Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 9 July, 2011

उपअधीक्षकांकडून लैंगिक अत्याचार

महिला पोलिस शिपायाच्या तक्रारीवरून
गोवा पोलिसांची अब्रू पुन्हा चव्हाट्यावर

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): छळवणुकीच्या कारणावरून पोलिस शिपाई चंद्रू गावस याने केलेली आत्महत्येची घटना धगधगत असतानाच आता गुन्हा अन्वेषण विभागातील एका महिला पोलिस शिपायाने पोलिस उपअधीक्षकांविरोधात लैंगिक अत्याचाराची लेखी तक्रार दाखल केल्याने गोवा पोलिसांत हलकल्लोळ माजला आहे. या तक्रारीची पोलिस महासंचालक आदित्य आर्य यांनी गंभीर दखल घेतली असून त्याची चौकशी करण्याचे आदेश महिला पोलिस उपअधीक्षक रीना तोरकाटो यांना दिले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयाच्या घेर्‍यात आलेले सदर पोलिस उपअधीक्षक पीडित महिला पोलिसाला अश्‍लील ‘एसएमएस’ पाठवत होते. तसेच, तिला घरी पोचवण्याच्या बहाण्याने आपल्या वाहनात बसण्यास भाग पाडत होते व तिच्याशी अश्‍लील संभाषण करत होते. या अधिकार्‍याची वागणूक असह्य झाल्याने अखेर तिने याची लेखी तक्रार विभागाचे पोलिस अधीक्षक मंगलदास देसाई यांच्याकडे केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या ‘विशाखा’ निवाड्यानुसार, एकाच कार्यालयातील सहकार्‍यावर लैंगिक अत्याचार झाल्यास त्याची चौकशी खात्यातील वरिष्ठ महिला अधिकार्‍यांमार्फत करावयाची असल्याने ही तक्रार महिला पोलिस उपअधीक्षकांकडे पाठवण्यात आली आहे.
आज संध्याकाळी ‘त्या’ पोलिस उपअधीक्षकाला पोलिस महानिरीक्षक सुंदरी नंदा यांनी पोलिस मुख्यालयात बोलावून घेतले होते. मात्र, तिथे कोणती चर्चा झाली याची माहिती मिळाली नाही. दरम्यान, लक्षणीय बाब अशी की, याच पोलिस अधिकार्‍यावर यापूर्वीही अशाच प्रकारच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षी लैंगिक अत्याचाराला कंटाळून ‘आयआरबी’च्या एका महिला शिपायाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस बॅरेकमध्ये झोपेच्या गोळ्या घेतल्याने तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. यानंतर प्रदीर्घ रजेनंतर तिला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले. तिच्या तक्रारीवरून कोणती कारवाई करण्यात आली, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

No comments: