Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 7 July, 2011

वृक्षवल्ली आम्हां सोयरी...

झाडे लावणे हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग ज्यावेळी बनेल, त्यावेळी वनमहोत्सव साजरे करण्याची गरजच उरणार नाही. मानवाचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर झाडे जगली पाहिजेत असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग म्हणजे झाडे हे वेगळे सांगायलाच नको. आपले पूर्वज झाडांचा वापर निवासासाठीही करायचे याची जाणीव आज माणसाने ठेवलेली नाही. जग अधिक सुंदर आणि संपन्न करायचे असेल तर वनसंपत्ती वाढायलाच हवी.
पानाफुलांनी बहरलेले एक झाड १० जणांना वर्षभर पुरेल एवढा प्राणवायू दर मोसमाला तयार करते, हे आपल्याला ठाऊक आहे का? आपण जो श्‍वास घेतो, तो वायू जंगलातील असंख्य झाडे गेली अनेक वर्षे शुद्ध करीत आहेत, याची जाणीव आपल्याला आहे का? जमिनीतील विषारी आणि विघातक रसायने आणि अशुद्ध द्रव्यपदार्थ एकतर शोषून घेऊन साठवणे अथवा त्याचे रूपांतर कमी धोकादायक द्रव्यात करण्याचे काम झाडे करीत असतात. सांडपाणी, विष्ठा, रसायने आदी घातक द्रव्यांचे शुद्धीकरण झाडे करतात. आवाजाचे प्रदूषण झाडे रोखतात हे अनेकांना ठाऊक नसेल. विशिष्ट अंतरावर लावलेली झाडे अथवा घराच्या सभोवती असलेली झाले ध्वनिप्रदूषण नियंत्रित करतात. डोंगराळ भागातून येणारे पाण्याचे लोट केवळ झाडेच थोपवू शकतात. जमिनीतून पाण्याने अचानक उसळी मारू नये यासाठी असंख्य झाडे लावणे म्हणूनच आवश्यक आहे.
कार्बन डायऑक्साईड शोषून घेत झाडे आपले अन्न तयार करतात, हे सार्‍यांनाच माहीत आहे. जंगल हे अशा वायूचे शुद्धीकरण केंद्र मानले जाते. हवा शुद्धीकरणाचे महान कार्य झाडे करीत असतात. त्याशिवाय उष्णता कमी करणे व अन्य धोकादायक वायू शोषून घेण्याचे कामही ती करतात. झाडांच्या सावलीचे महत्त्व तर सांगायलाच नको. वादळी वारे सुटले की झाडे डोलताना आपल्याला दिसतात. अनेकदा झाडे कोसळून पडतात. प्रत्यक्षात माणसावर होणारा जोरदार आघात ही झाडे सोसतात. झाडांमुळे जमिनीची धूप रोखली जाते. झाडे केवळ मातीच धरून ठेवत नाहीत, तर झाडांची पाने वार्‍याचा जोर नियंत्रित करतात आणि जमिनीवर होणारे वार्‍याचे व पावसाचे आक्रमण स्वतः झेलतात.
झाडांमुळेच जागेचे भाव वाढलेले दिसतात. जेथे झाडे अधिक तेथे जागांचे भाव जास्त अशी स्थिती आहे.
झाडांचे हे महत्त्व लक्षात घेतले तर त्यांचा संहार करायचा विचार कधीही सुज्ञ माणसाच्या मनातही येणार नाही. आपल्या संतांनी तर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ असे सांगून ते आपले नातलगच असल्याचे माणसाच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे.

No comments: