Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 27 August, 2010

मद्यार्क घोटाळ्याच्या तपासाला पुन्हा दणका

आठ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर
राजीव यदुवंशी यांची अखेर बदली

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): गोव्यात गेली आठ वर्षे ठाण मांडून बसलेले, खाण, वन, जलस्रोत, नगरनियोजन व वित्त आदी महत्त्वाची खाती सांभाळणारे, मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या खास मर्जीतले म्हणून गणले जाणारे व खुद्द त्यांचे सचिव म्हणून काम पाहणारे "आयएएस' अधिकारी राजीव यदुवंशी यांची अखेर गोव्यातून बदली झाली आहे. १ ऑक्टोबर २०१० पासून राज्य प्रशासनातून त्यांना मुक्त करण्याचे आदेश जारी झाले आहेत. माजी वित्त सचिव उदीप्त रे यांच्याकडून मद्यार्क घोटाळा चौकशीची सूत्रे राजीव यदुवंशी यांनी घेतली होती, आता त्यांचीही बदली झाल्याने या कोट्यवधींच्या घोटाळ्याची चौकशी थंडावल्यातच जमा झाली आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना गोव्यात केवळ तीन वर्षांसाठी पाठवण्यात येते. आत्तापर्यंतच्या इतिहासात सतत आठ वर्षे गोव्यात राहिलेले राजीव यदुवंशी हे एकमेव "आयएएस' अधिकारी ठरले आहेत. गेल्या तीन वर्षांत सहा वेळा त्यांच्या बदलीचे आदेश केंद्राकडून जारी करण्यात आले परंतु मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी वेळोवेळी हस्तक्षेप करून ही बदली रोखून धरली. या वेळी मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना कोणत्याही परिस्थितीत गोव्यातून पाठवा, असे कडक आदेश जारी केल्याने अखेर १ ऑक्टोबरपासून गोवा प्रशासकीय सेवेतून त्यांना मुक्त करण्याचे ठरले आहे. राजीव यदुवंशी हे खाण, नगरनियोजन, वन आदी महत्त्वाची खाती सांभाळीत होते. या खात्यांत गेली काही वर्षे अनेक गैरप्रकार झाल्याचे विरोधी भाजपने दाखवून दिले आहे. खाण व वन खात्यांचा परस्पर संबंध आहे. राज्यात खाण व्यवसायाने वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. एवढेच नव्हे तर खुद्द वन्यजीव क्षेत्रातही खाणींनी शिरकाव केल्याने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह राजीव यदुवंशी यांच्याविरोधातही टीकेची झोड उडाली होती.
दरम्यान, राजीव यदुवंशी यांनी वास्को येथे स्वतःचा बंगलाही बांधला आहे. माजी वित्त सचिव उदीप्त रे यांची बदली झाल्यानंतर वित्त खात्याचा ताबाही राजीव यदुवंशी यांच्याकडेच ठेवण्यात आला होता. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत पर्दाफाश केलेल्या बेकायदा मद्यार्क घोटाळ्याचा तपास सध्या त्यांच्याकडेच होता. उदीप्त रे यांची बदली होणार, याची जाणीव असतानाही मुख्यमंत्री कामत यांनी या घोटाळ्याची चौकशी त्यांच्याकडे सोपवली होती. उदीप्त रे यांच्यानंतर या घोटाळ्याची चौकशी राजीव यदुवंशी यांच्याकडे आली व आता ते देखील बदली होऊन जाणार असल्याने मद्यार्क घोटाळा चौकशी सुद्धा बनवाबनवीच असल्याची टीका होत आहे.

No comments: