Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 28 August, 2010

रवींद्र केळेकर यांचे देहावसान


आज प्रियोळमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; राज्यात सुट्टी जाहीर
मडगाव, दि.२७ (प्रतिनिधी): थोर विचारवंत, प्रसिद्ध साहित्यिक, लेखक, गांधीवादी विचारांचे प्रवर्तक, तत्त्वज्ञानी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, पद्मभूषण रवींद्र केळेकर यांचे आज सकाळी ११ वाजता येथील अपोलो व्हिक्टर इस्पितळात देहावसान झाले. त्यामुळे साहित्यिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. उद्या शनिवारी (२८ ऑगस्ट) त्यांच्यावर शासकीय इतमामात दुपारी १२ वाजता प्रियोळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
फुफ्फुसाच्या विकाराने ते आजारी होते. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना फोंडा येथील इस्पितळातून "अपोलो'त दाखल करण्यात आले होते. काल पुन्हा ते अत्यवस्थ झाले व त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
केळेकर यांचे पार्थिव दुपारी मडगावहून त्यांच्या प्रियोळ येथील निवासस्थानी नेण्यात आले. उद्या शनिवारी दुपारी १२ वाजता प्रियोळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पुत्र गिरीश, सून व नातवंडे असा परिवार आहे. सुप्रसिद्ध लेखिका माधवी देसाई व सौ. केरकर तसेच कॉंग्रेस सरचिटणीस विजय सरदेसाई यांचे ते मामा होत.
अल्प परिचय
रवींद्र केळेकर यांचा जन्म ७ मार्च १९२५ कुंकळ्ळी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गुजरातेत व त्यानंतर पोर्तुगीज प्राथमिक शिक्षण दीवमध्ये झाले. तेथून गोव्यात आल्यावर आल्मेदा कॉलेज फोंडा व पणजी येथे लायसीएममध्ये पोर्तुगीजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांचे शिक्षण सुरू असतानाच डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोवामुक्तिच्या अंतिम लढ्याला १९४६ मध्ये सुरुवात केली. त्यात हिरीरीने ते सामील झाले. शिक्षण अर्ध्यावर सोडून त्यांनी गोवा मुक्तिलढ्यात स्वतःला झोकून दिले. त्यानंतर ३ वर्षांनी गोदुबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर दोघेही वर्धा येथे महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या व काकासाहेब कालेलकर चालवत असलेल्या आश्रमात सहभागी झाले.
या आश्रमात असताना त्यांनी तेथूनच "कोकणी मिर्ग' हे पाक्षिक सुरू केले व त्यात त्यांनी लेखन सुरू केले. त्यानंतर पुन्हा त्यांनी गोवामुक्ती संग्रामात भाग घेतला. १९५६ मध्ये त्यांनी मुंबई येथून "गोमंत भारती' हे रोमन लिपीतील मासिक सुरू केले. त्याचे ते स्वत: संपादक होते. त्यानंतर पुन्हा गोव्यात आले. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना पकडून कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये त्यांना मुक्त करण्यात आले. वाचन हा त्यांचा आवडता छंद. मराठी, कोकणी, हिंदी, गुजराती, बंगाली, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रजी आदी भाषांतील साहित्य त्यांनी वाचले. नंतर या भाषातून त्यांनी साहित्य रचना केली. गोवामुक्तिनंतर मराठी व कोकणी दैनिकांतून ते निरंतरपणे लेख लिहित होते.
कोकणी भाषा मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांचा पुस्तक संग्रह अफाट आहे.
कोकणीला राजभाषेचा दर्जा, साहित्य अकादमीची मान्यता, आठव्या परिशिष्टात समावेश व घटक राज्यासाठी सतत प्रयत्न असणाऱ्यात ते अग्रभागी होते. स्पष्टवक्तेपणा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. कोणाच्याही रागालोभाची ते पर्वा करीत नसत. त्यांनी देशविदेशात गांधी विचारांवर व्याख्याने दिली आहेत.

No comments: