Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 23 April, 2010

गोव्यात प्रथमच बुबूळ पुनर्रोपण

पणजी, दि. २२ (विशेष प्रतिनिधी): दान असे द्यावे की दिल्यानंतर देणारा गरीब होऊ नये आणि घेणारा श्रीमंत व्हावा. असे एक अनोखे दान प्राप्त झाले ते गोव्यातील ५६ वर्षीय शेतकरी दुळो बेतकीकर यांना. फेब्रुवारी महिन्यात डोळ्यातील विकारामुळे दृष्टिहीन झालेल्या बेतकीकरांना दृष्टीची श्रीमंती विनामूल्य लाभली ती रोटरी क्लब पणजीची नेत्रपेढी आणि वृंदावन इस्पितळ म्हापसा यांच्या सौजन्याने.
गोव्यातील पहिली बुबूळ (कॉर्निया) पुनर्रोपण शस्त्रक्रिया करण्याचा मान या नेत्रपेढीला तसाच इस्पितळाला लाभला हेच विशेष. अशा प्रकारच्या आणखी १० शस्त्रक्रियांचा आर्थिक भार पेलला आहे विजय प्रियोळकर यांनी. या बुबुळाचे दान मदुराईतल्या व्यक्तीकडून रोटरी क्लब पणजीच्या नेत्रपेढीद्वारे आयोजित करण्यात आले जेणेकरून बेतकीकरांच्या निकामी डोळ्याला पुन्हा एकदा प्रकाशाची किरणे दिसू लागली.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत खुद्द बेतकीकर उपस्थित होते. सद्गतीत आवाजात ते म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात डोळ्याच्या विकाराने मी त्रस्त झालो. दिसायचे बंद झाले म्हणून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात गेलो. महिनाभर उपचार झाला पण गुण नाही. मग तेथील एका डॉक्टराने मला मुंबईत पुढील उपचारासाठी जाण्यास सांगितले. मी पडलो गरीब, कसा जाणार? पण आखणी एका डॉक्टराच्या रूपात देव पावला व मला पणजी रोटरी क्लबच्या नेत्रपेढीबद्दल सांगण्यात आले. वृंदावन इस्पितळात एका आठवड्यापूर्वी शस्त्रक्रिया झाली व आता मला दिसू लागले आहे.
या विषयी बोलताना नेत्रपेढीचे अध्यक्ष अविनाश भोसले म्हणाले की, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या मरणोत्तर दानामुळे अनेकांच्या जीवनात प्रकाश येऊ शकतो. या विषयी समाजात योग्य ती जागृती झाली पाहिजे. नेत्रपेढीशी संलग्न दोन स्वयंसेवक गोमेकॉत कार्यरत असून ते मृतांच्या नातेवाइकांकडे संपर्क ठेवतील.
गोमेकॉने आम्हाला वेळोवेळी माहिती पुरवली तर अनेकांचे खराब झालेले डोळे पुन्हा सजीव होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. दिगंबर नाईक म्हणाले की, आम्हा सर्वांसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. गोव्यात अनेक लोक असे आहेत की ज्यांचे बुबूळ निकामी झाले आहेत. अशा मरणोत्तर दानाने असे लोक पुन्हा एकदा दृष्टीचा आनंद घेऊ शकतील. एखादी व्यक्ती, तरुण किंवा वयोवृद्ध मरण पावल्यावर सहा तासांच्या आत त्याचे बुबूळ काढावे लागते व पुढील चार दिवसात त्याचे पुनर्रोपण करावे लागते. देशातील कुठल्याही राज्यात या दान केलेल्या बुबुळाचा उपयोग केला जाऊ शकतो, हे विशेष.
बौद्ध धर्मातील समर्पण आणि त्यागाच्या शिकवणीमुळे श्रीलंकेतील लोक आपले बुबूळ मरणोत्तर दान करतात, याचे उदाहरण गोवेकरांनी घेतले पाहिजे, असे डॉक्टर म्हणाले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या सहकार्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
हल्लीच प्राध्यापक केळेकर व रोटरीयन महेश राव यांनी केलेल्या मरणोत्तर बुबूळ दानामुळे पुणे येथील चार जणांना पुनश्च दृष्टीचा लाभ झाला. रोटरी क्लब पणजीचे अध्यक्ष सनत पिळगावकर म्हणाले की, गेली दोन वर्षे रोटरी क्लबने या क्षणाची वाट पाहिली आणि अथक परिश्रमाने ही नेत्रपेढी कार्यरत झाली. ७ मार्च २००९ रोजी ही नेत्रपेढी सुरू झाली. समाजातील सर्व थरातील लोकांनी नेत्रपेढीशी संपर्क साधून सोपस्कार पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
नेत्रपेढीबद्दल असलेल्या गैरसमजुती शिक्षित लोकांनी दूर करणे आवश्यक असल्याचे सांगून नेत्रपेढीचे विश्वस्त गौरीश धोंड यांनी सामाजिक संस्थांचे तसेच इतरांचे सहकार्य यासाठी मागितले. नेत्रपेढीचे सचिव अनिल सरदेसाई, विजय प्रियोळकर व इतर मान्यवर यावेळी हजर होते.
------------------------------------------------------------------------------
रोटरी नेत्रपेढीची २४ तास सेवा ९२२५९८९२७२, ०८३२-२२५००२२, २२५००३३, २२५६३९७ या क्रमांकावर उपलब्ध आहे.

No comments: