Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 28 August, 2010

'कमिशन'साठी महामार्ग बांधण्याची घाई

गोव्याला हायवेची गरजच नाही : पर्रीकर
महामार्गविरोधी सभेला अभूतपूर्व प्रतिसाद

पणजी, दि.२७ (प्रतिनिधी): विद्यमान सरकारमधील मंत्र्यांमध्ये कमिशन लाटण्यासाठी स्पर्धा सुरू असून गोव्यात होऊ घातलेला सहापदरी राष्ट्रीय महामार्ग म्हणजे दरमहा गोवेकरांच्या खिशातील हजारो रुपये टोलरूपाने जमा करून मंत्र्यांच्या खिशात घालण्यासाठी रचलेले कुभांड आहे. गोव्यावर आलेल्या या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक गोवेकराने सर्व शक्तिनिशी पुढे यावे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे केले.
गोव्यातील नियोजित सहापदरी राष्ट्रीय महामार्गाला विरोध करण्यासाठी स्थापलेल्या महामार्गविरोधी समितीतर्फे येथील गोमंतक मराठा सभागृहात आयोजित जाहीर सभेत पर्रीकर बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री माथानी साल्ढाणा, सौ. निर्मला सावंत, फातिमा डिसा, ऍड. आयरिश रॉड्रिगीस, डॉ ऑस्कर रिबेलो, प्रा. प्रजल साखरदांडे, समन्वयक सुनील देसाई, प्रा गोविंद पर्वतकर, दिनेश वाघेला, डॉ. रवींद्र चोडणकर, राजाराम पालकर, तारा केरकर, शशी कामत, श्रीपाद लोटलीकर, एल्वीन गोम्स आदी उपस्थित होते.
पर्रीकर म्हणाले, या महामार्गाचा गोव्याला काहीही फायदा नाही. बांधा वापरा परत करा याद्वारे ३० वर्षापर्यंत वाहनचालकांना दररोज टोल देऊन या रस्त्याने प्रवास करावा लागेल. हे करोडो रुपये मंत्री आणि कंत्राटदार यांच्या खिशात जाणार आहेत. फक्त रस्त्याकडेच्याच नव्हे तर प्रत्येक गोमंतकीयाला याची झळ बसणार आहे. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्यामुळे अशा गोष्टी घडत आहेत .ज्या सरकारचे मंत्री कमिशन घेत असल्याचे कबूल करतात त्यांच्याकडून लोकहित कसे जपले जाईल?
आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत आपण लोकांना फायदेशीर ठरणारे प्रकल्प हाती घेऊन ते पूर्ण केले. या सरकारने अगोदर जुवारी नदीवरील पूल बांधावा व मगच लोकांची मान्यता घेऊन कोकण रेल्वेला समांतर महामार्ग बांधावा ज्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही. खाण कंपन्यांचे हित जपण्यासाठी २४ हजार रु.प्रति मीटर दर असलेल्या जमिनीला ५ रु. एवढा कवडीमोल दर देणारे हे दिल्लीच्या निर्णयावर चाललेले बाहुले सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून ते गोव्याचे हित साधूच शकणार नाही . पनवेल ते गोवा महामार्गासाठी ३०० कोटी खर्च होणार असून पत्रादेवी ते पोळे या त्यापेक्षा खूपच कमी लांबी असलेल्या महामार्गासाठी तीन हजार कोटी खर्च दाखवणारे हे सरकार गोवा नष्ट करायला उठलेय, असे पर्रीकर म्हणाले.
माथानी साल्ढाणा म्हणाले, या लुटारू सरकारवर कुणीही विश्र्वास ठेवू नये. फक्त परप्रांतीयांचे हित जपण्यासाठी गोवेकरांना संपवण्याचा घाट घातलेल्या या सरकारविरुद्ध सर्वांनी एकजुटीने लढावे.
निर्मला सावंत यांनी, लोकांची घरे मोडून महामार्ग नकोच असे सांगून सरकार स्वार्थासाठी हा महामार्ग बांधत असल्याची टीका केली. प्रा. साखरदांडे यांनी या महामार्गमुळे सर्वधर्मीयांची ऐतिहासिक स्थळे व नैसर्गिक स्त्रोत नष्ट होणार असल्याचे सांगितले.ऍड. आररिश यांनी गोव्यात सरकार अस्तित्वच नाही. आहेत ते भ्रष्टाचारी लोकांचे टोळके.लोकांना जे हवे तेच होईल. लोकांनी माहिती हक्काचा वापर करून राजकारण्यांना जाब विचारावा, असे सांगितले.
डॉ ऑस्कर रिबेलो, फातिमा डिसा, प्रा. पर्वतकर, श्रीपाद लोटलीकर ,राजाराम पालकर, डॉ. चोडणकर , दिनेश वाघेला, सुनील नाईक यांचीही भाषणे झाली. स्वागत व सूत्रसंचालन अशोक प्रभू यांनी केले. आभार सुनील नाईक यांनी मानले. या सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारचा निषेध करणारे, मंत्र्यांचा धिक्कार करणारे व महामार्ग आम्हाला नकोच, असा मजकूर लिहिलेले अनेक फलक सभागृहात जागोजागी लावण्यात आले होते.

No comments: