Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 24 August 2010

वास्कोत पेट्रोलियम पदार्थाची कोट्यवधींची चोरी उघडकीस

जमिनीखालील वाहिनीला भोक पाडून चोरी
वास्को, दि. २३ (प्रतिनिधी): 'झुआरी इंडस्ट्रियल ऑईल टॅंकिंग लिमिटेड' (झेड. आय. ओ. एल.)च्या जमिनीखालील वाहिनीला भोक पाडून तेथे अन्य एक पाईप जोडून पेट्रोलियम पदार्थाची चोरी करण्यात येत असल्याचे आज उघडकीस आले असून यात कोट्यवधी रुपयांचा पेट्रोल पदार्थ चोरीस गेला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मुरगाव बंदरातून झेड. आय. ओ. एल. या आस्थापनात दाबोळी विमानतळ ते वेर्णा महामार्ग ह्या रस्त्याजवळील "गेट गोरमेंट'च्या बाजूला असलेल्या जमिनीखालून जाणाऱ्या वाहिनीला भोक पाडून सदर चोरी करण्यात येत असल्याचे वेर्णा पोलिसांना समजताच आज सकाळी या ठिकाणी छापा मारून पोलिसांनी सदर प्रकाराचा पर्दाफाश केला.
चोरीसाठी वापरण्यात येत असलेले पाईप व अन्य सामान जप्त करण्यात आले आहे.
यासंबंधी काल उशिरा झेड. आय. ओ. एल.चे अधिकारी देबाशिश भट्टाचार्य यांनी वेर्णा पोलिसांत तक्रार नोंद केली होती. त्याला अनुसरून पोलिसांनी आज कारवाई केली.
वेर्णा पोलिसांनी काल (दि. २२) रात्रीच येथे बंदोबस्त ठेवला होता. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी सदर अस्थापनाच्या अधिकाऱ्यांसोबत सदर ठिकाणी जाऊन प्रथम पंचनामा केला. नंतर जमिनीत खड्डा खणून पाहणी केली असता तेथे तेल पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीला सुमारे एका इंचाचे भोक पाडून त्याला एक "वॉल्व' जोडून अतिरिक्त पाईप जोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सदर पाईप, वॉल्व व अन्य साहित्य ताब्यात घेऊन अज्ञाताविरुद्ध भा. दं. सं कलम ३७९, २८५ व पेट्रोल कायदा १९३४ च्या कलम २३ खाली गुन्हा नोंदवला आहे.
मुरगाव बंदरात येणाऱ्या पेट्रोल, डिझेल, केरोसीन व नाफ्ता या सारख्या पदार्थांची वाहतूक सदर वाहिनीतून केली जाते. सुमारे २० दिवसांपूर्वी झेड. आय. ओ. एल.च्या अधिकाऱ्यांना सदर वाहिनीला भोक पाडून पेट्रोलियम पदार्थाची चोरी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी याबाबत तपास केला असता काल दाबोळी विमानतळ ते वेर्णा येथे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या ठिकाणी जमिनीखालील
वाहिनीला भोक पाडण्यात आल्याचे त्यांना समजले होते. वेर्णा पोलिसांच्या माहितीनुसार २६ जुलै रोजी मुरगाव बंदरावर शेवटचे जहाज झेड. आय. ओ. एल.साठी तेल साठा घेऊन आले होते.
याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे मुरगावचे पोलिस उपअधीक्षक महेश गावकर यांनी सांगितले. दरम्यान, यात करोडो रुपयांचा पेट्रोल पदार्थ चोरीस गेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाचा लवकरच छडा लावला जाईल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला. सदर जागा खाजगी असून तेथे अनेकदा चारचाकी उभी असल्याची माहिती मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सदर आस्थापनाशी निगडीत असलेल्या काही जणांचा यात हात असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आज सदर कारवाई करण्यात आली.
-----------------------------------------------------------------
आज येथे पेट्रोलियम पदार्थाच्या चोरीचा प्रकार उघडकीस येताच अनेकांना २००२ साली घडलेल्या अशाच एका प्रकरणाची आठवण झाली. तेव्हा मुरगाव बंदराच्या क्षेत्रात असलेल्या एका पेट्रोलियम पदार्थाच्या वाहिनीला भोक पाडून तेथे पाईप जोडून कोट्यवधी रुपयांचा पदार्थ चोरला गेला होता.

No comments: