Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 9 July, 2011

काब द राम येथे २ विद्यार्थी बुडाले

- एक मृतदेह सापडला
- ५ जणांना वाचविले

मडगाव, दि. १० (प्रतिनिधी): पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राचा अनुभव घेण्यासाठी काब द राम येथे सहलीसाठी गेलेल्या मडगाव येथील दोन उच्च माध्यमिक विद्यालयांतील अकरा विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी आज तेथे आलेल्या एका प्रचंड लाटेच्या तडाख्याने समुद्रात वाहून गेले. त्यातील एकाचा मृतदेह सापडला असून दुसरा बेपत्ता आहे. त्याच लाटेच्या तडाख्यात सापडलेल्या अन्य पाच विद्यार्थ्यांना वाचविण्यात आले असून त्यात तीन मुलींचा समावेश आहे. पैकी एकीला हॉस्पिसियोत दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह सापडलेल्या विद्यार्थ्याचे नाव सुनील रामचंद्रन (१७) असे असून तो नावेली येथील आहे. त्याचा मृतदेह हॉस्पिसियोत ठेवण्यात आला आहे. नोएल मिलाग्रीस हा मडगावचा विद्यार्थी बेपत्ता असून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. दुर्घटनेचे वृत्त कळताच कुंकळ्ळी पोलिसांनी व जवळच्या मासेमारांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. पाण्यात फेकल्या गेलेल्या मुलींना १०८ रुग्णवाहिकेतून हॉस्पिसियोत दाखल केले गेले. त्यातील अंजुमन खान हिच्यावर उपचार सुरू आहेत तर इतरांना घरी जाऊ देण्यात आले.
पावसाळ्यातील खवळलेल्या समुद्राचा अनुभव घेण्यासाठी हा गट दुपारी काब द राम येथे गेला होता. सर्वत्र भटकून दुपारी ३.३० च्या सुमारास त्यातील सात जण समुद्राच्या काठावर असलेल्या एका मोठ्या दगडावर बसून गप्पा मारत असताना एका अजस्र लाटेने त्यांना पाण्यात ओढले. दुसर्‍या बाजूला उभे असलेल्या चौघांनी उड्या टाकून दोघा मुलींना वाचविले. मिळालेल्या माहितीनुसार, या गटात सहा विद्यार्थी व तीन मुली होत्या. अन्य दोघे या विद्यार्थ्यांचे मित्र होते. समुद्र भयंकर खवळलेला असल्याने तेथे जास्त वेळ थांबू नका, असे येथील स्थानिक मच्छीमारांनी त्यांना बजावले होते, असेही कळते.
फातोर्डा येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ‘एटीकेटी’ परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी घोगळ येथील उच्च माध्यमिक विद्यालयात आले व तेथेच त्यांचा हा सहलीचा बेत ठरला. त्यानंतर ते सर्वजण मोटरसायकलने काब द राम येथे गेले व ती सहलच त्यांच्या अंगलट आली. गेल्या वर्षी याच दिवसांत रेडकर नामक विद्यार्थी तेथे असाच बुडाला होता. कुंंकळ्ळी पोलिस निरीक्षक नेल्सन आल्बुकर्क पुढील तपास करीत आहेत.

No comments: