Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 23 April, 2010

राखीव पंचायतीमध्येच महिला सरपंचपदापासून दूर

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): तिसवाडी तालुक्यातील सांव - माथाइश (दिवाडी) पंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असतानाही गेली दोन वर्षे या पदावर महिला पंच सदस्यांची निवड रोखून धरली जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यमान उपसरपंच तुळशीदास कुंडईकर हे सध्या प्रभारी सरपंच म्हणून कायमस्वरूपी काम पाहत आहेत. पंचायत संचालकांकडून आत्तापर्यंत हे रिक्त पद भरण्यासाठी झालेले सर्व प्रयत्न पंचायतीच्या पुरुष पंचसदस्यांकडून हाणून पाडले जातात, अशीही माहिती प्राप्त झाली आहे.
देशात सर्वत्र महिला आरक्षण विधेयकाचा बोलबाला सुरू असताना गोव्यासारख्या सुशिक्षित व प्रगत राज्यात एका पंचायतीत महिला सदस्यांना सरपंचपद भूषविण्यास अशा पद्धतीने आडकाठी आणली जात असल्याचा हा प्रकार राज्यासाठी शरमेचीच गोष्ट ठरली आहे. गेली दोन वर्षे हे पद अशा पद्धतीने रिक्त ठेवून पंचायतीचा कारभार प्रभारी सरपंचाकडून हाकला जात असताना आपल्या प्रशासकीय यंत्रणेकडे मात्र या प्रकारावर काहीही उपाय नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. पंचायत संचालकांकडून हे रिक्त पद भरण्यासाठी बोलावण्यात येत असलेल्या बैठकीला पंचायतीचे पुरुष पंचसदस्य गैरहजर राहतात व त्यामुळे हे पद भरले जात नाही. या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या या पंचसदस्यांवर कारवाई करण्याबाबत मात्र पंचायत संचालकांकडून अद्याप कोणत्याच हालचाली होत नसल्याने हा प्रकार पंचायत राज्य कायद्यालाच आव्हान देणारा ठरला आहे.
सात सदस्यीय पंचायतीत दोन महिला पंच सदस्य आहेत. त्यातील एक सदस्य आशा पै यांनी सुरुवातीला सरपंचपद भूषविले. आशा पै यांच्यावर अविश्वास ठराव संमत करून त्यांना हटविण्यात आले. दुसऱ्या महिला पंचसदस्य लुडा एथेड या देखील विरोधी गटातच असल्याने या पदावर त्यांनाही बसण्यास कुंडईकर गटातील इतर पंचसदस्य मज्जाव करीत असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, सरपंच निवडीसाठी बोलावण्यात येणाऱ्या बैठकीला उपसरपंच स्वतः उपस्थित राहतात पण त्यांच्या गटातील इतर चार पुरुष सदस्य मात्र हजर राहत नाहीत. यामुळे महिला सरपंचांची काही केल्या निवड होत नाही. मुळात या गैरहजर राहणाऱ्या पंचसदस्यांवर अशा वागणुकीमुळे काही कारवाई होऊ शकत नाही काय, असा सवाल येथील नागरिक उपस्थित करीत असले तरी पंचायत संचालकही या बाबतीत मौन धारण करून आहेत, अशी तक्रार त्यांनी केली आहे. आता दोन वर्षे झाली तरी या पंचायतीचा कारभार प्रभारी सरपंच चालवत आहेत.
महिलांचे अधिकार व हक्क याबाबत भाषणबाजी करणाऱ्या बिगर सरकारी संस्था, महिला आयोग यांनी आता पुढाकार घेऊन या बाबतीत तोडगा काढण्याची गरज असल्याचे दिवाडी गावातील नागरिकांचे मत आहे. महिलांसाठी सरपंचपद रिक्त असताना केवळ पुरुषांचे बहुमत असल्याने त्यांच्याकडून महिला पंच सदस्यांचा हा अधिकार हिरावून घेतला जाणे ही शरमेची गोष्ट असून अशा पंच सदस्यांना तात्काळ अपात्र ठरवण्यात यावे, अशीही मागणी होत आहे.

No comments: