Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 23 August, 2010

सुशासनासाठी गोव्यात भाजपला सत्तेवर आणा

भाजपच्या गोवा प्रभारी आरती मेहरा यांचे कळकळीचे आवाहन

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - कॉंग्रेस सत्तेवर आली की त्यांचे सरकार भ्रष्टाचाराचे भूतही आपल्याबरोबर घेऊन येते. जिथे जिथे कॉंग्रेस सत्तेवर आहे तेथे प्रचंड भ्रष्टाचार फोफावलेला आहे. कॉंग्रेसच्या या भ्रष्ट आणि माफियांशी साटेलोटे ठेवणाऱ्या या सरकारला जनता कंटाळली आहे. त्यामुळे या माफियांपासून गोवेकरांना वाचवण्यासाठी २०१२ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर येणार आहे. पक्षाला केवळ सत्ता मिळवायची नसून एक संवेदनशील सरकार देण्याचे ध्येय आमच्यासमोर आहे, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोव्याच्या प्रभारी श्रीमती आरती मेहरा यांनी आज केले.
त्या पक्ष कार्यालयामध्ये पत्रपरिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांच्याबरोबर पक्षाचे प्रवक्ते गोविंद पर्वतकर व संघटनमंत्री अविनाश कोळी उपस्थित होते.
गोव्याला स्थिर सरकार हे केवळ भाजपनेच दिले आहे. मनोहर पर्रीकर यांचे ते सरकार आजही लोकांच्या लक्षात आहे. जे सरकार आज सत्तेवर आहे त्याच्यावर प्रचंड मोठ्या घोटाळ्यांचे आरोप झालेले आहेत. गृहखाते सांभाळणाऱ्या मंत्र्याच्या मुलावर ड्रग प्रकरणात असल्याचे आरोप होणे हे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे याचा तपास "सीबीआय'मार्फत होण्यासाठी आम्ही दिल्लीतही दबाव टाकणार असल्याचे श्रीमती मेहरा म्हणाल्या.
आरोग्य हे अत्यंत संवेदनशील खाते आहे. त्याकडे कटाक्षाने लक्ष देणे अपेक्षित असते. मात्र गोव्यात तसे होत नाही. एका बाजूने भारतातील इस्पितळे आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट सुविधा पुरवत असल्याने मोठ्या प्रमाणात विदेशी रुग्ण येथे वळू लागेल आहेत. मात्र, गोव्याचे आरोग्यमंत्री इस्रायली कंपनीला "पीपीपी' द्वारे इस्पितळ उभारण्याची परवानगी देतात, हे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दिल्ली होऊ घातलेली "कॉमनवेल्थ' क्रीडा स्पर्धा "कॉंग्रेसवेल्थ' बनली आहे. सरकारकडे या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी लागणारी साधनसुविधा उभारण्यासाठी आठ वर्षाचा कालावधी होता. शेवटपर्यंत हे सरकार झोपून राहिले. त्यातील विविध प्रकल्पांची कामे मुद्दामच लांबणीवर टाकून आता ती घाईगडबडीत अक्षरशः उरकली जात आहे. ८७ हजार कोटी रुपयांचा हा सगळा मामला आहे. त्यात प्रचंड प्रमाणात घोटाळा करण्यात आला आहे. दिल्लीतील रस्त्यांवर पाणी तुंबायला सुरुवात झाली असून भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे, असे दिल्लीच्या माजी महापौर असलेल्या श्रीमती मेहरा यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे काश्मीर विषयावर गोंधळलेल्या स्थितीत आहे. काश्मीर हा भारतातच अविभाज्य भाग असून ती आमची शान आहे. पाकव्याप्त काश्मीरही भारताने पुन्हा ताब्यात घेतला पाहिजे. त्यामुळे पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दबावाखाली येऊ नये. पाकिस्तानच्या "आयएसआय' या गुप्तहेर संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे. त्यासाठी भारताने जागतिक पातळीवर पाकवरील दडपण वाढवावे, अशी मागणी मेहरा यांनी केली.
स्वातंत्र्यानंतर ५७ वर्षे या देशावर कॉंग्रेसने राज्य केले. मात्र अजूनही कॉंग्रेस भारतीयांना सुशासन देऊ शकले नाही. सरकारी गोदामांत गहू कुजत आहे. त्याचा भांडाफोड भाजपनेच केला. या प्रकारावरून एक लक्षात आले की, कुजलेला गहू हा मद्य कंपन्यांना दारू बनवण्यासाठी देणारे एक रॅकेट वावरत आहे. गहू कुजवून तो मद्य कंपन्यांना दिला जातो, मात्र गरिबांना वाटला जात नाही, अशी व्यथा त्यांनी यावेळी बोलून दाखवली. सुशासन देणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मुस्लिमविरोधी ठरवून त्यांच्या बदनामीची मोहिमच केंद्र सरकार राबवत असल्याचा आरोप श्रीमती मेहरा यांनी केला.
"ख्रिस्ती मतदारांचा वाढता पाठिंबा'
भाजप जातीय नसल्याचे आम्ही येथील ख्रिस्ती जनतेला पटवून देणार आहोत. कॉंग्रेस केवळ गठ्ठा मते मिळवण्यासाठी भाजपला जातीयवादी ठरवून अपप्रचार करत आहे. त्यामुळे आगामी काळात आम्ही ख्रिस्ती धर्मगुरूंच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तसेच त्यांना भारतीय जनता पक्षाबद्दल संपूर्ण माहिती करून दिली जाणार आहे. गेल्या निवडणुकीत पक्षाला ख्रिस्ती मतदारांकडून पाच टक्के जास्त मते मिळाली, असे भाजपच्या गोवा प्रभारी श्रीमती आरती मेहरा यांनी स्पष्ट केले.

No comments: