा कोणता पर्याय निवडता आला असता इ. धोरणात्मक, विश्लेषणात्मक गोष्टींकडे लेन लक्ष वेधेल. त्यांनी घालून दिलेल्या कोणत्या आदर्शाच्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे २५ वर्षे औरंगजेबाने छ. शाहूंना मुक्त करेपर्यंत महाराष्ट्राने निर्नायकी अवस्थेत त्याला लढा दिला याची काही चर्चा करेल. हा लढा पाव शतक सुरू राहण्यामागे महाराजांनी जनमानसात निर्माण केलेली अस्मिता होती की छ. संभाजी महाराजांच्या देदीप्यमान बलिदानामुळेच महाराष्ट्र पेटून उठला. अशा सामाजिक प्रश्नांना तो हात घालेल अशी अपेक्षा होती. लेन तसे करण्याच्या मनःस्थितीत नाही, ती त्याची लायकी नाही. त्याने आपल्या छिद्रान्वेषी बुद्धीने पाच प्रश्नांना(?) हात घातला ते असे
Shivaji had an unhappy family life?
Shivaji had harem?
Shivaji was uninterested in the religion of bhakti saints?
Shivaji personal ambition was to build a kingdom, not liberate a nation?
Shivaji lived in a cosmopolitain Islamic world and did little to change that fact? (पृ.९१)
वरील सर्व प्रश्न म्हणजेच महाराजांचे कर्तृत्व, नितिमत्ता, भक्तिभाव, दूरदृष्टी इ. सर्वांना हिणकस ठरवून त्यांचे व्यक्तिगत चारित्र्य कलंकित करण्याचा लेनचा हेतू सरळसरळ दिसतो. त्याला कारणही आहे. अमेरिकेतील कुटुंबसंस्था अनेक दशकांपूर्वीच, विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर मोडकळीस आली. स्वैराचार, मादक द्रव्यांचे सेवन, हिप्पींचा हैदोस इ. गोष्टी १९६० ते १९९० च्या दशकांमध्ये अमेरिकेत चालत होत्या. त्यामुळे अमेरिकन नागरिकांच्या जीवनात शाश्वत राहिले ते त्यांच्या आईचे मुलातले, शरीरसंबंधापूर्वीचे नाव. आजही अमेरिकन नागरिकांची शासकीय स्तरावर नोंदणी होताना पित्याचे नाव विचारले जात नाही. विचारले जाते ते mothers maiden name आईचे शारीरिक संबंधापूर्वीचे नाव. अशा वातावरणात कलुषित होत गेलेल्या कौटुंबिक अवस्थेत जेम्स लेन जन्मला आणि वाढला. त्याच्यापुढे अमेरिकेतील Single parent child घेऊन जगणाऱ्या हतबल मातापिता दिसत होत्या. त्याच्या छिद्रान्वेषी बुद्धीला तेच जाणवले. महाराजांच्या सांसारिक बाबींची चर्चा करताना तो लिहितो - But the simple fact is that Shivaji's mother and father lived apart for most if not all of Shivaji's life....... But perhaps he was born at a time when his parents were already estranged? How would the narrative look in light of such a supposition?

No comments: