Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 27 August, 2010

हे तर पढतमूर्ख लेखक

इसवी सन १७०७ मध्ये औरंगजेब दक्षिणेतच मरण पावला. तो मराठ्यांना आळा घालू शकला नाहीच पण थोड्याच काळात मराठ्यांनी, शाहू छत्रपतींचा पेशवा झालेल्या बाळाजी विश्वनाथच्या नेतृत्वात थेट दिल्लीपर्यंत मजल मारली. शिंदे, होळकर, गायकवाड, अशा नव्या फळीच्या सरदारांनी दिल्लीच्या बादशहाला नाममात्र बनवून राघोबादादाच्या नेतृत्वाखाली अटकेपार झेंडे नेलेत. मराठ्यांचे साम्राज्य अटक ते कटकपर्यंत पसरले होते. मराठे देशमुखी आणि चौथाई वसूल करीत. इतर कोणी नाही. पण मराठ्यांनी १७६१ साली जानेवारीत अहमदशहा अब्दालीशी तिसरे पानिपतचे युद्ध केले. त्यात लाख बांगडी पिचली तरी थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत मराठी सत्ता परत जोमाने उभी राहिली. त्यानंतर जवळपास अर्धशतकाने इंग्रजांनी १८१८ मध्ये शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकाविला. १६०७ ते १८१८ असा तब्बल दोनशे अकरा वर्षांचा कालखंड विंडी डेनियर ही विद्वान बाई एका ओळीत निकालात काढते. तिला लिहिण्यासारखी गोष्ट एकच दिसली की शाहूच्या ब्राह्मण पंतप्रधानाला घोड्यावर नीट बसता येत नसे.
असे हे अमेरिकन विद्वान आणि लेखक. त्यांची पुस्तके अमेरिकेतील "बाळे' वाचतात आणि परराष्ट्र विषयक धोरणे आखतात. अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धानंतर एकही युद्ध जिंकता आले नाही. त्याची रणनीती चुकत गेली. आताही अफगाणिस्तानमध्ये ती अयशस्वी माघार घेण्याच्या मार्गावर आहे. याचे कारण अमेरिकेतील नवी पिढी असा अर्धवट आणि विकृत इतिहास शिकून आपली परराष्ट्रीय धोरणे निश्चित करते. त्यांना अपयश नाही तर दुसरे काय मिळणार आहे.
अमेरिकेचे पाकिस्तानबाबतचे धोरणही असेच चुकीच्या गृहीतांवर आधारलेले आहे. केवळ भारताला शेजारी शत्रू निर्माण करून ठेवायचा याच एका हेतूने अमेरिकेने गेली साठ वर्षे पाकिस्तानला सर्व प्रकारे पोसले. तेथे तयार होणाऱ्या अणुबॉम्बकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. तालीबान्यांना खतपाणी घातले. आज तेच पाकिस्तान अमेरिकेसाठी अतिरेक्यांचे मोहोळ झाले आहे. गेल्या पाच दशके केलेली आर्थिक मदत, सध्या केवळ डॉलरच्या भरवशावर टिकून राहिलेली राजसत्ता या सर्व गोष्टींवर काणाडोळा करून बिन लादेनला आसरा देत आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या हिलरी क्लिंटन बाई इस्लामाबादमध्ये धडधडीत आरोप करतात की, काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांना बिन लादेनचा ठावठिकाणा माहीत आहे. (Times of India July 21, 2010) मात्र तरीही त्या पाकिस्तानी सरकारवर दबाव आणून बिन लादेनला जिवंत अथवा मेलेल्या स्थितीत पकडू शकत नाही.
अमेरिकेला साधे कळत नाही की पाकिस्तानला ते देत असलेली सढळ मदत थांबवून जर पाकिस्तानचे चार तुकडे केले, तर निर्माण झालेल्या चार देशांमध्ये पंजाबी पाकिस्तान, पख्तुनीस्थान, सिंध आणि बलुचीस्थान यांच्यात उघड वैर राहणार आहे. त्यातूनच बिन लादेन जिवंत अथवा मेलेल्या स्थितीत मिळण्याची शक्यता राहील. सध्या अमेरिकेविरुद्ध फळी उभारत असलेल्या चीनचा पाकिस्तानमधील प्रभाव कमी होईल. या सर्व गोष्टी पाकिस्तानचे विभाजन झाल्यास आपसूक घडतील. हा साधा विचार करण्याची पात्रता अमेरिकेच्या सामरिक तज्ज्ञांनी घालविली आहे. याचे कारण त्यांच्यात इतिहासकारांनी लिहिलेल्या विकृत आणि चुकीच्या इतिहासावर त्यांची सामरिक गृहीतके आधारलेली आहेत. पाकिस्तानच्या परमाणुबॉम्बचा धोका जसा भारताला आहे तितक्यात प्रमाणात किंबहुना आज त्यापेक्षा जास्त अमेरिकेला आहे. अमेरिकेवर उलटलेला तो भस्मासुर आहे. आता लेनसारखा लेखक मी प्राचीन वाङ्मयाच्या उपमांमधून इतिहासाचे विश्लेषण करतो म्हणून माझ्या लेखनावर ठपका ठेवेल. पाश्चात्त्य इतिहासात इतकी समर्पक उपासना अमेरिकेच्या परराष्ट्रीय धोरणातील मूर्खपणासाठी मला सुचत नाही आहे.
असे हे जेम्स लेन, विंडी डोनियरसारखे अति विद्वान (?) पढतमूर्ख अमेरिकन लेखक. ज्यांची आंतरिक इच्छा एकेश्वरी नसलेल्या हिंदू संस्कृतीला कमी लेखणे, हिंदूच्या इतिहासाला विकृतपणे मांडणे आणि हिंदूची अस्मिता दुखावणे, नष्ट करणे या पुरतीच मर्यादित आहे. त्याचे लेखन पारखूनच घ्यायला पाहिजे.
अशा पुस्तकावर बंदी घातली तर उलटाच परिणाम होईल. भारताचा इतिहास विकृतपणे कसा लिहिला जातो याचा अभ्यास करण्यासाठी ही दोन्ही पुस्तके महाविद्यालयीन स्तरावर त्यांच्या Suggestions and assumptions ची चिरफाड करत अभ्यासली जावीत. त्यांच्यावर न्यायालयात न टिकणारी बंदी घालून त्या लेखकांना फुकटचे हौतात्म्य देण्याची चूक करू नये.
(समाप्त)

No comments: