भजनी मंडळ प्रमुखांना पाचारण
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): माध्यम प्रश्नावरून सुरू झालेल्या लढ्यात भजनी कलाकारांनीही उडी घेतल्याने कला अकादमीसमोर गंभीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. भजनी कलाकारांनी या स्पर्धेत निषेधात्मक सहभाग नोंदवण्याचा निर्णय घेतल्याने यंदाच्या भजन स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट पसरले असून कोणत्याही परिस्थितीत हा विरोध मोडून काढण्यासाठी उद्या ६ रोजी कला अकादमीने भजनी मंडळ प्रमुखांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. उद्या दुपारी ३ वाजता मा. दिनानाथ मंंगेशकर सभागृहात ही बैठक घेतली जाणार असल्याचे अकादमीने जाहीर केले आहे.
दरम्यान, दि. १५ ऑगस्ट रोजी होणार असलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीवर बहिष्कार घातलेल्या भजनी कलाकारांनी या दिवशी पणजी शहरात महादिंडीचे आयोजन केले आहे. या महादिंडीला अलोट गर्दी उसळण्याची धास्ती कला अकादमीने घेतली आहे. इंग्रजीकरण करण्याचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडेच सांस्कृतिक खाते असल्याने या स्पर्धा अधिकच संकटात आल्या आहेत.
येत्या काही दिवसांत तालुका स्तरावर या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र, गोव्यातील ज्येष्ठ भजनी कलाकारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने अकादमीसमोर तज्ज्ञ परीक्षक मिळवण्याचीही अडचण उभी राहिली आहे. तालुका स्तरावरील पथके अंतिम फेरीत सहभागी होणार नसल्याने या स्पर्धेचे एकूण भवितव्यच अधांतरी बनले आहे.
Wednesday, 6 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment