Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 4 July 2011

मानवता हाच धर्म : डॉ. आमटे

‘अरण्यातील प्रकाशवाटा’ मुलाखत रंगली

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)
आपण अनाथ व आदिवासींसाठी कार्य करताना कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. मानवता हाच धर्म मानून कार्य केले. आदिवासींना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी संघर्ष केला, असे ‘आनंदवन’चे संचालक आणि ‘मॅगसेसे’ पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले.
केरी - सत्तरी येथील स्वामी विवेकानंद स्मृती संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यानिमित्त कला अकादमी, पणजी येथे आयोजित ‘अरण्यातील प्रकाशवाटा’ या प्रकट मुलाखतीत डॉ. आमटे बोलत होते. डॉ. नारायण देसाई यांनी डॉ. आमटे व त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांची ही मुलाखत घेतली. आमटे दांपत्याच्या जीवनातील अनेक बर्‍यावाईट घटनांची सविस्तर माहिती ऐकून उपस्थित भारावले.
डॉ. आमटे म्हणाले, सामाजिक चांगुलपणावर कार्य चालते. आपले वडील बाबा आमटे यांनी बरेच परिश्रम घेऊन कुटुंबीयांना अनाथ, आदिवासी व कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे संस्कार दिले. मानवतेचे कार्य समजून आपण हे संस्कार पुढे चालवले. वन्यप्राणी मागून हल्ले करत नाहीत, मात्र माणूस हे कार्य अवश्य करतो असे डॉ. आमटे प्राण्यांच्या चांगुलपणावर बोलताना म्हणाले. प्राण्यांचे नैसर्गिक खाद्य माणसांनी संपवल्यामुळेच त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. जास्तीत जास्त झाडे लावणे व जंगलांचे रक्षण करणे हाच त्यावर उपाय आहे असेही ते म्हणाले.
विषारी व हिंस्र प्राणी पाळण्यात धोका असतो. साप हा तर फारच धोकादायक. एकदा तर पाळलेला साप चावल्यामुळे डॉ. प्रकाश आमटे यांच्या जिवावर बेतले होते असे डॉ. मंदाकिनी आमटे यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.
विदेशात कार्याची प्रसिद्धी झाल्यानंतर भारतातील प्रसिद्धिमाध्यमांनी आपले कार्य उचलून धरले. आपल्या निवासीशाळेत सध्या ६५० मुले असून ती १२ वी पर्यंत चालवली जाते. त्यासाठीचा खर्च सर्वसामान्यांच्या देणगीतून होतो. तसेच सरकारची काही मदत मिळते असे डॉ. आमटे यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.
सुमारे तासभर चाललेल्या या प्रकट मुलाखतीत डॉ. नारायण देसाई यांनी अनेक प्रश्‍न विचारून डॉ. आमटे दांपत्याचा जीवनपट उलगडला.
रौप्यमहोत्सवाची सांगता
या प्रकट मुलाखतीनंतर केरी येथील स्वामी विवेकानंद स्मृती संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता झाली. यावेळी सभापती प्रतापसिंह राणे, पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकर, संघाच्या रौप्यमहोत्सवी समितीचे अध्यक्ष रावसाहेब राणे, संस्था अध्यक्ष श्रीपाद गावस व डॉ. आमटे दांपत्य व्यासपीठावर उपस्थित होते. संघाच्या स्मरणिकेचे यावेळी विमोचन करण्यात आले. तसेच संघाला सहकार्य केलेल्या विविध संस्था व प्रसिद्धिमाध्यमे, डॉ. सोमनाथ कोमरपंत व डॉ. नारायण देसाई यांचा स्मृतिचिन्हे देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रनिवेदन डॉ. अजय वैद्य यांनी केले तर स्वागत व प्रास्ताविक रावसाहेब राणे यांनी केले. प्रतापसिंह राणे व डॉ. प्रकाश आमटे यांनी संघाला शुभेच्छा दिल्या. श्रीपाद गावस यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.

No comments: