Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 8 July 2011

राज्यात दोन खून

वास्कोत वृद्धेला चोरांनी तर, सांगेत पित्याला मुलाने संपवले
वास्को व पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): राज्यात गेल्या २४ तासांत दोन विविध ठिकाणी घडलेल्या घटनांत दोघांचा खून झाल्याने एकच खळबळ माजली आहे. दाबोळी येथे आज चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी आयवन पायस या ७१ वर्षीय वृद्धेचा खून केला तर, आमडे - सांगे येथे काल रात्री मुलाशी क्षुल्लक कारणावरून सुरू झालेले भांडण हातघाईवर आल्याने म्हाळगो गावकर (६०) या त्याच्या वडलांना प्राणाला मुकावे लागले. वास्को खून प्रकरणातील चोरटे पसार झाले आहेत तर, सांगे खूनप्रकरणी म्हाळगो गावकर यांचा मुलगा सागर गावकर (२६) याला अटक करण्यात आली आहे.
वास्कोत वृद्धेचा निर्घृण खून
दाबोळी येथील ‘गेट गोरमेन्ट’ या बंगल्यात राहणार्‍या एका वृद्ध जोडप्याच्या घरात आज घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी आयवन पायस या वृद्धेचा निर्घृण खून केला व तिचे पती मेक्सिमियानो पायस (७५) यांना गंभीर जखमी करून शयनगृहात कोंडून ठेवले. रात्री उशिरापर्यंत वेर्णा पोलिसांना चोरांचा थांगपत्ता लागला नव्हता. चोरांनी बंगल्याच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केल्याचे पोलिसांना आढळून आले.
सविस्तर माहितीनुसार, दाबोळी येथील सदर बंगल्यात वृद्ध पायस जोडपे राहायचे. त्यांचे दोन मुलगे परदेशात असून विवाहित मुलगी पणजी येथे राहते. आज सकाळी श्री. पायस यांच्या कॅनडात राहणार्‍या मर्वीन या मुलाने त्यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी तो न घेतल्याने त्याने आपल्या पणजीतील कॅसिया या बहिणीला फोन करून याबाबत माहिती दिली. आईवडील सकाळी कुठेतरी गेले असतील म्हणून कॅसिया हिने दुपारी त्यांना पुन्हा फोन लावला. मात्र तेव्हाही फोन उचलला न गेल्याने तिने त्यांच्या शेजार्‍यांना फोन करून त्यांची चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार शेजारी राहणार्‍या सीमा राव यांनी पाहणी केली असता पायस यांची गाडी बंगल्यातच असल्याचे व सकाळी दरवाजाबाहेर ठेवलेले वृत्तपत्र व दुधाची पिशवी तिथेच असल्याचे त्यांना दिसले. बारकाईने पाहणी केली असता त्यांना बंगल्याच्या खिडकीचे गजही कापल्याचे दिसले. त्यांनी लगेचच कॅसिया हिला फोन करून ही माहिती दिली व त्यानंतर वेर्णा पोलिसांना कळवण्यात आले.
वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी येऊन बंगल्याचा दरवाजा उघडला असता आतील हॉलमध्ये आयवन हिचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांच्या दृष्टीस पडला. तर, शयनगृहामध्ये गंभीर जखमी झालेले बेशुद्ध अवस्थेतील मेक्सिमियानो आढळून आले. पोलिसांनी त्वरित १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना चिखलीतील खासगी इस्पितळात दाखल केले. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात डोक्यावर हत्याराने वार केल्याने आयवन हिला मृत्यू आल्याचे उघड झाले आहे. मृतदेह हॉस्पिसियोत पाठवण्यात आला आहे. दरम्यान, कॅसिया हिला ही माहिती मिळताच ती दाबोळीला दाखल झाली. आपण काल रात्री ८ वाजता आपल्या आईवडलांशी फोनवर शेवटचा संवाद साधला होता, असे तिने सांगितले. चोरीच्या उद्देशानेच हा खून करण्यात आलेला असला तरी चोरट्यांच्या हाती विशेष असे काहीच लागू शकले नाही. वृद्ध जोडप्याने सुरक्षेच्या कारणास्तव घरातील सर्व मौल्यवान वस्तू बँकेत लॉकरमध्ये ठेवल्या होत्या, अशी माहिती कॅसिया हिने दिली.
वेर्णा पोलिसांनी या प्रकरणी या भागातील १५ बिगर गोमंतकीय कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती उपअधीक्षक महेश गावकर यांनी दिली. चोरांशी वृद्ध जोडप्याची झटापट झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी एकंदर दिसलेल्या परिस्थितीवरून वर्तवला आहे. तपासासाठी श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. या परिसरात अनेक बंगले असून चोरांनी वृद्ध पायस पतीपत्नींवर अनेक दिवसांपासून पाळत ठेवली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वेर्णा पोलिसांनी अज्ञातांविरोधात भा. दं. सं.च्या ३०२, ३०७, ४४९ व ३४९ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. निरीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
सांग्यात मुलाकडून वडलांची हत्या
दरम्यान, आमडे - सांगे येथे वडील व मुलाचे क्षुल्लक कारणावरून सुरू झालेले भांडण हातघाईवर आल्याने वडलांना प्राण गमवावा लागला. या प्रकरणात मुलगा सागर गावकर (२६) याला सांगे पोलिसांनी अटक केली आहे. संशयित सागर याने आपले वडील म्हाळगो गावकर (६०) यांच्या डोक्यावर दंडुक्याने वार केल्याने त्यांचे प्राणोत्क्रमण झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यावरून त्याच्या विरुद्ध भा. दं. सं. ३०४ कलमानुसार गुन्हा नोंद केला असून उद्या सकाळी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
अधिक माहितीनुसार, सदर घटना काल रात्री घडली. मयत म्हाळगो हा दारूच्या नशेत घरी आल्याने सागर आणि म्हाळगो यांच्या जोरदार बाचाबाची सुरू झाली. यावेळी म्हाळगो यांनी सागर याच्यावर हल्ला केल्याने प्रतिहल्ला करताना त्याने वडलांवर दंडुक्याने वार केला. त्यातच त्याचा जीव गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. म्हाळगो यांच्या शवचिकित्सा अहवालात डोक्यावर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, वडील व मुलाचे काल रात्री भांडण झाले होते, असा जबाबही म्हाळगो यांची पत्नी व दोन मुलींनी पोलिसांना दिला आहे. या विषयीचा अधिक तपास सांगे पोलिस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोसकर करीत आहेत.

No comments: