Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 7 July, 2011

‘देशप्रभूंची हकालपट्टी करा’

राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘धुमशान’
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू यांनी पक्षाच्या गोवा प्रभारी भारती चव्हाण यांना उद्देशून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा चांगलाच भडका आज पक्षाच्या बैठकीत उडाला. राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष सुरेश परूळेकर व इतर बहुतांश सदस्यांनी देशप्रभू यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी केली. प्रदेशाध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी मात्र श्री. देशप्रभू यांच्या वक्तव्याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त न करता स्थानिक नेत्यांची भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचवण्यात येईल, असे सांगून वेळ मारून नेली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभारीपदी नियुक्त झालेल्या भारती चव्हाण यांनी सध्या पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा झपाटा लावला असतानाच त्यांच्या नेतृत्वावरूनच सध्या पक्षात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. कोरगाव बेकायदा खाण प्रकरणी सुरू असलेल्या पोलिस चौकशीत पक्ष अजिबात हस्तक्षेप करणार नाही, असे वक्तव्य केल्याने जितेंद्र देशप्रभू यांनी श्रीमती चव्हाण यांच्यावर बरीच आगपाखड केल्याने पक्षातील अनेक नेते चवताळले आहेत. भारती चव्हाण यांनी पैसे घेऊन पक्षाची पदे वाटली व विधानसभेच्या तिकिटे विक्रीस काढण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सुरेश परूळेकर यांनी पैसे देऊनच पद मिळवल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला होता. देशप्रभूंच्या या वक्तव्याला श्री. परूळेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. आपली राजकीय कारकीर्द व सामाजिक कार्य पडताळूनच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला हे पद बहाल केले आहे व त्यामुळे आपल्या निवडीत भारती चव्हाण यांची कोणतीच भूमिका नसल्याचा दावा त्यांनी केला. जितेंद्र देशप्रभू हे बेकायदा खाण प्रकरणात अडकल्याने ते सैरभैर झाले आहेत व त्यामुळेच ते बेताल वक्तव्ये करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. पक्षाच्या एका जबाबदार नेत्याकडून एका महिला निरीक्षकाबाबत अशा पद्धतीची भाषा वापरणे ही पक्षासाठी चांगली गोष्ट नसून अशा वृत्तीला पक्षात अजिबात थारा देता कामा नये, असे मतही श्री. परूळेकर यांनी बोलून दाखवले. पेडणेचे ‘भाटकार’ असलेल्या देशप्रभू यांनी या भागातील बहुजन समाजाची पिळवणूक करण्याचेच काम केले आहे. एकदा येथील लोकांनी त्यांना चांगलीच अद्दल घडवल्याचा टोला हाणून त्यांना पक्षात अजिबात मान नसल्यानेच ते बरळत आहेत, असा आरोपही श्री. परूळेकर यांनी केला.
देशप्रभूंचे पद हा पांढरा हत्ती
जितेंद्र देशप्रभू यांचे पक्षातील पद म्हणजे पांढरा हत्ती आहे व त्यांचा पक्षाला काहीच फायदा नसल्याने त्यांना या पदावरून हटवणेच पक्षाच्या हिताचे आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला. याप्रसंगी पांडुरंग राऊत, फेर्मिना खंवटे, व्यंकटेश प्रभू मोनी, देवानंद नाईक, ऍड. महेश राणे, संतोष शिरोडकर, दिगंबर शिरोडकर, शशी पणजीकर आदींनी श्री. परूळेकर यांच्या भूमिकेचे समर्थन केले व देशप्रभू यांची हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी केली.
प्रदेशाध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी मात्र श्री. देशप्रभू यांच्यावर टिप्पणी करण्याचे टाळले. श्री. देशप्रभू हे राष्ट्रीय सचिव आहेत व त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आपल्याला नाही. त्यांचे पद थेट पक्षश्रेष्ठींच्या अखत्यारीत येत असल्याने आपण केवळ स्थानिक नेत्यांनी उपस्थित केलेल्या भावना श्रेष्ठींपर्यंत पोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक जबाबदार नेता म्हणून त्यांनी हा विषय योग्य व्यासपीठावर उपस्थित करणे अपेक्षित होते. परंतु, थेट प्रसारमाध्यमांकडे भारती चव्हाण यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणे ही चूक असल्याचेही ते म्हणाले. पक्षाध्यक्षांच्या या भूमिकेबाबत उपस्थित नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्याचाही प्रकार या ठिकाणी घडला.
युवा राष्ट्रवादीचा देशप्रभूंना पाठिंबा?
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा अध्यक्ष तन्वीर खतीब यांनी श्री. देशप्रभू यांची बाजू घेण्याचाच प्रकार यावेळी घडला. भारती चव्हाण यांच्याकडून संपूर्ण संघटनेची सूत्रे आपल्या हाती ठेवण्याची धडपड चालली आहे. पक्षातील ज्येष्ठ पदाधिकार्‍यांना विश्‍वासात न घेताच त्यांनी आपल्या मर्जीतील लोकांचा भरणा करून कार्य चालवल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. सध्या पक्षात चमचेगिरी करणार्‍यांची चलती असून प्रामाणिक कार्यकर्ते बाजूला पडले आहेत, अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली.

No comments: