Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 5 July, 2011

विदेशातील काळा पैसाप्रकरणी केंद्राला चपराक

सुप्रीम कोर्टाकडून ‘एसआयटी’ स्थापन
माजी न्यायमूर्ती बी. पी. जीवनरेड्डी अध्यक्ष

नवी दिल्ली, दि. ४ : विदेशी बँकांमध्ये भारतीयांचा असलेला काळा पैसा परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून उचलण्यात येत असलेल्या पावलांवर आणि या प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आज १३ सदस्यीय उच्चस्तरीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. विदेशात असलेला काळा पैसा देशासाठी अतिशय घातक असल्याचे मत न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्यास उदासीन असलेल्या कॉंग्रेस प्रणित केंद्र सरकारला ही जबरदस्त चपराक असल्याचे मानले जात आहे.
माजी न्यायमूर्ती पी. पी. जीवन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली हे पथक स्थापन करण्यात आले आहे. न्यायमूर्ती एम.बी. शहा या पथकाचे उपाध्यक्ष आहेत. केंद्र सरकारने यापूर्वी जी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती, ती आमच्या या पथकाचाच एक भाग राहील, असे स्पष्ट करताना न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी आणि न्या. एस. एस. निज्जर यांच्या खंडपीठाने काळ्या पैशाच्या मुद्यावर केंद्रातील संपुआ सरकारवर ताशेरे ओढले. काळ्या पैशाच्या तपास प्रक्रियेत सरकारने ज्या काळा पैसाधारकांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे, त्या लोकांची नावे जाहीर करण्याचे निर्देशही न्यायालयाने यावेळी दिले. तथापि, जे काळा पैसाधारक अद्याप तपासाच्या कक्षेत आलेले नाहीत, त्यांची नावे जाहीर करण्यात येऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
विदेशी बँकांमध्ये असलेला काळा पैसा परत आणण्यात यावा, अशी विनंती करणार्‍या ज्येष्ठ कायदेपंडित राम जेठमलानी आणि इतरांच्या याचिकेवर न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले आहेत.
आम्ही जे विशेष तपास पथक स्थापन केले आहे, त्याबाबतची औपचारिक अधिसूचना सरकारने तात्काळ जारी करावी आणि आपल्या तपास समितीला या उच्चस्तरीय पथकाला सहकार्य करण्याचे आदेश द्यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
भारतीयांचा विदेशात काळा पैसा असणे हा भाग देशाच्या बाह्य सुरक्षेसाठी अतिशय घातक आहे. तो पैसा परत आणण्यासाठी आवश्यक असलेल्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव ही देशाच्या कमजोरीचे प्रतीक आहे, असे परखड मतही न्यायालयाने व्यक्त केले.
-------------------------------------------------------------------
‘‘संपुआ सरकार विदेशी बँकांमध्ये जमा असलेला काळा पैसा परत आणण्याबाबत मुळीच गंभीर नाही. विदेशी बँकांमध्ये असलेला काळा पैसा देशासाठी अतिशय घातक असून, तो परत आणणे आवश्यक आहे.’’ - सुप्रीम कोर्ट

No comments: