तरुण विजय यांची घणाघाती टीका
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): परकीय संस्कृतीच्या गुलामगिरीचे अंश कॉंग्रेसच्या गुणसूत्रांतच पेरलेले आहेत. मातृभाषांचा गळा घोटून, गोव्याच्या अस्मितेवर वरवंटा फिरवून इथल्या संस्कृतीचे उच्चाटन करण्याचा हा डाव कॉंग्रेसच्या याच बाटग्या नीतीचा भाग असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे राज्यसभा खासदार तथा राष्ट्रीय प्रवक्ते तरुण विजय यांनी केला.
युवकांना संबोधित करण्यासाठी गोवा भेटीवर आलेले तरुण विजय यांनी आज इथे पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी भाजप सरचिटणीस गोविंद पर्वतकर व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हजर होते. गोव्यात प्राथमिक स्तरावर इंग्रजी माध्यमाला मान्यता देण्याचा निर्णय म्हणजे आपल्या आईचे दूध पिणार्या अर्भकाला हिसकावून घेऊन त्याला डब्याचे दूध पाजण्याचीच कृती होय, असेही ते म्हणाले. खुद्द रवींद्रनाथ टागोर यांनी प्राथमिक स्तरावर मातृभाषेचे महत्त्व विषद केले आहे. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावर कोणतेही माध्यम लावले तरी ते आत्मसात करण्याची त्यांची कुवत असते, असेही श्री. टागोर यांनी नमूद केल्याचे ते म्हणाले. विदेशी भाषेचा स्वीकार करून जगातील एकही देश महासत्ता बनला नाही, असे सांगताना चीनचे उदाहरणही त्यांनी दिले. चीनमध्ये इंग्रजी बोलणारा अभावानेच आढळेल; परंतु आज जगात दुसर्या स्थानावरील आर्थिक महासत्ता म्हणून हा देश उभा आहे, असे ते म्हणाले.
इंग्रजीला विरोध करण्याचा अजिबात प्रश्न येत नाही. परंतु, इंग्रजीची गुलामगिरी पत्करणे हे चुकीचेच आहे. पोर्तुगाली गुलामगिरीचा पगडा असलेल्या गोव्यातील कॉंग्रेसने मातृभाषेवर घाला घालून इंग्रजीकरणाचा हा डाव आखून गोव्याच्या अस्मितेवरच हल्ला केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. भाषा व संस्कृतीवरील हे अतिक्रमण गोमंतकीय जनता अजिबात सहन करणार नाही व स्वाभिमानी गोमंतकीयांच्या या लढ्याला भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
Sunday, 3 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment