Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 5 July, 2011

मुक्तिलढा इतिहासातील खळबळजनक खुलासा..

पोर्तुगीज शरणागती कराराची
मूळ प्रत आत्ता सापडली

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): पोर्तुगिजांच्या ४५० वर्षांच्या जुलमी राजवटीतून आपल्या गोव्याला मुक्ती मिळून ५० वर्षे पूर्ण झाली. राज्य मुक्तीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत असतानाच मुक्तिलढ्याच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेबाबत आपण अजूनही अनभिज्ञ होतो, याचा उलगडा इतिहास संशोधकांनी केला आहे. गोव्याला मुक्त करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय सेनेसमोर पोर्तुगिजांनी पत्करलेल्या शरणागतीवेळी झालेल्या कराराची आपण पाहत आलो ती प्रत म्हणजे इच्छा प्रस्ताव आहे. या कराराची मूळ प्रत राजधानीत असलेल्या भारतीय लष्कराच्या मुख्यालयात भिंतीवर लावण्यात आली असून त्याची कुणालाच कल्पना नव्हती, असा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.
गोव्यातील इतिहास संशोधक संजीव सरदेसाई यांनी या इतिहासाला उजाळा दिला आहे. इतिहासातील या महत्त्वाच्या घटनेबाबत अनभिज्ञ असलेल्या राज्य सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे दाखवण्यात येणारी व राज्य वस्तुसंग्रहालयात प्रदर्शित करण्यात आलेली प्रत ही केवळ या तहासाठी पोर्तुगीज सरकारकडून सादर करण्यात आलेल्या इच्छा प्रस्तावाची प्रत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. पणजी येथील भारतीय लष्कराच्या २ ‘एसटीसी’ मुख्यालयाच्या एका भिंतीवर या तहाची मूळ पोर्तुगीज व इंग्रजीतील भाषांतराची प्रत प्रदर्शित करण्यात आली आहे. गोवा सरकारकडून दावा करण्यात येणारी प्रत ही तत्कालीन पोर्तुगीज लष्कराचे मुख्य कमांडंट जनरल मान्युएल आंतोनियो वासोलो सिल्वा यांनी भारत सरकारला सादर केलेले पत्र होते. राज्य वस्तुसंग्रहालयात प्रदर्शित करण्यात आलेला दस्तऐवजदेखील सिल्वा यांनी सादर केलेले पोर्तुगीज भाषेतील पत्र असल्याचेही श्री. सरदेसाई यांनी म्हटले आहे.
या शरणागती तहाच्या करारावर गोवा मुक्तीसाठी ऑपरेशन विजयचे नेतृत्व करणारे तत्कालीन मेजर जनरल के. पी. कॅडेंथ व पोर्तुगीज लष्कराचे कमांडंट सिल्वा यांच्या स्वाक्षर्‍या झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. हा करार मूळ पोर्तुगीज भाषेतून तयार करण्यात आला होता व त्याचे इंग्रजीत भाषांतर केल्याचा महत्त्वाचा दस्तऐवज आता उपलब्ध झाला आहे.
दरम्यान, या कराराची मूळ प्रत राज्य सरकारने ताबडतोब आपल्या ताब्यात घेण्याची गरज आहे, असे मत इतिहास संशोधक रोहित फळगावकर यांनी व्यक्त केले. गोमंतकीयांना खर्‍या इतिहासाची ओळख व्हावी यासाठी या कराराची मूळ प्रत राज्य वस्तुसंग्रहालयात उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. वस्तुसंग्रहालयात प्रदर्शित करण्यात आलेली प्रत ही गोवा मुक्ती संग्राम पुस्तकात प्रसिद्ध केलेल्या एका मजकुरात दिलेली प्रत असून ती २००४ सालापासून प्रदर्शित करण्यात आल्याची माहिती वस्तुसंग्रहालय संचालक राधा भावे यांनी दिली. आता मूळ शरणागती तह कराराची प्रत सापडल्याचा उलगडा झाल्याने ती मिळवण्यासाठी जरूर प्रयत्न करू, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, माध्यमिक स्तरावरील इतिहास पाठ्यपुस्तकात ‘गोव्याचा इतिहास’ या धड्यात हा करार तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नरच्या गाडीच्या उजेडाखाली संध्याकाळी ७.३० वाजता वास्को द गामा येथे सही केल्याचा उल्लेख करण्यात आला असून तो ब्रिगेडिअर के. एस. धिल्लोन यांना सादर केल्याचे म्हटले आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र या करारावर सध्याच्या पणजी पोलिस मुख्यालयासमोर रात्री ८.३० वाजता स्वाक्षर्‍या करण्यात आल्याची माहितीही श्री. सरदेसाई यांनी दिली.

No comments: