Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 22 August, 2010

नोबॉल प्रकरणामुळे भारत आणखी भक्कम

श्रीलंकेला धोनीचा सूचक 'इशारा'
दांबुला, दि. २१ : श्रीलंकेविरुद्धच्या 'नोबॉल' प्रकरणाने आम्हाला अधिक आक्रमक होण्यास भाग पाडले आहे, परंतु आम्ही कोठेही मर्यादेचे उल्लंघन करणार नाही, असे रोखठोक मत व्यक्त करून टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आज (शनिवार) यजमानांना कडक इशारा दिला.
सूरज रणदीव याने आधीच्या सामन्यात शेवटचा चेंडू नोबॉल टाकला आणि त्यावरून निर्माण झालेले वादळ अजून शमलेले नाही. त्याचे कवित्व सुरूच आहे. त्यामुळे नेहमीच खिलाडूवृत्तीने खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची प्रतिमा जागतिक पातळीवर उजळून निघाली; तर यजमान श्रीलंकेची सर्वत्र नाचक्की झाली. या पार्श्वभूमीवर आज येथे पत्रकारांशी बोलताना धोनी म्हणाला, सदर नोबॉल प्रकरणाने आम्हाला आक्रमक होण्यास भाग पाडले असले तरी कोठेही मर्यादाभंग होणार नाही याची पुरेपूर दक्षता आम्ही घेऊ.
मैदानावर किती आक्रमक राहायचे हे आम्हाला अन्य कोणत्याही संघापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे माहीत आहे. आमच्याकडून कोणत्याही मर्यादेचे उल्लंघन होणार नाहीय अर्थात, आम्ही उद्याच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात जास्तीत जास्त आक्रमक राहू,' असा इशारा धोनीने दिला आहे."
नोबॉल प्रकरणामुळे जे घडले ते वाईट होते. त्याकडे लक्ष न देणे हेच उत्तम आहे. आता आम्ही मैदानावर काय करू शकतो यावरच लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल,' असे सांगून धोनी म्हणाला, "त्या दिवशी जे घडले ते आम्ही विसरलो आहोत आणि उद्याचा सामना कसा जिंकायचा याचा विचार करत आहोत.'
भारताला श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात विजय मिळाला तर अंतिम फेरीचा दरवाजा आपोआपच उघडला जाणार आहे. मात्र हवामानाचा घटक निर्णायक ठरू शकतो. आधीच्या न्यूझीलंड - श्रीलंका यांच्यातील सामन्यात त्याचा प्रत्यय आला आहेच. शिवाय नाणेफेकीचा कौल सर्वांत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारतीय संघातील केवळ युवराजसिंगचा अपवाद वगळता सर्वच खेळाडू फिट आहेत. रोहित शर्मा व विराट कोहली यांना जरी मोठी धावसंख्या उभारता आली नसली तरी तो काळजीचा मुद्दा नाही. सध्या आमचे गोलंदाज पूर्ण बहरात आहेत व हीच माझ्यासाठी व भारतीय संघासाठी महत्त्वाची बाब असल्याचे धोनी म्हणाला.

No comments: