Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 24 August, 2010

गृहमंत्री, गृहसचिवांसहित नक्षल्यांच्या 'हिट लिस्ट'वर २२ नेते

नवी दिल्ली, दि. २३ : नक्षलवाद्यांनी आता आरपारच्या लढाईचे रणशिंग फुंकले असून त्यासाठी त्यांनी अतिमहनीय नेत्यांचे एक "हिट लिस्ट' तयार केले असल्याची खबर मिळाली आहे. यात देशाचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासहित २२ प्रमुख नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांनी तयार केलेल्या या "हिट लिस्ट'मध्ये गृहसचिव जी. के. पिल्लई यांचा क्रमांक सर्वांत वरचा आहे.
जो नक्षलवादी केडर गृहमंत्री पी. चिदंबरम आणि गृहसचिव जी. के. पिल्लई यांच्यावर हल्ला करेल त्याला मोठ्या रकमेचे इनाम दिले जाईल, अशी घोषणा नक्षलवाद्यांनी केली असल्याची माहिती गुप्तहेर संघटनांना मिळाली आहे. या दोघांव्यतिरिक्त नक्षल्यांच्या "हिट लिस्ट'मध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग, पश्चिम बंगालचे राज्यपाल एम. के. नारायणन, ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि भारतीय जनता पक्षाच्या काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे.
गुप्तहेर संघटनांच्या सूत्रांनी सांगितले की, झारखंडच्या एका निबिड जंगलात नक्षलवाद्यांनी एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत वरिष्ठ नक्षलवादी कमांडरसहित किमान एक हजार नक्षलवादी केडर उपस्थित होते. दरम्यान, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरांवर मोठा हल्ला करण्याची एक योजनाही या बैठकीत निश्चित करण्यात आल्याची माहिती गुप्तहेर संघटनांना मिळाली आहे.

No comments: