Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 3 July 2011

भजन स्पर्धेत निषेधात्मक सहभाग

२०० भजन मंडळाच्या प्रतिनिधींचा एकमुखी ठराव
- अंतिम फेरीवर बहिष्कार
- बक्षिसे स्वीकारणार नाही

पणजी, दि. २ (प्रतिनिधी) : कला अकादमीतर्फे राज्यपातळीवर आयोजित करण्यात येणार्‍या कै. मनोहरबुवा शिरगावकर भजन स्पर्धेत गोव्यातील भजनी पथके विभागीय पातळीवर निषेधात्मक सहभाग नोंदवणार असली तरी दि. १५ ऑगस्ट रोजी पणजीत होणार्‍या अंतिम फेरीवर सरकारच्या मातृभाषाविरोधी निर्णयाचा निषेध म्हणून बहिष्कार घालणार आहेत. तसेच सरकारतर्फे दिले जाणारे कुठलेही बक्षीस स्वीकारले जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण ठराव आज पर्वरी येथे झालेल्या भजनी कलाकारांच्या भव्य मेळाव्यात एकमुखाने घेण्यात आला.
सुमारे २०० भजनी पथकांचे प्रतिनिधी उपस्थित असलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या निमंत्रक शशिकला काकोडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ भजनी कलाकार सर्वश्री पं. नाना शिरगावकर, पं. वामन पिळगावकर, मनोहरबुवा मांद्रेकर, मधूसुदन थळी, लाडू नाईक व मेळाव्याचे निमंत्रक विष्णू सुर्या वाघ व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी गोव्याच्या विविध भागांतून आलेल्या विविध भजनी पथकांच्या प्रतिनिधींनी सरकारी निर्णयाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. विष्णू नाईक, आनंद जल्मी, शेखर शेट्ये, विश्‍वनाथ पेडणेकर, प्रेमानंद नाईक, दत्ताराम ठाकूर, ज्योती मसूरकर, अनिल कोंडुरकर, बाबली कांदोळकर आदींनी यंदाच्या भजन स्पर्धेवर सरळसरळ बहिष्कार घालावा असे मत मांडले. प्रा. अनिल सामंत यांनी तुकारामांच्या अभंगाचा दाखला देऊन अशा संस्कृतीभंजक नाठाळांच्या माथ्यावर संतांनी काठीच हाणली असती, असे प्रतिपादन केले. गोव्यातील भजनी कलाकारांनी सांस्कृतिक संचित जपण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे यावे, असेही ते म्हणाले. दिगंबर कामत यांनी देव देव करून दानवाचे कार्य केले आहे, असा टोला श्रीमती काकोडकर यांनी हाणला तर विष्णू वाघ यांनी भजन स्पर्धेतील निषेधात्मक कार्यक्रमाचे स्वरूप कसे असेल याची सविस्तर माहिती दिली.
मेळाव्यादरम्यान दादा महाराज भजनी मंडळ फोंडा, वनदेवी महिला भजनी मंडळ कायसूव व शांतादुर्गा भूमिका पंचायतन भजनी मंडळ पर्रा यांनी भजन सादर केले. शेवटी निषेधात्मक सहभाग आंदोलन यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ भजनी कलाकार पं. नाना शिरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पं. वामन पिळगावकर, दामोदर शेवडे, पं. सोमनाथबुवा च्यारी, मनोहर मांद्रेकर, मधूसुदन थळी, लाडू नाईक, गोरख मांद्रेकर आदींची समिती स्थापण्यात आली.
----------------------------------------------------------------
असा नोंदवला जाईल निषेध
या स्पर्धेत विभागीय पातळीवरील सहभागी होताना पथके दंडाला काळ्या फिती लावून भजनाला बसणार आहेत. ज्या वाहनातून पथक स्पर्धास्थळी येईल, त्या वाहनावर निषेधात्मक फलक लावला जाईल. प्रत्यक्ष भजनालाही हा फलक घेऊनच पथके बसतील. हातातील भगव्या झेंड्यावर मराठी व कोकणीचा जयजयकार करणारे घोषवाक्य लिहिले जाईल. सरकारी अधिकार्‍याकडून फुले वा बक्षीस स्वीकारले जाणार नाही. या सर्व नियमांचे पालन न करणार्‍या पथकाला सदर ठिकाणी भजन सादर करू दिले जाणार नाही.
भजनाच्या शेवटी -
गजर करा रे गजर करा, मायबोलीचा गजर करा!
मराठी संगे असे कोकणी सत्य सदा हे मनी धरा!
असा गजर सर्व पथके करणार आहेत.

No comments: