Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 22 August, 2010

गोवा - मुंबई महामार्गाची दुर्दशा

पणजी,दि.२१ (प्रतिनिधी): गोवा - मुंबई महामार्गावरील सावंतवाडी ते खारेपाटण हा सुमारे १३० किलोमीटरचा रस्ता पूर्ण खड्डेमय झाल्याने वाहनचालकांसाठी डोकेदुखीच ठरला आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढल्याने रस्त्याच्या दुरुस्तीची नितांत गरज असून महाराष्ट्र सरकारकडून अद्याप काहीच हालचाली होत नसल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून येत आहेत. गेल्या पाच वर्षांत या मोठ्या पट्ट्यात एकदाही डागडुजीचे काम झालेले नाही. त्यात यंदाचा जोरदार पाऊस आणि अवजड वाहनांची वर्दळही वाढल्याने हा रस्ता म्हणजे जणू चाळणच बनला आहे.
गणेश चतुर्थी जवळ आल्याने मुंबई व इतर भागांतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या गावांकडे येणार आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार सातत्याने सुरू असल्याने कोकणवासीय व गोमंतकीय मंडळी मुंबई-गोवा महामार्गाने वाहतूक करण्यालाच पसंती देतील. मात्र मुंबई- गोवा महामार्गाची झालेली दयनीय अवस्था पाहता या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचेच चिन्ह दिसत आहे. या महामार्गाची गणेशोत्सवापूर्वी डागडुजी व्हावी यासाठी सिंधुदुर्गचे खासदार नीलेश राणे यांनी केंदीय रस्ते विकास मंत्रालयाकडे मागणी करून त्याचा पाठपुरावाही सुरू केल्याची खबर आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरण प्रस्तावालाही मान्यता मिळवली असून लवकरच त्यासाठीची निविदा जारी करण्यात येणार असल्याची माहितीही मिळाली आहे.

No comments: