Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 9 July 2011

‘आझिलो’तील रुग्ण आणि कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात

- छप्पर कधीही कोसळण्याच्या स्थितीत
- ‘पुरुष मेडिसीन वॉर्ड त्वरित खाली करा’
- आरोग्यमंत्री मात्र ‘पीपीपी’करणातच दंग

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): म्हापसा येथील आझिलो इस्पितळाच्या जीर्ण इमारतीतील पुरुष मेडिसीन वॉर्डाचे छप्पर अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने हा वॉर्ड ताबडतोब खाली करा, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याने केल्याने सर्वांची एकच धांदल उडाली आहे. दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने धोकादायक ठरवलेल्या या वॉर्डाच्या छप्पर दुरुस्तीचा प्रस्ताव आरोग्य खात्यात धूळ खात पडून आहे. अत्यंत महत्त्वाच्या दुरुस्ती कामाकडे आरोग्य खात्याकडून झालेली बेपर्वाई म्हणजे येथील रुग्ण व कर्मचार्‍यांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार असल्याने याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हे म्हापसा जिल्हा इस्पितळाचे ‘पीपीपी’करण करून लोकांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी गेल्या आठवड्यातच केला होता. आता आझिलोतील या प्रकरणामुळे रुग्ण व कर्मचार्‍यांच्या जिवाशी गेली दोन वर्षे भयानक खेळ सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने आरोग्य खात्याचा अनागोंदी कारभार उघड झाला आहे. आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या वल्गना करणार्‍या विश्‍वजित राणे यांचे आरोग्य खाते आझिलोतील सर्वांत जास्त रुग्णांचा भरणा असलेल्या मेडिसीन वॉर्डाच्या छपराच्या दुरुस्तीसाठी ८७,१०० रुपये खर्च करण्यास असमर्थ असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
म्हापसा आझिलो इस्पितळाची दयनीय अवस्था पाहता या इस्पितळाचे जिल्हा इस्पितळ इमारतीत ताबडतोब स्थलांतर करण्याचे सोडून जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’करणातच आरोग्य खाते मग्न आहे. ‘पीपीपी’बाबत आरोग्यमंत्र्यांचा हट्ट आता रुग्ण व कर्मचार्‍यांच्या जिवावरच बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आझिलो इस्पितळातील पुरुष मेडिसीन वॉर्ड तथा बालरोग उपचार विभागाचे छप्पर धोकादायक बनल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या म्हापसा इमारत विभागाने ९ जुलै २००९ रोजी आझिलो इस्पितळाच्या तत्कालीन आरोग्य अधीक्षक, आरोग्य संचालक तथा सा. बां. खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना सादर केला होता. दरम्यान, या दुरुस्ती कामाचा खर्च नेमका कोणी उचलावा यावरून आरोग्य खाते व सा. बां. खाते यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. हे दुरुस्तीकाम थेट लोकांच्या जिवाशी संबंधित असल्याने त्यासाठी आरोग्य खात्याने पुढाकार घेण्याची गरज होती. परंतु, आरोग्य खात्याने याचे गांभीर्य अजिबात लक्षात घेतले नाही. सा. बां. खात्याचे तत्कालीन साहाय्यक अभियंते संजय रायकर यांनी यासंबंधी वेळोवेळी आरोग्य खात्याला स्मरणपत्रे पाठवल्याचे उघड झाले. ५ मे २०११ रोजी याप्रकरणी नव्याने स्मरणपत्र पाठवून आरोग्य खात्याला दक्ष करण्यात आले. परंतु, या स्मरणपत्रालाही आरोग्य खात्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. एवढे करूनही आरोग्य खाते कोणताही पुढाकार घेत नसल्याची गोष्ट लक्षात येताच गेल्या ३० जून २०११ रोजी या छपराची नव्याने पाहणी करून त्यासंबंधी निर्वाणीचा इशारा आरोग्य खात्याला देण्यात आला. १ जुलै २०११ रोजी सा. बां. खात्याचे विद्यमान साहाय्यक अभियंते जुझे कार्वालो यांनी आरोग्य अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात पुरुष मेडिसीन वॉर्ड धोकादायक स्थितीत असल्याने अनर्थ टाळण्यासाठी तो तात्काळ खाली करा, असा आदेशच दिला आहे.
आरोग्य अधीक्षक बेपर्वा
आझिलो इस्पितळाचे माजी आरोग्य अधीक्षक डॉ. दळवी यांच्याकडे याप्रकरणी सा. बां. खात्याने सातत्याने या प्रस्तावाचा पाठपुरावा केल्याचे उघडकीस आले आहे. आता डॉ. दळवी यांची बदली होऊन डॉ. रूहा डीसा यांची नियुक्ती झाली आहे. आज त्यांच्याशी संपर्क साधला असता या कामाशी आरोग्य खात्याचा काहीही संबंध नाही व ही दुरुस्ती सा. बां. खात्यानेच करायला हवी, असे सांगून त्यांनी जुनी परंपराच पुढे चालवली. आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई यांना फोन केला असता त्यांनी आपल्याला ही फाईल तपासावी लागेल व त्यानंतरच आपण याबाबत भाष्य करू, असे सांगितले. हा दुरुस्ती प्रस्ताव मंजूर करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे व हा खर्च मंजूर करून त्यासंबंधी आरोग्य खात्याला पत्र पाठवण्याची जबाबदारीही त्यांचीच, असेही त्या म्हणाल्या. सा. बां. खात्याचे म्हापशातील साहाय्यक अभियंते जुझे कार्वालो यांना विचारले असता त्यांनी मात्र या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. आपण स्वतः या छपराची पाहणी केली आहे व ते अत्यंत धोकादायक परिस्थितीत असल्याचे त्यांनी मान्य केले. आझिलो इस्पितळाच्या देखरेखीची जबाबदारी सा. बां. खात्याची आहे व ती सुरूच असते. एखादे महत्त्वाचे दुरुस्तीकाम असले तर ते आरोग्य खात्याला प्राधान्यक्रमाने खर्च करून करावे लागते व त्यासाठीचा खर्च नंतर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून घेण्याची सोय असते. या कामाच्या खर्चाची जबाबदारी उचलण्याची वारंवार विनंती करूनही या खात्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असेही ते म्हणाले. ही धोकादायक परिस्थिती पाहता आपण या संपूर्ण प्रकरणाची फाईल आता प्रधान मुख्य अभियंते श्री. रेगो यांच्याकडे पाठवली आहे, असेही ते म्हणाले.

No comments: