Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 20 April, 2010

"जत्रोत्सवातील जुगार ही जुनी परंपरा'

जुगाराला पंचायत मंत्र्यांचे जाहीर समर्थन

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)- पेडणे तालुक्यात जत्रोत्सवातील जुगार ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. जुगाराशिवाय जत्रोत्सवाला कुणीही लोक येत नाहीत व देवस्थान समित्यांनाही काही प्राप्ती होत नाही, त्यामुळे जत्रोत्सवातील जुगार बंद करू देणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य पंचायत तथा क्रीडामंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगांवकर यांनी करून एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या जुगाराचे जाहीरपणे समर्थन करताना डिचोली, सत्तरी, बार्देश आदी ठिकाणी सर्रासपणे जुगार चालतो, मग पेडणे तालुक्यातच तो का नसावा, असे विधान करून जुगार बंदीच्या पोलिसांच्या दाव्यालाच त्यांनी आव्हान दिले आहे.
हरमल येथे क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला बोलताना बाबू आजगांवकर यांनी जुगाराबाबतची ही मुक्ताफळे उधळली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पेडणेचे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी केलेल्या कामगिरीबाबत त्यांचा जाहीर सत्कारही करण्यात आला. चोरी, खून प्रकरणांचा छडा लावण्याबरोबर जुगार बंदीचे काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार होत असल्याचे गौरवोद्गारही बाबू यांनीच यावेळी काढले.
"मांद्रे सिटीझन फोरम' तर्फे पेडणे तालुक्यातील सार्वजनिक व विशेष करून धार्मिक उत्सवांना सुरू असलेल्या जुगाराविरोधात सध्या जोरदार जागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच बाबू आजगांवकर यांच्या वादग्रस्त भाषणामुळे या मोहिमेला एकप्रकारची खीळच बसली आहे. हरमल येथील या कार्यक्रमाला स्थानिक आमदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर देखील हजर होते. तालुक्याचे पालकमंत्री, स्थानिक आमदार तथा विरोधी भाजपचे आमदार व पोलिस निरीक्षक यांना एकत्रित आणून जुगार बंदीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुगार समर्थकांनी केला व बाबू आजगांवकर यांनी जाहीरपणे जुगाराचे समर्थन करून त्यांचा हेतू साध्य करून दिला,असेही स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गोवा राज्य जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार जुगारावर बंदी आहे पण सरकारचा एक जबाबदार मंत्रीच अशा पद्धतीने जुगाराचे जाहीरपणे समर्थन करीत असल्याने आपल्याच राज्यातील कायद्यांचे उल्लंघन सदर मंत्री करीत असल्याची टीका फोरमने केली आहे. बाबू आजगांवकर यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण तालुक्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मडगावच्या गांधी मार्केटचे नेतृत्व करणाऱ्या बाबू आजगांवकर यांना पेडणेतही गांधी मार्केट सुरू करण्याचा विचार आहे की काय, असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला आहे. बेकायदा व अवैध्य प्रकारांचे समर्थन करणारे बाबू आजगांवकर हे लोकांचे प्रतिनिधित्व करण्यास अपात्र आहेत. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांना तात्काळ पदच्युत करावे, अशीही मागणी होत आहे. जुगाराला राजाश्रय मिळवून देण्याची बाबू आजगांवकर यांची कृती समाजासाठी घातकच आहे. बाबू आजगांवकर यांच्या या वक्तव्यामुळे जुगारसमर्थकांना एकप्रकारे चेव चढणार आहे व त्यामुळे त्यांच्याकडून जुगाराला विरोध करणाऱ्यांना काही बाधा पोहचल्यास त्याला पूर्णतः बाबू आजगांवकर जबाबदार असतील, अशी घोषणाही फोरमने केली आहे.
पेडणेचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या कामगिरीबाबत कुणालाही दुमत नाही पण त्यांनी पेडण्यातील जुगाराला दिलेली मोकळी वाट यामुळेच ते टीकेचे लक्ष्य बनले आहेत. जुगारविरोधी मोहिमेमुळे त्यांना जुगारावर कारवाई करणे भाग पडले. पण खुद्द पोलिसांच्या हजेरीत जुगाराला सरकारचा पाठिंबा आहे, असे वक्तव्य सरकारतीलच एका मंत्र्यांकडून केले जाणे ही लोकशाहीचीच थट्टा आहे व अशा लोकांना निवडून दिलेल्या लोकांचाही अपमान आहे, अशी प्रतिक्रियाही उमटली आहे.

No comments: